बालपण गेले लाड-लडिवाळात छान
किशोरावस्थेत खेळणे आणि मस्ती
भ्रांत कशाची ना, नाही दुःखी कष्टी
प्रेमाचे पाश सभोवती सतत असती
मित्र मैत्रिणी, शेजारी छान लाभले
होते अवती-भवतीचे आपले सारे
यौवनात करिअरचे घोंगावती वारे
वाटे नभातून आणावे तोडूनी तारे
शिक्षण झाले हवे तसे मनासारखे
सहचर शोधण्या घरच्यांची मग घाई
नाही त्रास पडला कुणाला खूप काही
तोही मिळाला अगदी हवा तसा बाई
फुले फुलली दोन निरागस अशी
कष्ट नाही पडले वाढविण्यासाठी
त्यांचेही झाले सर्व योग्य वेळी
नाही जबाबदारी आपल्या पाठी
नाहीच आली संकटे असे नव्हते
मनोबल, हिम्मत, बळकटी हाती
तसू भरही ढळले नाही जीवनात
सुसंस्कार,भगवंताची साथ होती
उर्वरित आयुष्य जावे निरोगी मस्त
सेवा आणि दानधर्माची आवड न्यारी
वेळही जातो सत्कारणी उत्तम त्यात
पुण्य गाठीशी थोडे, भरवसा देवावरी
आभार मानी माय-बाप, विधात्याचे
ज्यांनी घडविले आयुष्य एवढे सुंदर
नतमस्तक मी, दंडवत त्यांच्या ठायी
अपेक्षा ना राहिली जीवनी कणभर
परिपूर्ती झाली वाटे आयुष्याची
आता आली जवळी पंचाहत्तरी
सुख-समाधान मिळाले जीवनी
समाधानी आहे मी अतीव अंतरी

— रचना : डॉ. सौ. अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800