Monday, July 14, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ६

दुर्मीळ पुस्तके : ६

गजरा मोतियाचा

‘गजरा मोतियाचा’ हा वा. शि. आपटे यांचा लघुनिबंध संग्रह इनामदार बंधू प्रकाशनने २५ डिसेंबर, १९६३ रोजी प्रकाशित केला. ८८ पृष्ठांच्या या छोटेखानी पुस्तकाची किंमत तेव्हा २ रुपये होती.

या लघुनिबंध संग्रहात फुलांच्या जगात, पिंगा, थांब मरणा, गुलमोहर, कारण यांतहि आनंद आहे, तुमचं ठीक आहे बुवा !, गजरा मोतियाचा, आठ अठ्ठावीस व सहा पांच, पांची बोटे, ओझेवाला, आषाढीचे खिन्न चांदणे, वादळ, ते तीन तास, गोष्ट आहे एका संध्याकाळची, आणि जर भाषाच नसती!, कात्री, ‘माणूस’ हरवला आहे, पत्रं नव्हे भावगीतं, शुक्रवार, अंधार, म्हणे वेळ वांचवा आणि दार उघड – असे २२ ललित लघुनिबंध आहेत. यातील फुलांच्या जगात हा धडा बालभारतीच्या पहिल्या मालिकेत १९७० मध्ये इयत्ता ५ वीला होता.

प्रा. वामन शिवराम आपटे यांचा जन्म २ जुलै, १९१६ रोजीचा. त्यांचे २५ मे, १९९८ रोजी निधन झाले. कल्याण येथे त्यांचे वास्तव्य होते. उल्हासनगर, जि ठाणे येथे तलरेजा महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. सौभाग्य(कादंबरी), नीरांजन(कथासंग्रह), आकाशनाटिका, भालू आणि सुमित्रा, एकेकाचा स्वभाव, विक्रीकला, तुझं काही माझं काही, स्वामी रामतीर्थ, ज्ञानतुषार (शालेय), समाजपुरुष (शालेय), चिंता का करता ?, प्रश्न जीवनाचे, प्रश्न शिष्टाचाराचे, सदैव जायचे पुढे, मित्र कसे जोडावे, ध्येय कसे गाठाल ? ताजा कलम, तू माझा सारथी, रुखरुख, गजरा मोतियाचा इ. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. जे जे चांगले मनात येते ते ते सर्वांना सांगणे हे त्यांचे ध्येय होते. हिंदीतील व इंग्रजीतील काही लोकप्रिय पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. शेक्सपियरच्या ३७ नाटकांपैकी ३४ नाटकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

प्रा. वामन शिवराम आपटे

‘गजरा मोतियाचा ‘ या लघुनिबंध संग्रहातील ‘फुलांच्या जगांत’ या लघुनिबंधात एक कठिण काष्ठांचा पोखरुन क्षणार्धात भुगा करणारा भुंगा मधुसेवनात गुंग होऊन रात्री मिटलेल्या कोवळ्या कमलिनीच्या आंतच अडकून पडतो. तोच या फुलांच्या जगाविषयी कथन करतो असे यात लेखकाने दर्शविले आहे. पहाटे उमलणारा पारिजातक, त्याचा आर्द्र सुगंधित सडा, मधुर मकरंद, हिरव्या शेताच्या कडेला फुललेला तेरडा, तरवड, तीळ, झेंडू यांची पिवळी फुले, कमळाच्या गोल वर्तुळाकार पानांनी झाकलेले सुंदर सरोवर असे फुलांच्या जगातील पदोपदी नाचते सौंदर्य लेखकाने आपल्या ललित शैलीत मांडले आहे. पांढरी शुभ्र लिलीची फुलं जणू कारंजी वाटताय. फुलांचा ताटवा, श्रावणातील जणू रंगपंचमी, फुलांची सुखदुःखं, रुसलेला चाफा, साधेपणा गुण ठरावा अशी फुले अशी फुलबागेतील सुंदर सहल या लघुनिबंधातून घडवली आहे.

पिंगा’ या लघुनिबंधात एका भोवऱ्याच्या निमित्ताने चिंतन केले आहे. एकदा गति दिली की तो फिरु लागतो. खूप फिरतो, खूप फिरतो पण शेवटी थकतो आणि विसावतो. स्वतः भोवती फिरणारा अहंमन्य आत्मकेंद्रित भोवरा! कुंभाराचे चाकही तसेच. स्वतः भोवती फिरते. कुंभाराचं चाक स्वतः भोवती फिरता फिरता दुसर्‍यांच्या – मातीला आकार देते. तर गिरणीचं चाक स्वतः बरोबर अनेक चाकांना फिरायला लावते. पण भोवऱ्याच्या फिरण्याचा इतरांना काडीचाही उपयोग नसतो. स्वतः भोवती फिरण्याच्या या पिंग्याच्या अनुषंगाने लेखकाने सुंदर चिंतन केलेले आहे.

‘थांब मरणा,’ या लघुनिबंधात मरणाशी लेखकाने संवाद साधला आहे. कोणत्या वेळी कुणाला भेटायला जावं याचं मरणाला तारतम्य नाही असे लेखक म्हणतो. ज्यानं आजन्म अहिंसेची पूजा केली त्याला पिस्तुलाच्या गोळीतून भेटलास, दहशतवादी क्रांतिकारक फाशीच्या फळीवर भेटायला आले तेव्हा त्यांना टाळलेस. असा लालित्यपूर्ण संवाद यात आहे.

गुलमोहर’ या लघुनिबंधात खिडकीसमोर मोकळ्या आणि हिरव्यागार मैदानाच्या कडेला एक गुलमोहर पाहून, त्याचे पुन:पुन्हा बहरणे पाहून लेखकाला अननुभूत सुखद क्षणांचा अनुभव होतो. त्याचे अतिशय सुंदर वर्णन यात केले आहे.

‘कारण यांतहि आनंद आहे’ या लघुनिबंधात संध्याकाळी घरी आल्यावर वाट पाहणारी विभावरीची, घरातील विविध सुखांची लेखक कल्पना करतो. प्रत्यक्षात त्यांचं लग्नही झालेले नसते. ते लिहित असतात एवढं मात्र खरं. स्वतःसाठी. केवळ स्वतःसाठी कारण यांतहि आनंद आहे! असे लेखक सांगतात.

तुमचं ठीक आहे बुवा’ या लघुनिबंधात तुमचं ठीक आहे बुवा या म्हणण्यातील एक प्रकारची सुप्त असूया असेल किंवा नसेल मात्र त्यात छोटीशी स्वतः बद्दलची कुरकूर असते असे म्हटले आहे. त्यात एक असमाधान आहे. आणि तेहि, उगाच, अकारण. स्वतःचं ठीक असलं तरी ते इतरांना भासूं द्यायचं नाही असा चमत्कारिक आग्रह त्यात असल्याचे लेखक सांगतात. दिनूअण्णा आणि विष्णूपंतांच्या संवादातून हा सुंदर लघुनिबंध लेखकाने विस्तारला आहे.

गजरा मोतियाचा’ या लघुनिबंधात चौकात दहा अकरा वर्षाची छोटीशी मुलगी हातात चार – सहा गजरे घेऊन विकायला उभी असते अशी सुरुवात केली आहे. जिचं वय डोक्यात गजरे घालण्याचं होतं, फुलं वेचून माळा करुन त्या गळ्यात घालून समवयस्क मुलींबरोबर नाचायचं होतं, ती सुकुमार मुलगी मोतियाचा गजरा विकत होती. ते पाहून लेखकाला आपलं फुलवेड आठवतं. त्याचं यात वर्णन केलेले आहे.

आठ अठ्ठावीस व सहा पांच’ या लघुनिबंधात मुंबईतील माणसं नेहमी गडबडीत असतात, धांदलीत असतात. त्यांच्या बोलण्यातले अनेक शब्द संक्षिप्त असतात. संदर्भाशिवाय कुणाला कळायचे नाहीत ते. टी एक्स आर, आय एल ओ, ३०५ अप असली संक्षिप्त रुपंच फार. मुंबईकरांचं जीवन खरोखरीच कसं संक्षिप्त आहे याचे यात वर्णन केलेले आहे.

‘पांची बोटे’ या लघुनिबंधात सगळ्या बोटांचं महत्त्व सारखंच आहे. पांची बोटं सारखीच नसतात. काही डावं – उजवं असायचंच या अनुषंगाने लेखकाने लालित्यपूर्ण शैलीत विस्तार केला आहे.

‘ओझेवाले’ या लघुनिबंधात एक ओझेवाला पाहून लेखकाला पृथ्वीचा भार उचलणारा शेष, खांद्यावर आकाश घेऊन उभा असलेला अॅटलस, राष्टांची धुरा आपल्या वृषस्कंधावर पेलणारे महापुरुष हे ओझेवालेच वाटू लागतात.

‘आषाढीचे खिन्न चांदणे’ या लघुनिबंधात आकाशातील उदासवाणा चंद्र कृष्ण मेघांच्या गर्दीत पाहून जे विचारतरंग उठले त्याचे स्वगत आहे.

‘वादळ’ या लघुनिबंधात वादळाचं चित्रण केलेले आहे.

‘ते तीन तास’ या लघुनिबंधात एस एस सी परीक्षेत लेखक पर्यवेक्षक म्हणून काम करत असताना त्या तीन तासात त्यांचं लक्ष एका मुलीकडे जाते. तिच्या सौंदर्याने त्यांचं मन वेधलं जातं. सौंदर्यासक्त मनाने निर्लेप मनाने त्याचा आस्वाद घेतात. असेच ते स्टेशनवर गाडीची वाट पहात असताना तेथील फुलांच्या सुंदरतेचा आस्वाद घेतात. या वृत्तीचे चित्रण त्यांनी यात केले आहे.

‘गोष्ट आहे एका संध्याकाळची’ या लघुनिबंधात संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दृश्य कशी दिसतात त्याचं मनोरम वर्णन केलेले आहे व संध्याकाळची गोष्ट सांगितली आहे.

आणि जर भाषाच नसती!’ या लघुनिबंधात जर भाषाच नसती तर फार बरं झालं असतं. लांबलचक कंटाळवाणी व्याख्याने ऐकावी लागली नसती. आकाशवाणीवरची कटकट बंद झाली असती. वृत्तपत्रांच्या मतांचा गलबला ऐकावा लागला नसता! असे भाषा नसती तर काय घडले असते त्याचे यात मजेशीर वर्णन केलेले आहे.

कात्री’ या लघुनिबंधात हरकामी बहुगुणी कात्री बद्दल लेखकाने ललित शैलीत लिहिले आहे व कात्रीचं महत्त्व अधोरेखित केले आहे.

माणूस’ हरवला आहे ‘ या लघुनिबंधात वर्तमानपत्रात ” हरवला आहे ”, ” निघून गेला आहे ”, ” ताबडतोब निघून ये ” अशा जाहिराती येतात त्या अनुषंगाने हरवलेला नारायण व नारायण हरवला आहे एवढी तरी लोकांना जाणीव आहे याचं वर्णन करतात.

‘पत्रं नव्हे भावगीतं !’ या लघुनिबंधात दूर कोकणात असलेल्या आईचं पत्र असतं दोनच ओळींचं पण त्यात तिच्या मनाचं मोठेपण लेखकाला जाणवते. त्या दोन ओळी लेखकाला ज्ञानेश्वरांच्या ओवीसारख्या एखाद्या छोट्या भावगीतासारख्या भासतात. एक पत्र असतं अनामिकेचे. त्यांच्या वाङमयकृतीचं अभिनंदन करणार्‍या रसिकेचं. एक असते त्यांच्या आजारपणात आलेले आंतर्देशीय पत्र. एक बहिणीचं पत्र. एक पत्नीचं पत्र. ही पत्र लेखकाला छोटी छोटी भावगीत वाटतात.

शुक्रवार’ या लघुनिबंधात त्यांना शुक्रवार का आवडायचा त्याची कारणे दिली आहेत.शुक्रवार बालाजीचा वार.त्या दिवशी चविष्ट काबली खात. चैत्रातले श्रावणातले नवरात्रीतले शुक्रवार आणि सुहासिनींचा मेळावा. शुक्रवार नंतर सुट्टी येते तो आनंद अशी कितीतरी शुक्रवार आवडण्यामागची कारणे लेखकाने दिली आहे.

अंधार’ या लघुनिबंधात त्यांना लहानपणी अंधाराची फार भीति वाटे ते नमूद केले आहे. या अंधाराच्या अनुषंगाने लेखकाने विविध पैलू उलगडून दाखविले आहेत.

म्हणे वेळ वाचवा’ या लघुनिबंधात रिकामपणी काय करावं हे ज्यांना सुचत नाही त्यांचा विचार मांडला आहे. विविध साधनं घेऊन वेळ वाचवला असे म्हणणाऱ्यांची उदाहरणे दिली आहेत. वेळ वाचवायची उदाहरणे दिली आहेत. कादंबर्‍यांच्या संक्षिप्त आवृत्ती वाचून वेळ वाचवणारे ते पाहतात. हा मोठा गमतीदार लघुनिबंध आहे.

‘दार उघड ‘ या लघुनिबंधात दार लावून बसलेल्यांना सूर्य सहस्रकरांनी सोनं उधळतो आहे,चंद्र शीतल दुग्धामृताचे हंडे ओततोय, पुत्रजन्माची वार्ता कोणी घेऊन आला आहे अशा विविध उदाहरणातून दार उघडायचे आवाहन करीत आहे. चार भिंतींच्या आत स्वतःला कोंडून घेणार्‍यांना त्यांनी दार उघडण्याचे आवाहन केले आहे.

वरील सर्व लघुनिबंधांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा छोटेखानी व आटोपशीरपणा आणि दुसरे लालित्यपूर्ण मनोवेधक मनोरम भाषाशैली. प्रत्येक लघुनिबंध वाचल्यानंतर आपल्याला एक सुखद अनुभूती आल्याशिवाय राहाणार नाही.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments