एक कुशल राजकीय वक्ते, उत्तम राजकीय व्यवस्थापक अन् यशस्वी बागायतदार शेतकरी म्हणून आपल्या सुवर्ण काळात आपला ठसा राजकीय, कृषीक्षेत्रात उमटविणारे आळे गावचे भूषण प्रकाश अण्णा मुकुंदराव भुजबळ पाटील यांचे अलिकडेच आकस्मिक निधन झाले. त्यांना पत्रकार नारायण जाधव यांनी अर्पण केलेली ही शब्द सुमनांजली.
– संपादक
प्रकाश मुकुंदराव भुजबळ पाटील यांना गेल्या 12 जुलै 2023 रोजी दुपारी हृदयविकाराचे एका मागून एक दोन धक्के आळे येथील राहत्या घरी बसले. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना स्पेशल ॲम्बुलन्सने पुण्यात नेले जात असतानाच मंचर राजगुरुनगर दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि गेले 73 वर्ष अस्तित्वात असलेले प्रकाशपर्व काळाच्या पडद्याआड लोपले गेले.
खरं तर, प्रकाश अण्णांचे जीवनच अशा असंख्य धक्क्यांनी भरलेले होते. पण आलेल्या धक्क्यांना तोंड देत ते जीवनाची वाटचाल करीत राहिले. पण नियतीने मंचरजवळ त्यांना दिलेला धक्का त्यांच्या जीवनाला पूर्णविराम देऊन गेला.
प्रकाश अण्णांनी त्यांच्या 73 वर्षाच्या जीवन वाटचालीत विशेषतः त्यांच्या राजकीय सुवर्णकाळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर उमटविला, हे जुने जाणते लोक आजही मान्य करतील.
त्यांचे वडील मुकुंदराव भुजबळ पाटील हे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेले त्याकाळचे मातब्बर नेते होते. शिवाय मुंबईत भायखळ्यात ते घाऊक भाजीपाल्याचे व्यापारीही होते. पुढे जनता पार्टीत येऊन त्यांनी दोन वेळा खेडमधून लोकसभेची निवडणूक अयशस्वीपणे लढवली. अशा लढाऊ पित्याचे प्रकाश अण्णा हे पुत्र असल्याने वडिलांचे गुणही त्यांच्या अंगात आलेले होते.
मुकुंदराव पाटील हे जसे उत्तम वक्ते होते तसेच 1977 पासूनच्या काळातले प्रकाश अण्णा हेही एक प्रभावशाली राजकीय बनले वक्ते होते. प्रकाश अण्णा हे त्यांच्या राजकीय सुवर्ण काळात जनता पार्टीचे तेव्हा स्टार प्रचारकच होते. ते उत्तम वक्ते बनण्यास त्यांना तशी पार्श्वभूमी ही लाभली होती. पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि गरवारे कॉलेजमधून ते बीएससी झाले.
पुढे ते पुणे युथ काँग्रेसचे सेक्रेटरी झाले होते. राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार हे पुणे जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष असताना प्रकाश अण्णा पाटील हे युथ काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी भाषण कलेचे प्रशिक्षण काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना पवार साहेबांकडून मिळाले होते, याचा प्रकाश अण्णांना लाभ झाला होता. पुढे वडील मुकुंदराव यांच्याकडून भाषणाबाबत प्रकाश अण्णांना काही टिप्स मिळाल्या. भाषणात द्विअर्थी शब्द नको, असंसदीय भाषा नको, भाषणात संस्कृत सुभाषिते, थोरांचे सुविचार यांची पेरणी करावी, अशा काही सूचना वडिलांकडून मिळत राहिल्या. यातून प्रकाश अण्णांचे वकृत्व खऱ्या अर्थाने फुलले.
पुढे वडील जनता पार्टीत आले आणि त्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. पुण्यातले शिक्षण आणि पुण्यातच राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेली एन्ट्री यातूनच ते प्रभावशाली वक्ते बनले होते. सुस्पष्ट आवाज स्पष्ट शब्दोच्चार अन् एका लयीत आपले विचार सादर करण्याची त्यांची खासियत होती. यामुळे ते सहजपणे सभांमध्ये लोकांच्या टाळ्या मिळवायचे. विशेष म्हणजे वकृत्वाची कला 25व्या वर्षीच त्यांनी साध्य केली होती .
इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात बलराम जाखड हे केंद्रीय कृषिमंत्री असताना ते एकदा द्राक्ष बाग संघाच्या कार्यक्रमास पुण्यात उपस्थित राहिले होते. तेव्हा तरुण उमद्या प्रकाश अण्णांनी द्राक्ष बागायतदार संघाचे एक पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमात जे भाषण केले त्याने खुद्द बलराम जाखड हेही प्रभावित झाले होते. ‘आपका लडका बडा वक्ता बनेगा’ असे प्रशंसोद्गार त्यांनी मुकुंदराव पाटील यांच्याशी या भाषणाबाबत बोलताना नंतर काढले होते. त्यावेळी प्रकाशला राजकारणात आणण्याचा आपला निर्णय योग्यच आहे याची प्रचिती मुकुंदराव भुजबळ पाटील यांना आली होती.

राम मंदिर आंदोलनावेळी माजी उपपंतप्रधान भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा आळेफाटा मार्गे नाशिकला गेली. तेव्हा या रथयात्रेचे आळेफाटा येथे स्वागत करताना प्रकाश अण्णांनी थोडक्यात स्वागतपर केलेले भाषण अडवाणींना आवडले होते याची प्रशंसा त्यांनी दिल्लीत भेटल्यावर वडील मुकुंदरावाशी बोलताना केली होती. ही माहिती मुकुंदराव भुजबळ पाटील यांचे चतुर्थ चिरंजीव ऑटोमोबाईल इंजिनिअर, हॉटेल व्यावसायिक, पेट्रोल पंप मालक मोहन मुकुंदराव पाटील यांनी दिली.
असे राजकीय प्रभावशाली वक्ते असूनही राजकीय आघाडीवर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. जनता पार्टीच्या लाटेच्या काळात प्रकाश अण्णांच्या सभांमुळे जुन्नर ,आंबेगाव, खेड मधून अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य झाले. पण आळे ग्रामपंचायत सदस्य अन् जुन्नर पंचायत समितीचे सदस्य इतकी त्यांची सीमीत राजकीय कारकीर्द राहिली याची खंत त्यांना जरूर होती. परंतु हे दुःख त्यांनी कधी गोंजरले नाही. आपल्या पद्धतीने ते आपली जीवन वाटचाल करीत राहिले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत नाना डोके ही प्रकाश अण्णांचे आळेगावातील एक आदर्श होते. राजकीय आघाडीवर प्रकाश अण्णा असे चमकत असतानाच शेती क्षेत्रातही त्यांनी 1980 च्या काळात आधुनिकतेची कास धरली होती. आळेगावात चिचकाईत ज्या माळरानावर कधी मठ, हुलगा नीट आला नाही अशा माळरानावर त्यांनी पाच एकरावर अनेक वर्ष द्राक्ष बागा फुलवून एक किमया करून दाखवली होती. आपल्या सहा-सात एकरच्या शेतीला पाणी कमी पडते, म्हणून ते थांबले नाहीत तर त्वरित निर्णय घेऊन पिंपळवंडी नदीपासून पाईपलाईन टाकून त्यांनी कुकडीचे पाणी आपल्या चिचकाईतील शेतीत खेळवून खऱ्या अर्थाने माळरानावर नंदनवन फुलवले आणि शेतकरी बांधवांसमोर एक आदर्श उभा केला. एक यशस्वी शेतकरी म्हणून संपूर्ण जुन्नर तालुक्याला ते जसे भावले तद्वत आपल्या खणखणीत, रसाळ भाषणांनी राजकीय सभा जिंकून देणारे प्रकाश अण्णा पाटील हे त्यांच्या राजकीय सुवर्णकाळात निश्चितच भावले होते.
कै. प्रकाश अण्णांना चिरंजीव जीवन, चिरंजीव वैभव आणि मुलगी क्रांती ही तीन मुले आहेत. यापैकी दोन नंबरचा वैभव हा सी. ए असून पुण्यात त्याची फर्म आहे. परदेशातील अनेक नामवंत कंपन्यांशी त्यांची फर्म करार करते. तर कन्या क्रांती ही अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या सिटी बँकेत उच्च पदावर अधिकारी आहे. तर थोरला जीवन एमडी डेंटिस्ट डॉक्टर असून त्याने आजोबा मुकुंदराव आणि वडील प्रकाश अण्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवलेले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसची एक इलेक्शन कोऑर्डीनेशन कमिटी स्थापन केलेली असून या महत्त्वाच्या कमिटीवर जीवन हा गेल्या दहा-बारा वर्षांपासून सक्रिय सदस्य आहे. पत्नी विजयालक्ष्मी यांच्या साथीने प्रकाश अण्णांनी कौटुंबिक स्तरावर हे प्राप्त केलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
अशा या संघर्षशील, प्रयोगशील प्रकाश अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : नारायण जाधव. ज्येष्ठ पत्रकार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
भावपूर्ण श्रद्धांजली.