Homeसाहित्यअवती भवती : 19

अवती भवती : 19

काही माणसे मोहाला कशी बळी पडतात, याचे एक उदाहरण सांगावेसे वाटते॰

कवि प्रा॰ शंकर वैद्य हे जुन्नर / ओतूरचे॰ त्यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले॰ त्यांना वा॰ ज्यो॰ देशपांडे म्हणून एक शिक्षक होते; ते कविताही करत असत॰ वैद्यांना कविता करतांना सुरवातीला या वा॰ ज्यों॰ नी मार्गदर्शन केले होते॰

‘बाल भारती‘ चे नववीसाठी मराठीचे पुस्तक तयार करताना कुसुमाग्रजांची ‘ माझा माझा हिंदुस्तान ‘ नावाची कविता घ्यायचे संपादक मंडळाने ठरवले॰ नेमकी हीच पहिली ओळ असणारी वा॰ ज्यों.ची पण एक कविता आहे॰ पुस्तकात कविता कुसुमाग्रजांची छापली, पण एका संपादकांचा काही घोटाळा झाला आणि पुस्तकात कवीचे नाव म्हणून वा॰ ज्यों.चे नाव छापले गेले. इतकेच काय; पण त्याचा रु॰ 15 /- मोबदला पण वा॰ ज्यों.ना पाठवला गेला !

ते दुहेरी मोहाळा बळी पडले॰

तो मोबदला त्यांनी स्वीकारला; आणि पुस्तकातील कविता आपली नाही हे ही त्यांनी पाठ्य – पुस्तक मंडळाला कळवले नाही॰

एक दोन वर्षे हे कोणाच्याच लक्षात आले नाही॰ कुसुमाग्रजांचे काही सहकारी मित्र कुसुमाग्रज हयात असतांना रोज सायंकाळी कुसुमाग्रजांच्या घरी भेटायचे॰ त्यांच्यापैकी एकाच्या लक्षात हे आले॰ त्याने कुसुमाग्रजांना तसे सांगितले॰ पण त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही॰ ते म्हणाले, ‘ जाऊ दे; माझी कविता तर मुलांपर्यंत पोचली ना॰ मला त्यातच आनंद आहे॰ ‘

पण या मित्रांनी ही गोष्ट तशीच अर्धवट न सोडतात त्याचा थेट पाठपुरावा पाठ्य पुस्तक मंडळाकडे केला; आणि काही कृती होत नाही, हे पाहून, स्थानिक आमदारातर्फे विधानसभेत यावर प्रश्न विचारण्यात आला॰

तपासणी झाल्यावर खरे काय ते उघडकीला आले॰

त्यावर कृती करण्याचे आदेश जारी केले गेले.

पुस्तक मंडळाने वा॰ ज्यों.ना तसे पत्र पाठवून चूक कबूल करण्याची आणि त्यांना दिलेला मोबदला कुसुमाग्रजांना पाठवण्याचे कळवले॰ वा. ज्यों.नी आपण मोहाला बळी पडल्याची आपली चूक कबूल केली; आणि त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खराब होती की ते त्या मोबदल्याचे रु॰ 15 /- परत करण्याची त्यांची ऐपत नाही; तर ते त्यांना माफ करण्यात यावे अशी विनंती केली॰

कुसुमाग्रजांनी त्यांना उदार मनाने माफ करून त्या 15 रुपयांवर पाणी सोडल्याचे कळवले॰ पाठ्य – पुस्तकात वा॰ ज्यों. चे नाव काढून त्या जागी कुसुमाग्रजांचे नाव छापले॰

पण काम अर्धवट झाले॰

कवितेखाली कुसुमाग्रजांचे नाव आले; पण अनुक्रमणिकेत वा॰ ज्यों. चेच नाव कायम राहिले !

ते एक तर कोणाच्याच लक्षात आले नाही; वा त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे करण्याचे कोणी मनावर घेतले नाही !

हे सर्व प्रकरण 1972 – 73 च्या सुमारास घडले॰

ते मी सर्व वाचले होते॰

नंतर 1976 साली ‘ महाराष्ट्र टाईम्स ‘ ने एकेका नामवंत कवीला एकेक महिना ‘ गेस्ट एडिटर ‘ बनवले आणि नवोदित कवींना आपल्या कविता पाठवण्याचे आवाहन केले॰ हे ‘ गेस्ट एडिटर ‘ त्यांतील कवितांची निवड करून निवडक कविता छापत असत.

एका महिन्यात प्रा. शंकर वैद्य ‘ गेस्ट एडिटर ‘ होते.

तर त्यांच्याकडे ज्या कविता आल्या, त्यांत खुद्द वा॰ ज्योंची — त्यांच्याच गुरूंची — कविता होती !

शंकर वैद्य भावूक झाले !

यावर शंकर वैद्यांनी समारोपाच्या लेखात वा॰ ज्यों. नी आपल्या उमेदीच्या काळात आपल्याला कसे मार्गदर्शन केले ते साविस्तरपणे लिहिले होते॰

नंतर 1993 पासून मी मुंबईच्या साहित्यिक वर्तुळात वावरू लागलो॰ एकदा प्रा. शंकर वैद्य, वामन देशपांडे, ‘ आयडियल ‘ चे कांताशेट नेरूरकर, अशोक बेंडखळे, रविप्रकाश कुलकर्णी आणि मी असे दादरच्या ‘ आदर्श दुग्ध मंदिरा ‘ त बसलो होतो॰ वामनने माझी ओळख वैद्यांशी करून दिली॰ मी त्यांचा ‘ म. टा. ‘ चा ‘ गेस्ट एडिटर ‘ म्हणून लेख, वा॰ ज्यो॰ देशपांडे, आणि ‘ माझा माझा हिंदुस्तान ‘ यांबद्दल आठवणी काढल्या॰ 20 वर्षांपूर्वीचे मला सर्व नीट आठवत आहे हे बघून वैद्य खूष झाले.

