Monday, November 25, 2024
Homeलेखविश्व मैत्र मिळाले…

विश्व मैत्र मिळाले…

जगभरातील सांस्कृतिक घडामोडी, साहित्यिक उपक्रम, जीवनाबद्दलची अत्यावश्यक माहिती आमच्यापर्यंत अगदी आमच्या हातात पोहोचविणारे न्यूज स्टोरी टुडे बेबपोर्टल म्हणजे दैनंदिन आयुष्यात भेटणारा आपला जणू चांगला मित्रच होय.

मी गेली तीन वर्षे या परिवाराचा एक भाग झाले आहे. वेब पोर्टल म्हणजे काय ? हे देखील तीन वर्षांपूर्वी मला माहीत नव्हते. आपण यावर लेख अगदी मेलने किंवा व्हाट्सअप ने पाठवू शकतो आणि ते प्रकाशित झालेले पाहू शकतो, हे ज्ञान मला देवेंद्र आणि अलका भुजबळ यांनी दिले आणि माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झाले.

तीन वर्षांपूर्वी रेडिओ विश्वासवर मी निवेदिका म्हणून रुजू झाले होते आणि वेगवेगळ्या देशातील लेखक, कलाकार, मान्यवरांच्या मुलाखती घेत होते. हे ऑडिओ आम्ही नंतर इतर मान्यवरांना पाठवत असू. देवेंद्र भुजबळ सरांनी या मुलाखती ऐकल्या. तेव्हा मला ते म्हणाले की या मान्यवरांच्या मुलाखती शब्दबध्द करून लेखाच्या स्वरूपात पाठवल्यास आपल्या वेब पोर्टलवर वाचकांना वाचायला मिळतील.
त्यांचे कार्य अधिक प्रमाणात पोहोचेल. मग मी प्रयत्न सुरू केले. वीस मिनिटांच्या मुलाखतीत खूप माहिती मिळू शकत नव्हती. पण मग पुन्हा फोन करून अधिक माहिती व त्यांची मते जाणून घेऊ लागले आणि मग लेख लिहिण्याची प्रक्रिया जमू लागली.

पाहता पाहता मी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथील अनेक मराठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन लेख पाठवले आणि ‘न्यूज स्टोरी टुडे ‘ने प्रकाशित केले.
या लेखांमध्ये विविध प्रकारचे रंगीत फोटो देता येत होते, हे माझ्यासाठी मुख्य आकर्षण होते. एकाच लेखात पाच सात फोटो आल्याने परदेशातील कार्यकर्ते आनंदी झाले. कारण त्यांच्या मंडळांचे, संमेलनांचे आणि वैयक्तिक कार्याचे महत्व भारतातील मंडळींना माहीत होऊन त्याच्या त्यांना प्रतिक्रिया मिळू लागल्या.

न्यूज स्टोरी टुडेवर इतरही लेख मी वाचत गेले. अनेक देशातील माहिती मला मिळाली. काहींना फोन करून मी मित्रही बनवले.
याच सुमारास मी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवरही लिहू लागले. दोन्ही लेख अनेक ग्रुप वर फिरू लागले. मला समाजात वावरताना लोक त्यासंबंधी प्रतिक्रिया देऊ लागले. भुजबळ साहेब स्वतःच दूरदर्शन, माहिती विभाग अशा संस्थांशी संबंधित असल्याने फार मोठ्या लोकांपर्यंत हे लेख पोहोचू लागले. वेब पोर्टल दूरदर्शनच्या निर्मात्यांपर्यंतही पोहोचत होते.

या पोर्टल वर प्रसिध्द झालेल्या लेखांची एक खासियत म्हणजे त्या लेखाच्या कोपऱ्यात दिलेल्या आकड्यावरून हा लेख किती लोकांनी वाचला हे देखील समजते. माझे काही लेख अतिशय व्हायरल झाले. माझा पहिला लेख होता अमेरिकेतील बी. एम .एम.च्या अध्यक्षा विद्या जोशी यांच्या कारकिर्दीवर. जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्ताने निरनिराळ्या देशातील दिग्गज कार्यकर्त्यांची ओळख झाली.

ऑस्ट्रेलियातील मराठी माणसे‘ या लेखाला ३००० वाचक मिळाले. तर अमेरिकेतील समाज कार्यकर्त्या सौ हेमा रचमले यांच्यावर लिहिलेल्या लेखालाही असेच खूप वाचक मिळाले. या कामामुळे माझी वेगवेगळ्या देशातील लेखक, कलाकार, समाज कार्यकर्ते यांच्याशी मैत्री झाली.

दोन्ही पोर्टल वर प्रसिध्द झालेल्या सर्व लेखांचे मी २०२२ मध्ये पुस्तक करायचे ठरवले. ग्रंथाली प्रकाशनाने २०२२ जुलैमध्ये ते प्रकाशित केले. पुस्तकाचे नाव आहे ‘मराठी सातासमुद्रापार‘. यात अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल अशा देशातील मराठी भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा व तेथील कार्यकर्त्यांसंबंधी छान माहिती दिली आहे.

एक महत्वाचे म्हणजे वेब पोर्टलवर प्रकाशित झालेले लेख त्याच दिवशी मी व्हाट्सअप वरून परदेशातही पाठवू शकत होते. त्यामुळे परदेशातील लोकांना लेखिका, निवेदिका म्हणून माझी चांगली ओळख झाली . त्यांनीही प्रकाशानाला शुभेच्छा म्हणून त्यांच्या देशातून व्हिडिओ करून पाठवले. ते मला प्रकाशन समारंभात दाखवता आले.

माझ्या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात मी अगदी थाटात केले. सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक डॉ. उदय निरगुडकर, ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ आणि अलकाताई भुजबळ, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, सुप्रसिद्ध गझलकार, प्रा. प्रतिभा सराफ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकात न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टल वरील लेखांमुळे हे माझे पुस्तक झाले आहे याचा उल्लेख मी आवर्जून केला आहे.

त्यानंतर दोन-तीन महिन्यातच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या ऑस्ट्रेलियात एक अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन होते. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर त्या संमेलनात जाणार होते. ग्रंथालीचा स्टॉल येथे असणार होता. मग मी त्या संमेलनात माझ्या या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी विनंती केली. ऑस्ट्रेलियाच्या संमेलनाचे निमंत्रक, श्री. यशवंत जगताप यांच्यावर मी लिहिलेला लेख खूप व्हायरल झाला होता व या पुस्तकात तो होताच. मुखपृष्ठावर अनेक कार्यकर्त्यांचे फोटो होते व श्री जगताप सरांचाही फोटो होता. त्यांनी हे प्रकाशन करायची तयारी दाखवली. समाजसेविका पुष्पा कोल्हे यांच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पुस्तक प्रकाशित झाले. माझ्यासारख्या एका वेब पोर्टल वरील लेखिकेचे नाव अशा तऱ्हेने ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन पोचले.

पुढे माझं लेखन सुरूच होते. ऑस्ट्रेलियात माझे नाव रेडिओ विश्वास आणि न्यूज स्टोरी टुडे यामुळे बऱ्यापैकी माहित झाले आणि खूप मित्र-मैत्रिणी मिळाले.

मार्च २०२३ मधे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे, भव्य शिवजयंती सोहळा होत आहे आणि त्याबद्दल मी तेथील कार्यकर्त्यांची मुलाखत घ्यावी अशी सूचना सिडनी येथील माझी मैत्रीण नीलिमा बेर्डे यांनी केली. त्या मुलाखती तर मी घेतल्याच पण मी तो सोहळा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी मला सन्मानाने आमंत्रण दिले व माझी राहण्याची व्यवस्था केली. संमेलनात सत्कारही केला. तेथून न्यूज स्टोरी टुडे च्या संपादकांशी मी सतत संपर्कात होते. त्यांनी माझ्या ऑस्ट्रेलियाच्या सफरीवर, तेथील सोहळ्यावर, तेथे असलेल्या मराठी रेडिओ स्टेशनवर मी लेख लिहावेत अशी कल्पना मांडली. असे काही लिहिण्याचा माझा मानसही नव्हता. पण त्यांनी सुचविल्यामुळे तो विषय माझ्या मनात जागृत झाला. मग या वेब पोर्टलवर माझे सहा लेख झळकले.

माझ्या लेखणीला खतपाणी देण्याचे काम माननीय देवेंद्र भुजबळ आणि सौ. अलकाताई भुजबळ यांनी सातत्याने केले. म्हणून मी त्यांची आभारी आहे.

‘न्यूज स्टोरी टुडे’ ने मला काय दिले असे विचाराल तर माझ्या लेखणीला सामर्थ्य दिले आणि अनेक देशातील मित्र जोडून दिले.
आमच्या या” न्यूज स्टोरी टुडे ‘ला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

मेघना साने

— लेखन : मेघना साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments