महाराष्ट्र हे राज्य कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. आपल्याकडे वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची पिके पिकवली जातात. तसेच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोगही शेतकरी करताना दिसतात. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीही करताना काही शेतकरी आपल्याला दिसतात.
असाच एक अभिनव उपक्रम नागपूरजवळ असलेल्या मोहगाव झिल्पी येथील एका शेतकऱ्याने शासकीय नोकरीतून निवृत्ती झाल्यावर सेवी थांगवेल यांनी आपल्या शेतात केला. २००८ साली त्यांनी आपल्या २ एकर जागेत खजूर लागवड करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात त्यांनी पहिल्यांदा हा खजूर लागवडीचा प्रयोग केला आणि तो यशस्वी करून दाखवला. आज त्यांचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी राबवला आहे आणि आपल्याकडेही खजूर चांगला होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

बहुतांशी वाळवंटी प्रदेशात केल्या जाणाऱ्या खजूर शेतीचा हा प्रयोग विदर्भातील मातीत पहिल्यांदाच करून लाखो रुपयाचे उत्पादन घेऊन थंगवेल यांनी शेतकऱ्यांना एक आदर्श घालून दिला. रोप लागवडीपासून ०४ वर्षात खजुराचे उत्पादन मिळू लागते. कमी खर्चात ही लागवड होते.तसेच एकदा का झाडे फळे देऊ लागली की ७० वर्षे हे झाड उत्पादन देते. थांगवेल ह्यांनी ०२ एकर मध्ये १३० झाडे लावली आहेत. त्यासाठी त्यांनी तामिळनाडू येथे जाऊन खजूर शेतीचा अभ्यास केला. तिकडून रोपे आणली. एकतर, कमी पाणी आणि उष्ण हवामान हे खजूर पिकासाठी पोषक असल्याने विदर्भातील या वातावरणाचा फायदा सेवी थांगवेल यांनी करून घेतला.
आता त्यांना खजुराच्या एका झाडापासून ३० किलोपर्यंत उत्पादन मिळते. प्रत्येक वर्षी १५ जूनपासून खजुराचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. ह्या सर्व फळांची आसपाच्या मार्केटमध्ये विक्री होते तर यातील एक नंबरचे फळ परदेशात विकले जाते.

सुरुवातीला यासाठी खर्च खूप येतो. खजुराच्या शेतीसाठी गुजरात येथे शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते तर राजस्थान मध्ये ७५ टक्के अनुदान दिले जाते. आपल्या सरकारनेही यासाठी काहीतरी अनुदान सुरू केले पाहिजे असे थांगवेल यांचे मत आहे.अनुदान सुरू केल्यास अधिकाधिक शेतकरी याची लागवड करायला पुढे येतील असे थांगवेल यांना वाटते.
खजुराच्या शेतीमध्ये दुसरे आंतरपीक ही घेता येते. थांगवेल यांनी खजुराच्या शेतीसोबत ड्रॅगन फ्रूट, नारळ, भाजीपाला, सेंद्रिय खत निर्मिती, विविध प्रकारची फळझाडे लावली आहेत आणि ऍग्रो टुरिझमही सुरू केले आहे.

खजुराचे एक झाड ३० किलो पासून ९० किलोपर्यंत फळे देते. खजुराचे झाड इंग्लंडमधील प्रयोग शाळेत विकसित केले जाते .जगात खजुराच्या १७५ जाती आहेत. त्यातील बन्ही जातीच्या खजुराची सेवी थांगवेल यांनी लागवड केली आहे. इंग्लंडवरून आणलेली ही रोप राजस्थानमधील प्रयोगशाळेत आणून भारतीय वातावरणाला पोषक होईपर्यंत ठेवली जातात. त्यानंतर ही रोपे मागणीनुसार देशात पाठवली जातात.
खजुराचे फळ पौष्टिक असल्याने कोणत्याही आजारात डॉक्टर खजूर खाण्याचा सल्ला देतात.१ किलो खजुरांतून २९७० कॅलरीज मिळतात. खजुरामध्ये साखर, प्रोटीन्स,फायबर व्हिटॅमिन आणि कार्बोहार्ड्रेट्स ही मिळत असल्याने खजूर पौष्टिक मानला जातो. ही झाडे लावताना नर-मादी अशी झाडे लावतात.
सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन यासारख्या देशात खजूर लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जगातील इजिप्त हा देश दरवर्षी सर्वाधिक, म्हणजे १ दशलक्ष मेट्रिक टन खजूर उत्पादन करतो.
सेवी थांगवेल यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगाने आता महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या भागात खजूर लागवड केली आहे. सद्या महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव, जालना अशा अनेक भागातून ही खजूर लागवड सुरू झाली आहे.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
It’s a pleasure to have this kind of farmers who do not losses hope but try the best from there farms, to have the fruit or vegetable