.. आणि आमचा स्नेह जमला॰ यांनी माझ्याबद्दल कायम आपुलकी दाखवली॰

वा. ज्यो., कुसुमाग्रज आणि ‘ माझा माझा हिंदुस्तान ‘ हे प्रकरण माझ्यापर्यंत कसे झिरपत आले ?

आम्ही 1984 साली नुकतेच डोम्बिवलीला स्थायिक व्हायला आलो असताना, नोव्हेंबर मध्ये माझी दिवंगत पत्नी लीना येथल्या एका शाळेत संस्कृत आणि भूगोल शिक्षिका म्हणून रुजू झाली॰ मात्र, सहा महिने माझ्या पत्नीला तिचा मराठी विषय नसतांनाही मराठी शिकवावे लागले॰

त्यावेळेस मी तिला मदत करत असे॰

ही कविता शिकवण्यासाठी तयारी करतांना तिच्या लक्षात हा नावाचा घोळ लक्षात आला॰ मला हे सर्व प्रकरण आठवत असल्यामुळे मी तिला सर्व कहाणी ऐकवली॰ शिवाय, तिला दोन गोष्टी सुचवल्या॰ तू आपणहून मुलांना हा नावाचा घोळ सांगू नकोस॰ कोणी विचारला तर मात्र, ही गोष्ट वा॰ ज्यों.चा अपमान न होईल अशा तर्‍हेने मुलांना सांग; आणि दुसरे म्हणजे मराठी विषय शिकवणार्‍या शिक्षिका मराठी घेऊन एम॰ ए॰ झालेल्या होत्या, त्यांना या बद्दल विचार॰ माझी 101 % खात्री होती की त्यांना हे प्रकरण माहिती नसणार॰

तसेच झाले॰

त्या शिक्षिकीने हा मुद्रण दोष आहे, असे सांगितले !

वर्गातल्या एका हुषार मुलाने मात्र, लीनाला या दोन नावांबद्दल प्रश्न विचारला॰

बाकी अन्य कोणीही शंका न विचारल्यामुळे लीनानं सुटकेचा नि:श्वास टाकला !

आमच्या शशी मेहताला एक हजाराच्यावर कविता पाठ येत होत्या॰ पण कित्येक शेकड्यांनी कविता पाठ असणार्‍याच्यांत प्रा॰ शंकर वैद्य ही होते॰

या बद्दल एक गोष्ट सांगाविशी वाटते॰

आमदार डॉ॰ श्रीधर नातूंच्या घनिष्ट मित्र चिपळूणच्या डॉ॰ वि. ग. निमकरांच्या घरी राहून लीनाचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. यांनाही पुष्कळ कविता पाठ होत्या॰ ते एकटे असले की स्वत:शी कविता गुणगुणत असत॰

त्यांना ‘ किती उंचावरून ही उडी तू टाकशी खाली ‘ म्हणून शाळेत कविता होती॰ ती त्यांना खूप आवडायची॰ पण ती कविता त्यांना पूर्ण येत नसे॰ ती कोणाची आहे हे ही त्यांना आठवत नसे॰

एकदा लीना मला म्हणाली की ही कविता कोणाची आहे आणि कुठल्या पुस्तकात आहे शशी मेहताला विचारा॰ ते पुस्तक आपण विकत घेऊन डॉ॰ निमकरांना भेट देऊ॰

दोन – तीन दिवसांनी मला ‘ आयडियल ‘ मध्ये प्रा. शंकर वैद्य भेटले. त्यांना मी ही कविता कोणाची आहे आणि ती कुठल्या कविता संग्रहात आहे, हे विचारले॰ त्यांनी अक्षरश: क्षणाचाही विलंब न लावता ही कविता नागपूरच्या भवानी शंकर पंडित यांची असून ती त्यांच्या ‘ पिचलेला पावा ‘ या कविता संग्रहात आहे; असे उत्तर दिले !

आता हा जुना कविता संग्रह कोठे मिळेल असे विचारले॰ ते म्हणाले, ‘ थोडे दिवस थांबा॰ ‘ आठवणीतील कविता ‘ चा चवथा भाग प्रसिद्ध होत आहे, त्यात ही कविता घेतलेली आहे॰ ‘

लवकरच तो चौथा भाग प्रसिद्ध झाला; आणि तो आम्ही विकत घेऊन डॉ॰ निमकरांना चिपळूणला पाठवला॰

जाता जाता :

कुसुमाग्रजांऐवजी वा॰ ज्यों. चे नाव लिहिणार्‍या माणसाने चूक केली असली तरी त्याचे मला कौतुक करावेसे वाटते॰ कारण, रूढार्थाने जो कवि म्हणून प्रसिद्ध नाही, त्याची कविता या संपादकाला माहिती आहे; हे कौतुकाचे नव्हे काय ?

या माणसाचे कवितांचे वाचन जबरेच म्हणावयास हवे; नाही का ?

कदाचित तो ही जुन्नर / ओतूरचा असावा !

अथवा, त्याला कुसमाग्रज, वा. ज्यो., विधानसभा हे प्रकरण नीट माहित असावं !

तरीही त्याचं कौतुक कमी होत नाही; नाही का ?

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments