Saturday, March 15, 2025
Homeसेवामहान सेनानी : बेगम हजरत महल

महान सेनानी : बेगम हजरत महल

भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा शूरवीरांच्या पराक्रमाने आणि त्यांच्या हौतात्म्यांनी व्यापलेला आहे.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक महिलाही शौर्याने लढल्या. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, अरुणा असफली सारख्या साहसी महिलांचे अभिमानाने स्मरण होते. या पराक्रमी महिलांमध्ये एक नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे बेगम हजरत महल.

बेगम महल यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात उत्तम नेतृत्व आणि शौर्याच्या जोरावर ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले होते. इंग्रजांच्या तावडीतून लखनऊला वाचवण्यासाठी शूर योद्ध्या प्रमाणे ही क्रांतिकारी महिला लढली. वजीद अली शाह या अवधच्या शासकाची ती पहिली बेगम. तिला अवधची आन-बान शान मानले जात असे. ती सैन्य आणि युद्ध कौशल्यात निपुण होती आणि युद्धभूमीवर जाऊन ती स्वतः सैनिकांना प्रशिक्षण देत असे. विजयासाठी त्यांचे मनोबल वाढवत असे. अनेक संघर्षांचा सामना करून कुशल रणनीती आखून, इंग्रजांना परतून लावण्यासाठी तिने पराक्रमाचे शर्थ केली. प्रतिकूल परिस्थितीतही ती शरण गेली नाही.

तिचा जन्म १८२० मध्ये फैजाबाद इथे झाला. गरीबीमुळे ती हजरत महल या राजेशाही घराण्यात नृत्य करत असे. ती अतिशय सुंदर आणि लावण्यवती होती. अवधचा नबाब तिच्या सौंदर्यावर भाळला आणि तिला त्याने बेगम बनवले. १८५६ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नवाब वजीद अली शाह यांच्या अवध या राज्यावर कब्जा केला आणि त्याला बंदिवान केले. या घटनेनंतर बेगम हजरत महल ने कुशल शासक आणि रणरागिणीची भूमिका घेतली. राज्य आणि देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सात जुलै १८५७ रोजी इंग्रजांविरुद्ध युद्धाची ठिणगी पेटवली. ती धर्मभेद मानत नव्हती. तिने सर्व धर्मीय योद्ध्यांची एक प्रभावी फळी तयार केली. सर्वत्र तिने इंग्रजांविषयीची चीड निर्माण केली. त्यात राजे, शेतकरी, जमीनदार, युवक, ग्रामवासी आणि अनेक पराक्रमी महिला तिच्या या क्रांती युद्धात सामील झाले. स्वातत्र्याचा वणवा देशभर पेटविला. ब्रिटीशांनी धरपकड केली. हत्या केल्या. बेगमच्या कोठीचाही कब्जा घेतला. पण बेगम शरण गेली नाही.

दुर्दैवाने तिला तिचे राज्य आणि महाल सोडून जावे लागले. ती नेपाळ येथे निघून गेली आणि १८७९ साली काठमांडु येथे या रणरागिणीचे प्राणोक्रमण झाले.

भारतातील ती पहिली अशी मुस्लिम महिला होती जिने आपल्या धर्माचा पडदा दूर सारत इंग्रजांविरुद्ध मोर्चा उठवला आणि आपल्या राज्याची आणि देशाची आन-बान शान राखली.अभिमान जपला. ती देशासाठी जगली आणि देशासाठी प्राणही दिले. एक धडाडीची स्वातंत्र्यसैनिक म्हणून भारतीयांच्या स्मरणात बेगम महल हे नाव सदैव राहील !

जय हिंद !!

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments