Friday, November 22, 2024
Homeयशकथारणरागिणी : सुषमा चव्हाण

रणरागिणी : सुषमा चव्हाण

महिला पोलिस अधिकारी असा उल्लेख आला की, एक रुबाबदार स्त्रीचे व्यक्तिमत्व डोळ्या समोर येतं. आज शासकीय यंत्रणेत अनेक बदल झालेले आहे त्याच प्रमाणे महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. मोठ्या प्रमाणात मुलींचा कल पोलिस भरती कडे वळताना दिसतोय. पण साधारण पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी ही संख्या अत्यंत कमी होती.

कोल्हापूरच्या ताराराणी शाळेत पहिली ते चौथी पर्यंत चे शिक्षण घेत असताना बालपणापासून आपल्या वडिलांना पोलिस अधिकारी या भूमिकेत बघून आपण देखील पोलिस अधिकारी होऊन वडिलांसारखे कार्य करू अशी स्वप्न बघणाऱ्या, आपल्या शौर्य कर्तुत्वाने तब्बल ४७८ रीवर्ड्स मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे श्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण यांच्याशी बोलताना मला देखील स्फुरण चढल्या सारखं झालं. परवा यांची भेट घेतली तेव्हां आम्ही बरीच चर्चा केली. त्यातून सुषमा मॅडम यांनी आपला कार्य प्रवास वर्णन केला आणि एक लहानशी चिमुकली जिचे, आजोबा आणि वडील दोघे ही पोलिस खात्यात अधिकारी होते त्यांनी पोलिस अधिकारी होण्यापासून ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगितले.

भारतासारख्या पारंपरिक समाजात आपलं काम आणि कौटुंबिक समतोल याविषयी स्त्रियांचा दृष्टिकोन आणि पुरुषांपेक्षा निश्र्चितच वेगळा आहे. आणि दोन्ही गोष्टीत समतोल राखण्यात स्त्रीची चपळता, कार्य क्षमता वाखाणण्या जोगे असते यात दुमत नाहीच. सुषमा मॅडम यांनी देखील आपलं घर आणि काम यात कमालीचा समतोल साधला. त्या उत्तम प्रेरणादायी अश्या व्यक्ती आहेत हे त्यांना भेटून प्रकर्षाने जाणवलं.

सुषमा मॅडम या उत्तम कब्बडी पटू होत्या. साधना क्रीडा मंडळ द्वारे त्यांनी कबड्डी खेळण्यास सुरुवात केली आणि पुढे क्लब युनिव्हर्सिटी अश्या अनेक स्पर्धा त्या लढल्या. खेळाडू म्हणाल तर बँक वगैरे अश्या ठिकाणी नोकरी करण्याकडे कल असतो पण सुषमा मॅडम यांना पोलीस वर्दीच प्रचंड आकर्षण होतं. त्यामुळे त्यांनी पोलिस अधिकारी होण्याचं मनोमन ठरवलं होतं. पण त्या म्हणाल्या, “त्यावेळी महिला पोलिस इन्स्पेक्टर ची नियुक्ती थेट होत नसे. त्यांनी आधी कॉन्स्टेबल म्हणून पोलिसात भर्ती होऊन नंतर त्यांची बढती होत असे. परंतु १९८६ साली प्रथमच महिला साठी पोलिस सब इन्स्पेक्टर पदासाठी महाराष्ट्र शासनाने अर्ज मागवले होते. या पूर्वी पोलिस खात्यातील जाहिरातीत महिलांनी अर्ज करू नये असे स्पष्ट नमूद असायचे” अशी माहिती सुषमा मॅडम यांनी दिली. त्यामुळे महिलांना पहिल्यांदा मिळणार असलेल्या या संधीचा उपयोग करायचा असं त्यांनी ठरवलं आणि अर्ज केला.

शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत असे टप्पे यशस्वी रित्या पार केले. पोलिस अधिकारी असणारे त्यांचे वडील मात्र आपल्या लेकीसाठी थोडी काळजी करत होते, पोलिस खात्यात असताना व्यक्तिगत, कौटुंबिक जीवन यावर खूप परिणाम होतो आणि रात्र दिवस एक करून समोर आलेली अनेक आव्हाने यांना तोंड द्यावे लागते. इतके कष्टमय जीवन आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं वाटणं साहजिक होतं. असे अनुभव ते स्वतः घेत होते म्हणून आपल्या लेकीने ही तारेवरची कसरत करू नये असे त्यांचे मत होते. त्यासाठी सुषमा मॅडम यांची समजूत काढण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण एक महिला पोलीस अधिकारी म्हणून आपल्या शौर्य आणि कर्तुत्वाने त्या आपल्या कुटुंबाची सन्मान वाढवणार होत्या आणि, अनेक मुली ज्या या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी प्रेरणा ठरणार होत्या. अश्या या सुषमा मॅडम कुठे थांबणार नव्हत्याच.

सुषमा मॅडम यांना सब इन्स्पेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग भोसरी पोलिस स्टेशनला मिळाली. सुरुवातीला काम शिकून घेण्याची कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही. पुरुष पोलिस अधिकारी जे जे काम करत होते ते ते सगळं त्यांनी करून दाखवलं. कारण पुरुष पोलिस अधिकारी यांच्याशी त्यांची तुलना होणं त्यावेळी खूप सामान्य बाब होती, असं त्या म्हणाल्या. पण हळूहळू त्यांची क्षमता सिद्ध होऊ लागली आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या वाट्याला आल्या. क्राईम ब्रांच, सी आय डी, लष्कर अश्या अनेक पोलिस विभागात त्यांनी आपल्या कार्याची यशस्वी छाप उमटवली.

एक महिला म्हणून प्रत्येक महिलेला सुषमा मॅडम यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची कारकीर्द आहे. एकाच महिन्यात १७० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश प्राप्त केले. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश आदी राज्यातून गुन्हेगार शोधून काढले. तसेच खून, घरफोड्या, दरोडा सारख्या जबर गुन्ह्याचा तपास यशस्वीरीत्या केला.

महाराष्ट्राला हादरून सोडलं त्या सेक्स स्कँडल गुन्ह्याच्या मॅडम तपास अधिकारी होत्या. त्यातील वीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली. यात मॅडम ची मोलाची कामगिरी आहे.

सुषमा मॅडम यांना अत्यंत क्लिष्ट, किचकट गुन्ह्याचा तपास करणे तसेच नागरिकांच्या मनात पोलिसदला विषयी विश्वास निर्माण करून जनतेचे सहकार्य मिळवणे तसेच पोलिसांची प्रतिमा उचवणे हे महत्त्वपूर्ण यश प्राप्त करण्या बाबत २००७ साली माननीय पोलिस महासंचालक यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्राप्त झाले. तसेच २०१० मध्ये त्यांना त्यांच्या अद्वितीय कामगिरी साठी राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आलं आणि २०२० साली दुसऱ्यांदा अनमोल कामगिरी साठी राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त झालं.

कौटुंबिक प्रश्न असो महिलांच्या समस्या असो त्या संवेदनशीलतेने एकून घेणं आणि सोडवण्यासाठी आपले अधिकार आणि पदाचा त्यांनी योग्य वापर केला.

एक महिला सहायक पोलीस आयुक्त म्हणून उभारी देणारे तसेच खंत जाणवली असे कोणते प्रसंग सांगता येतील ? असं विचारलं असता सुषमा मॅडम यांच्या चेहऱ्यावर काही प्रसंगाची खंत दिसून आली. जीवाची पर्वा न करता घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्याची कामगिरी त्यांनी केली. पण महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव सामील केल्या गेले नव्हते याची त्यांना खंत वाटली.उभारी देणारे अनेक अनुभव आले असं म्हणत त्यांनी सांगितलं. शाळा, कॉलेजच्या मुली त्यांच्या कडे बघून प्रेरित होत आणि पोलिस अधिकारी होण्याची इच्छा दर्शवत. जास्तीत जास्त महिलांनी पोलिस अधिकारी व्हावं आणि संवेदनशीलतेने कार्य करावं. हे क्षेत्र, अधिकार, पद या द्वारे ठोस कार्य होऊ शकतं असं त्या म्हणाल्या.

आधी आणि आताची परिस्थिती बदलली आहे.त्यावेळी पुरुष पोलिस अधिकारी यांना अधिक जबाबदारीच कार्य दिलं जायचं आणि महिला पोलिस अधिकारी यांना बालक आणि महिला आरोपी यांच्याशी संबंधित काम दिलं जायचं तेंव्हा महिला पोलीस अधिकारी यांना आपली कार्य क्षमता सिद्ध करावी लागायची. पण आज काही अंशी परिस्थिती बदललेली आहे.

सुषमा मॅडम आणि त्यांच्या सारख्या धडाडीने आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलिस अधिकारी यांना मन:पूर्वक नमन. महिला पोलिस अधिकारी यांची संख्या आणखी वाढत जावी आणि त्यांनी बालक, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सक्षम भूमिका घेऊन संवेदनशीलतेने न्याय प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करावी ही समाजाची गरज आहे. तसेच पोलिस यंत्रणेच्या सगळ्याच विभागात उत्तम कार्य करावं महिला म्हणून त्यांना कोणतीही संधी नाकारली जाऊ नये. त्यांच्या कार्य क्षमतेवर कोणतेही प्रश्न चिन्ह नसावे. हीच सदिच्छा.

सुषमा मॅडम यांनी महिला पोलिस यांना त्यांच्या कुटुंबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या कार्यात कधी दोन दोन दिवस घरी देखील जाता येत नाही. असे अनेक प्रसंग येतात जेव्हां तपास कार्यात स्वतःला वाहून घ्यावं लागतं, अश्या परिस्थितीत कुटुंबाची साथ आणि सहकार्य खूप मोलाचं असतं. सुषमा मॅडम यांना आपल्या सासर माहेर दोन्ही कुटुंबांनी छान साथ दिली आणि त्यांचे पती आणि मुलाने देखील त्यांना समजून घेतलं. कुटुंबाची साथ एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा देत असते. जी ऊर्जा सूर्य बळ देते आणि ती महिला आपलं कर्तृत्व उत्तमरीत्या सिद्ध करू शकते.

बाल कल्याण समिती अध्यक्ष म्हणून कार्य करताना माझा महिला पोलिसांशी जवळचा संबंध येतो. कधी त्या आपल्या अडचणी सांगतात. रात्रपाळी करून बालकांना घेऊन समितीत येतात, कधी आजारी असताना देखील येतात. आपल्या लहान बालकांना सोडून दोन दोन दिवस सलग कामावर असतात, बालकांना हॉस्पिटल मध्ये मेडिकल साठी घेऊन जातात तेव्हा त्यांच्या सोबत थांबतात, रात्र जागतात, बाथरूम ची व्यवस्था नसताना मासिक पाळी सुरू असताना देखील बंदोबस्तात खडा पहारा देतात, कौटुंबिक प्रश्न नाते संबंध, व्यक्तिगत अडचणी सगळं सगळं सांभाळून आपलं कर्तव्य चोख बजावतात.

या सगळ्या महिला पोलीस कर्मी ज्या अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हिमतीने कार्य करत आहेत या सगळ्या रणरागिणींना माझा मानाचा सलाम.

श्रीमती सुषमा शैलेंद्र चव्हाण काही महिन्यापूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून सेवा निवृत्त झाल्या. तब्बल सदतीस (३७) वर्षे न दमता न थांबता अत्यंत उत्कृष्टरित्या पोलिस विभागाच्या विविध पदांवर त्यांनी जवाबदारी आणि धडाडीने कार्य केलं आहे. या आजच्या रणरागिणी ला मनापासून नमन.

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्ष. बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. एका पोलिस अधिकारी महीले संबंधी समर्पक पध्दतीने मांगती या लेखा मध्ये केली. ज्या काळात महीलांना सरळ अधिकारी पदावर जाता येत नव्हते त्या काळात या सुषमा ताईंनी केलेले धाडस म्हणजे हिंमतीने काम होते.सुषमा चव्हाण मॅडम यांनी केलेल्या कार्या बद्दल त्यांना शासनाच्या वतीने 478 रिवार्ड मिळाले आहेत. या वरुनच त्यांनी केलेल्या कार्याची पावती मिळते. डॉ खेडीकर मॅडम यांनी या समर्पित व्यक्तीमत्वाला आपल्या लेखनिच्या माध्यमातून न्याय मिळवून दीला आहे.

  2. सुषमा मॅडमना एक कडक salute.सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी सरकारने त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमावे आणि त्यांनी जसे कार्य केले तसेच इतरांनी करावे,सर्व सामान्य जनतेला पोलिस आपला मित्र वाटावा यासाठी सत्रे घ्यावीत तसेच मुलींसाठी त्यांच्या पालकांसाठी वाईट प्रसंग उद्भवला तर विशेष खबरदारी काय घेता येईल,या प्रसंगातून कसे सुटता येईल याची शिबिरे घ्यावीत.
    इतक्या असामान्य व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल डॉ. राणी खेडीकर आणि News story Today यांचे आभार .
    ..नीला बर्वे

  3. Proud of her .
    She is my baychmate .
    I have seen her while playing Kabaddi.As I also played .And after sports w joined in Police Department .And seen her cariour through out 36 years of active police service She is so humble , dedicated , Hardworking,sincere so many adjectives .
    And the only one officer who got 2 time President Police Medal.
    We all batchmates are very proud of you dear Sushma .
    God bless you always.
    Gopika Jahagirdar

  4. कौतुकास्पद आहे…!! सुषमाताई चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन…!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments