थोर महापुरुष यांच्या विषयीची वादग्रस्त विधाने असो, पुस्तकातून, वृत्तपत्रातून, विविध माध्यमातून त्यांची होणारी बदनामी असो, आरक्षण मुद्यावरून होणारी आंदोलने, चर्चा किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अश्या अनेक विषयावर पुराव्यांसह बोलणारे, समाजात पुरोगामी विचाराची चळवळ अधिक मजबूत करणारे आपल्या सर्वांचे मित्र, लेखक, विचारवंत डॉ. हरी नरके यांचे काल धक्कादायक निधन झाले आणि समतावादी चळवळीची मोठी हानी झाली.
प्रा हरी नरके यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक परिवर्तनाचा नवा विचार महाराष्ट्रभर पोहोचवला. टीकेची पर्वा न करता ते बोलत. त्यांच्या विचाराने लोक जागृत झाले. तरुण मुलं वाचू लागली. बोलू लागली. लिहू लागली. सत्याचा शोध घेऊ लागली.
प्रा नरके यांच्या प्रचंड वाचन, संशोधक वृत्ती आणि दमदार, कडक लिखाणामुळे अनेक महापुरुषांच्या नव्या गोष्टी समाजासमोर आल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे शासनातर्फे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले. ते जगभर पोहोचले. पुण्यातील म.फुल्यांचे स्मारक, नायगावचे सावित्रीबाई स्मारक, पुणे विद्यापीठाचे नामकरण, दिल्लीतील थोर पुरुषांचे पुतळे या कामी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

समता परिषदेचे काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत टीम तयार केली. त्यांच्यात ऊर्जा निर्माण करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सशक्त केले.
तरुण लेखकांना प्रोत्साहन देऊन त्यांना नवीन विषय सुचवणे, संदर्भासाठी मदत करणे, कोणती पुस्तके संग्रही ठेवावी या बाबतचे त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असे.
श्री हरी नरके आणि माझी पहिली भेट 1990 मध्ये औरंगाबाद येथील मसापच्या कार्यक्रमात झाली. तेथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. मी तेव्हा पत्रकार म्हणून काम करत होतो. त्यावेळी त्यांची बातमीही मी कव्हर केली होती. त्यानंतर त्यांचे आणि माझे संबंध शेवटपर्यंत कायम राहिले. मधल्या काळात 1998 मध्ये मी ‘महात्मा फुले आणि निर्मिक’ हे पुस्तक तयार केले. या पुस्तकासाठी श्री. नरके यांची प्रस्तावना घ्यावी असे मला प्रतिमा प्रकाशनचे श्री अरुण पारगावकर यांनी सुचविले. त्याप्रमाणे मी त्यांच्या पुण्याच्या घरी भेट घेतली. माझे हस्त लिखितही दिले. त्यानंतर एक उत्तम प्रस्तावना त्यांनी पाठवली. विशेष म्हणजे त्या पुस्तकाला वर्ष 2000 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही अनेकदा मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. नवीन लेखनासंबंधीचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत गेले.

पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या महात्मा फुले विषयक साहित्त्यावरील अनेक परिसंवादात आम्ही एकत्र असायचो. त्यामुळे त्यांचा माझा संबंध हा अतिशय मैत्रीपूर्ण असाच होता. त्यांच्या संदर्भात आणखी एक आठवण म्हणजे, मी वर्ष 2000 मध्ये डॉ. सुधीर गव्हाणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक पत्रकारिता या विषयावरील पीएच .डी पूर्ण केली. त्यावेळी श्री. नरके हे माझा व्हायवा घेण्यासाठी विद्यापीठात आले होते. त्यावेळीही अनेक विषयावर चर्चा झाली. त्याचा परिणाम असा झाला की मला नवीन विषय मिळत गेले आणि पुढे मी अनेक पुस्तके लिहू शकलो.
श्री. नरके हे चळवळीतील कार्यकर्ते होते. सत्यशोधक चळवळ, कामगार चळवळ, भटक्या विमुक्तांचीची चळवळ, मंडल आयोगा संदर्भातील चर्चा, नामांतर चळवळ अशा अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता.
शासनाच्या विविध चरित्र साधने समितीवर त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले समग्र वांड.मय नव्या स्वरूपात प्रसिद्ध केले. डॉ. आंबेडकर यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांचे खरे छायाचित्र त्यांनी समोर आणले.

मागासवर्गीय आयोग जेव्हा स्थापन झाला त्यावेळी त्यांनी विविध जाती धर्माच्या आकडेवारी सह माहिती देऊन आयोगाला सहकार्य केले. आरक्षण या मुद्द्यावर ते अधिकारवाणीने बोलत.
असा सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एक शिलेदार, सत्यशोधक विचाराचा दीपस्तंभ कायमच जनतेच्या स्मरणात राहील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : डॉ. संभाजी खराट
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800