Saturday, July 12, 2025
Homeसाहित्यदुर्मिळ पुस्तके : ६

दुर्मिळ पुस्तके : ६

“वेचलेले क्षण” भाग : ४

“वेचलेले क्षण” हे वा. गो. मायदेव यांचे आत्मचरित्र. व्हीनस प्रकाशनने १९६२ मध्ये प्रकाशित केले. ३१७ पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत तेव्हा आठ रुपये इतकी होती. वा. गो. मायदेव यांनी हे पुस्तक गुरुवर्य डॉ महर्षि अण्णासाहेब कर्वे यांना समर्पण केले आहे. बालपण, पुण्यात पदार्पण, उच्च शिक्षण, सेवेचा प्रारंभ, बरेवाईट प्रसंग, अकल्पित घटना, नवे उद्योग व उपद्व्याप, प्राध्यपकाचा प्रचारक बनलो, गोडकडू अनुभव, आश्रम निवृत्तीनंतरचे कांही, तीन महत्त्वपूर्ण घटना, पुन्हा प्राध्यापक, गेली चार वर्षे व उपसंहार अशा १४ प्रकरणांमध्ये हे आत्मचरित्र आहे.

आश्रम निवृत्तीनंतर

१९४२ मध्ये गहाण असलेली शेते व घर सोडविण्याची बरीच खटपट करावी लागली. १९४२ मध्ये त्यांचा मुलगा सुधाकर हा शेतकी काॅलेजची इंटरमीजिएटची परीक्षा पास झाला. त्या दरम्यान Quit India चळवळ सुरु झाली होती. मुंबई सरकारच्या आरोग्य खात्याने काॅलरा, देवी, हिवताप, नारु व प्लेग अशा रोगांवर ध्वनिमुद्रिका काढाव्या असे ठरवले. त्यासाठी मायदेवांनी गाणी घालून संवाद लिहिले. त्यांचा मुलगा सुधाकर Quit India चळवळीत अटक होऊन सहा महिन्यांची शिक्षा भोगून १९४३ मध्ये तुरुंगातून सुटला. १९४४ मध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाने मॅट्रिकला व नागपूर विद्यापीठाने एम ए ला मराठीचे परीक्षक म्हणून नेमले. १९४६ मध्ये मुंबईतील हिंदू – मुसलमानांमधील दंग्याचे स्वरुप धोक्याचे होते. १९४२ मध्ये ठाकरसी महिला विद्यापीठाचा रौप्य महोत्सव झाला. सावरकरांच्या कविता त्यांनी संपादित केल्या. २२ एप्रिल, १९४५ ला सीताराम पाटकर वारले. ६ आॅक्टोबरला हिंगण्याचे अनाथबालिकाश्रमाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्या वेळी मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान बाळासाहेब खेर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. त्यावेळी मायदेव यांनी “वृक्षराजास” ही कविता लिहिली. १९४२ मध्ये त्यांनी यशवंत मासिकात कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहावर “हा घ्या ताजा पुरावा” हा परीक्षणपर लेख लिहिला. फेब्रुवारी, १९४४ मध्ये “किलबील” हे लहान मुलांच्या कवितांचे पुस्तक श्री ढवळे यांनी छापले. जानेवारी, १९४६ मध्ये “अर्वाचीन मराठी कविता” या विषयावर आर्य महिला समाज, गिरगाव येथे ६ दिवस त्यांची व्याख्याने झाली. “मराठीतील काही अमर भावगीते” या विषयावर विवेकवर्धिनी हायस्कूलच्या मागील पटांगणात व्याख्यान झाले.

तीन महत्त्वपूर्ण घटना

२० जुलै, १९४८ रोजी मुंबई सरकारने त्यांचे नाव “जस्टिस आॅफ दी पीस” व “आॅनररी प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट” या पदांसाठी सुचवण्यास हरकत नाहीना याबद्दल विचारणा केली. १९४९ मध्ये त्यांची त्या पदांवर नियुक्ती झाली. त्या दरम्यान त्यांची मुलगी सिंधू वारली. २० मे, १९४९ रोजी त्यांना हदयविकाराचा झटका आला. १८ एप्रिल, १९४८ रोजी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब) यांचा ९० वा वाढदिवस होता. ३० /१/१९४८ रोजी दिल्लीत महात्मा गांधी यांचा खून झाला. नंतर वातावरण निवळले. १८ एप्रिलला सर्व भारतभर सभा बोलाविण्यात आल्या. त्यात अण्णांचे अभीष्टचिंतन करण्याचे ठरले. डॉ राजेंद्रप्रसाद हे अध्यक्ष म्हणून लाभणार होते. गवालिआ टँकवर समारंभ थाटात पार पडला. समारंभात मुंबई सरकार ठाकरसी महिला विद्यापीठाला सहा लाख देत असल्याची आनंदाची बातमी बाळासाहेब खेर यांनी भाषणात सांगितले. तसेच या विद्यापीठाला सरकारची मान्यता देण्याचे अभिवचनही दिले. गुरुवर्य अण्णासाहेब कर्वे यांना करंडकासह मानपत्र व एक लक्ष रुपयांची थैली देण्यात आली. १९४८ मध्ये त्यांचा” भावविहार” हा कविता संग्रह सद्भक्ति प्रेस, मुंबई यांनी छापला. मार्च, १९४९ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्यासाठीही मायदेव यांनी कार्य केले. साने गुरुजी ज्यांचे विद्यार्थी होते त्या कवि राधारमण म्हणजे कृष्णाजी पांडुरंग लिमये यांच्या कविता प्रकाशनात त्यांनी हातभार लावला. अहमदाबादच्या कवितागायन कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या कवितांची पुस्तके, वह्या, सामान सौराष्ट्र मेलमध्ये कसे राहीले व परत मिळाले आणि झालेली फटफजिती याचे यात वर्णन केले आहे.

पुन्हा प्राध्यापक

३० डिसेंबर, १९५४ रोजी त्यांची डाॅक्टर मुलगी विमल हिचा विवाह डॉ शंकर पांडुरंग सारंगधर यांच्याशी झाला. १९ जानेवारी, १९५५ रोजी त्यांची धाकटी बहीण कुसुम लंडनमध्ये वारली. १९५२ मध्ये त्यांचे लहान मुलांच्या गाण्याचे “क्रीडागीत “व “छंदगीत” ही पुस्तके श्री ढवळे यांनी छापली. १३ आॅक्टोबरला गिरगावात कविता गायन प्रसंगी सेनापति बापट हे उपस्थित होते. मुंबईच्या सद्भक्ति प्रेसचे श्री लक्ष्मीकांत दाभोळकर यांनी ५ जुलैला त्यांचा “भावविहार” हा कविता संग्रह छापला. १९५५ मध्ये त्यांनी “एकनाथ” ही एका पोष्टमनवर दीर्घ काव्यकथा लिहिली. पुढे “नामदेव” नावाची आणखी एक दीर्घ काव्यकथा लिहिली.

गेली चार वर्षे १९५८-१९६१

२ मार्च, १९५८ रोजी त्यांच्या मुलाचा बापूसाहेब थत्ते यांच्या नूतन कुटुंबाचे धाकटे विधवा बहिणीबरोबर लग्न झाले. अण्णासाहेबांच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने स्वागत समितीत त्यांनी कार्य केले. यावेळी अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरु हे होते. १४ फेब्रुवारी, १९५९ हा त्यांचा काॅलेजचा शेवटचा दिवस. त्यांच्या अथक प्रयत्नाने श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १० जानेवारी, १९६० रोजी सर सीताराम व लेडी शांताबाई पाटकर काॅन्व्होकेशन हाॅल चे नामकरण व उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. पुन्हा त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत मानधनावर काम केले. १९६० मध्ये त्यांचा “भावपरिमल” हा चौथा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. “उपसंहार” यात त्यांनी त्यांचे प्रचारकार्य, आर्थिक प्राप्ति व मिळविलेल्या देणग्यांचे प्रमाण, त्यांची कविता, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचे मुंबईचे शेजारी, त्यांची मुले, त्यांची पत्नी व स्वतःविषयी चिंतन मांडले आहे. शेवटी मृत्यूला उद्देशून ते म्हणतात, “ये जेव्हा येणार ! मंगला ! ये जेव्हा येणार”
“आल्यावरती खोटी क्षणभर नाहि तुझी करणार !” तर असे हे ३१७ पृष्ठांचे आत्मचरित्र !

वा गो मायदेव यांच्या अनेक कविता गाणी जुन्या पिढीतील पाठ्यपुस्तकांमध्ये आलेल्या आहेत.”चला सुटी झाली” हे बाल गीत तर अगदी प्रसिद्ध आहे. अरुण वाचन५ मध्ये “चिमणा चंद्र”, काव्यविलास मध्ये “खचतो माझा धीर” बालबोध वाचनमाला ७ मध्ये “घे कुठार” या कविता जुन्या पिढीतील लोकांना आठवत असतील. “गाई घरा आल्या” या कवितेने ते घराघरात पोहोचले होते. त्यांचे भावतरंग, अभिनयगीत, शिशुगीत, भावनिर्झर, बालविहार, क्रीडागीत, छंदगीत, भावपरिमल हे कविता/गीत संग्रह प्रसिद्ध आहेत. भा. रा तांबे यांची कविता भाग १व २ चे त्यांनी संपादन केले आहे.त्यांची सावरकरांची कविता, सावरकर – काव्य समालोचन ही पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत.

आयुष्याच्या अखेरच्या पर्वात ते पुण्याहून मुंबईला आले. गिरगाव मधील चाळीत एका खोलीत ते राहत असत. खाणावळीत जेवण करायचे. त्यांचे दि ३० मार्च, १९६९ रोजी निधन झाले. या कवीला आदरांजली !

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments