अकरा वेळा कळसूबाई शिखर सर करून विश्व विक्रम नोंदविणाऱ्या आणि परत एकविस वेळा कळसूबाई सर करून स्वतःचाच विक्रम मोडणाऱ्या दिव्यांग अंजनाताईना नमन आहे.
अंजना ताईचे एक वाक्य त्यांच्यातील आत्मविश्वासाची प्रचिती देणारं आहे. त्या म्हणाल्या, “माझं शिक्षण M A Bed पर्यंत झालं आहे आणि मी समाजाच्या दृष्टीने साठ टक्के दिव्यांग आहे”. असं म्हणताना अंजनाताईंच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे भाव होते. दिव्यांग शब्दाला त्यांनी आपल्या विक्रमी कृतीने नवा बळकट अर्थ दिला आहे.
अंजनाताईंनी आज आमच्या क्लिनिक ला भेट दिली. अंजनाताईंशी मनमुराद गप्पा झाल्या. अगदी शांत, चेहऱ्यावर स्मित हास्य आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत अश्या अंजना ताई आहेत.
ताई आपला जीवन प्रवास उलगडताना म्हणाल्या, “माझा जन्म मापेगाव, ता. परतूर जिल्हा जालना येथे झाला. गावात रस्ते, वीज, पाणी यांची वानवा. आईवडील मजुरी करत. आम्ही चार भावंडे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे मी ही सुरुवातीची काही वर्षे मस्त उड्या मारत, खेळत-बागडत घालवली. बहीण सर्वात मोठी. मी लहान. मला घरी एकटीला सोडून तीला शाळेत जाता येत नसे म्हणुन ती मला सोबत न्यायची. त्यामुळे माझं ही नाव शाळेत खूप लवकर घातले गेले.
लहान असताना आई किंवा वडिलांनी खाऊसाठी 5 किंवा 10 पैसे दिले की मी आनंदाने पळत पळत दुकानात जाऊन गोळ्या, बिस्कीट घेऊन यायची. दुकानदार चाचाने नेहमीच म्हटलेलं आठवत “छोरी जरा धिरे से आया जाया कर” आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना आता अंजना ताईच्या हसऱ्या चेहेऱ्यावर हळूहळू एक दुखद रेष उमटू लागली होती. त्या म्हणाल्या, “नीटस आठवत नाही पण साधारणपणे मी दुसरी किंवा तिसरी ला असतांना अचानकपणे मला खूप ताप आला. काही केल्या ताप उतरत नव्हता. घरगुती उपाय करून झाल्यावर डॉक्टरकडे नेले असता चुकीच्या इलाजामुळे मला पोलिओ झाला. आईवडिलांच्या पायाखालची जमीन हादरली. जेवढे डॉक्टर, हकीम, वैद्य, बाबा, अंगात येणाऱ्यांकडे दाखवून झाले, अमावस्या-पौर्णिमेला खेटे मारून झाले, उकिरड्यात पुरून झाले, उपास-तापास, नवस साकडेे जो जे जे सांगेल ते ते त्यांनी केलं. फक्त आपली मुलगी बरी व्हावी म्हणून, वडील मला इलाजासाठी रोजंदारी बुडवून कितीही लांब असले तरी खांद्यावर, कडेवर घेऊन दिवसभर वणवण फिरायचे. शक्य होईल तेव्हढे उपाय करुन झाले. सर्वात शेवटी परभणीच्या डॉक्टरांनी सांगितले यावर काही ही ईलाज नाही आता तुम्ही असं फिरणं सोडा. शेवटी पोरींचे नशीब म्हणून वडिलांनी हात टेकले.”
“मला चांगलंच आठवत, आई मला सकाळी शेतात जाताना पडवीत बसऊन एका वाटीत दुधभाकरीचा काला करून ठेऊन जायची. दिवसभर मी रस्त्याकडे आई परतण्याची वाट पाहायची पण अन्नाचा एक कण खात नसायची, माशा मात्र दिवसभर त्या काल्यावर भूणभूण करत असायच्या. येता-जाता लोक मला पाहून हळहळत. कस होईल या पोरीचं, देखो ना कितनी मासुम बच्ची हैं पर लुली है… ते शब्द चांगले आठवतात.. पण मी शून्यात असल्या सारखे असायचे.”
अंजना ताई समोर त्यांचा भूतकाळ जणू जिवंत झाला होता. धावणारी, पाळणारी, बागडणारी छोटी अंजना एकाएकी स्तब्ध झाली होती. एका जागेवर बसून पळणारी माणसं बघत राहणं त्या छोट्याश्या जीवाला कसं सोसलं असणार. या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप झाला.
पहिली ते तिसरी त्यांचं शालेय शिक्षण गावातील एकमेव असणाऱ्या शाळेत झालं. संपूर्ण शाळेतच नाही तर गावात त्यांना हुशार म्हणून ओळखत असत.. गुरुजी काहीतरी लिखाण काम करत तेव्हा पूर्ण वर्गातील सर्वच मुलांसमोर उभे राहून पाढे म्हणुन घ्यायची जबाबदारी त्यांच्यावर असायची. त्याचा अंजना ताईंना अभिमान वाटायचा. कारण एकतर ही संधी कोणाला दिली जात नसायची कारण बऱ्याच जणांना पाढे येत नसत. त्यामुळे इतरांना हेवा वाटायचा त्यांचा..शेतात जाताना व येतांना गावकरी दिसायचे व ते शाळेतील त्यांची प्रगती पहायचे. त्यांचं उदाहरण देऊन स्वतःच्या मुलांना पाढे पाठ करायला सांगत.
शाळा गावाच्या बाहेर जरा लांब होती. दिवसभर शाळा त्यामुळे पाणी पिण्यासाठी घरी यावे लागायचे. ज्याची घरे जवळ त्यांच्या घरी पाणी पिण्यासाठी जावे लागत असे त्यावेळी त्या मैत्रिणी आग्रह करून त्यांच्या घरी घेऊन जात. शाळेत पाणी, शौचालय याची सोय नव्हती.
शाळेत 26 जानेवारीला सर्व मुलांना गणवेश वाटप केला जाई तो वर्षभर वापरावा लागे, पण त्यांना मात्र 15 ऑगस्ट ला सुद्धा गणवेष मिळत असे.15 ऑगस्ट ला सर्व मुलांची गावातून मिरवणूक निघत असे. सर्वात पुढे नवीन गणवेष घालून ताई असे, तेव्हा गावातील लोक कौतुकाने बघत असत व म्हणत ही मुलगी लय हुशार आहे. शालेय जीवनातील या आठवणी सांगताना अंजना ताई शाळेच्या नवीन गणवेशात शिरल्या होत्या आणि त्या शिक्षण घेऊ शकल्या या बाबत कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी शाळेत पाठवलेच नसते तर ? जर मला माझ्या गावातील लोकांनी, सोबत्यांनी किंवा गुरूजींनी झिडकारले असते तर मी कधीच शाळा बंद केली असती. त्यामुळे मी माझे प्रथम गुरुजी व समस्त गावकरी ज्यांच्या मुळे मला शाळेत, गावात आदर, सन्मान मिळाला त्यांची मी ऋणी आहे”.
अंजनाताईला सरावाने घरातील कामे जमू लागली. आई शेतातून येईपर्यंत त्या झाडझुड करून ठेवत. अंगणात पाणी शिंपडून ठेवत. कोरडवाहू शेती, रोजच कामे मिळत नव्हती, कधीकधी गोदामाई उग्र रूप धारण करत असे त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. दिवसेंदिवस कमावणारे दोन आणि खाणारी तोंडे चार. शिक्षण खर्च वाढतोय यात भागणार कसे काहीतरी करायला हवे, म्हणून वडिलांनी खूप विचार करून गाव सोडले. वडील त्याकाळी चौथी शिकलेले होते. इथेच राहिलो तर पोट भरतील पण मुलांना जर चांगले शिक्षण द्यायच असेल तर शहरात जावे लागेल.आणि ते सगळे नाशिकला लहान काकाकडे आले. काही दिवस काकांजवळ राहिल्या नंतर गांधीनगर ला भाड्याच्या रुममध्ये गेले. आई-वडील रोज कामासाठी सकाळी जायचे व रात्री घरी यायचे. ताई व त्यांचे भाऊ दिवसभर घरी बसून काय करणार म्हणून चुलीसाठी लाकूडफाटा, शेण, गोवऱ्या गोळा करत. त्यावर एक दिवसाचा स्वयंपाक होत असे. रॉकेल विकत घेऊन स्टोव्ह वापरण्यापेक्षा चूल वापरत असू तेवढेच दोन पैसे वाचतील म्हणुन.
अचानक त्यांचे वडील आजारी पडले. सर्व ताण आईवर येत होता. मग कमी वय असूनही त्यांची आई बहिणीला कामाला घेऊन जाऊ लागली. ती लहान असल्यामुळे तिला अर्धी रोजंदारी मिळत असे. खाली घरमालक कुटुंबासोबत राहत होते. खूप समजदार होते त्यांनी ताईच्या कुटुंबाला मानसिक आधार दिला. योग्य वेळी योग्य सल्ला देत गेले.. वडील हळूहळू आजारातुन बरे झाले. या आजारपणात आई व बहिणीने खूप कष्ट करून वडीलाना खूप पैसा लावला. योग्य ट्रिटमेंट मुळे जीवदान मिळाले.
गंगापूर रोड पासून कॉलेज रोड च्या शाळेत त्या रोज पाई जात असत. त्यांचे चालणे म्हणजे त्या डाव्या गुढघ्यावर हात ठेऊन तिरक्या चालत. म्हणुन त्यांना आणखी जास्त वेळ लागत असे. रोज सात किलोमिटर जाणं येणं हा प्रवास पायी करत होत्या. त्यांची ही इच्छाशक्ती बघून सर्व थक्क होत.
ताई जिथे राहत होत्या तिथल्या एका आजीने त्यांच्या नाती सोबत खेळण्यास बोलावले. आई-वडिलांच्या परवानगी ने शाळा घरकाम, करून ठराविक वेळात ताई त्यांच्याकडे जाऊ लागल्या. ते बघत होते, अंजना ताई खूप छान काम करतात आणि त्यांना त्यांचा स्वभाव देखील आवडला म्हणून त्यांनी ताईला जिना झाडन्याचे काम दिले. अमुक एवढी रक्कम देऊ केली. हे एकून ताईला खूप आनंद झाला कारण त्यांना काम करून घरासाठी हातभार लावायचा होताच. ते त्यांच्या आयुष्यातील पहिले काम होते इयत्ता चौथीपासून कोणाकडून काही फुकट मदत घेतली नाही. त्यांची शिक्षणातील आवड बघून ते काळे काका- काकू त्यांना रोज अभ्यासाला घरी बोलवत. त्या पूस्तकी ज्ञान तर देत होत्याच पण जगात कसे वावरायचे, कसे लोक असतात, हे जास्त शिकवत होत्या, जास्तीत जास्त शिकवण त्या द्यायचा प्रयत्न करत होत्या.
ताईला वेगवेगळ्या कला शिकायला खुप आवडत असे. त्यासाठी नेहमीच प्रोत्साहन, मार्गदर्शन देत असत.
त्या 10 वी पास झाल्या. घरात लाईट नव्हती. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड दारात पडायचा म्हणून ताई दारात बसून अभ्यास करायच्या. दिवसभर शाळा,बाहेरचे काम व घरातील काम करून अभ्यासाला रात्रीच वेळ मिळायचा झोप येईपर्यंत लिखाण-वाचन करत असत. सगळ्यात शेवटी झोपणे आणि सगळ्यात अगोदर उठणे हा त्यांचा दिनक्रम ठरलेला.
सकाळी आईला उठून टिफिन करायचा त्रास नको म्हणून त्या रात्रीची पोळी/भाकरी सोबत लोणचे किंवा चटणी नेत असे.
ताईचे राहणे स्वच्छ व टापटीप असल्यामुळे शाळेत कधीच कोणाला त्यांच्या आर्थिक परिस्थिती चा अंदाज येत नसे. नवीन पुस्तके कधी घेऊ शकले नाही. भावाची जुनी पुस्तके छान पेपर चे कव्हर वडील लावून द्यायचे ते वापरत असे. वह्या साध्या असल्या तरी अक्षर वळणदार होते. सुंदर हस्ताक्षरासाठी शाळेत बक्षिस मिळाले होते. चित्रकलेची खूप आवड होती पण वेगळा क्लास लावू शकले नाही याची खंत त्यांना अजूनही वाटते. मेहंदी, निबपेंटींग, आरेवर्क, ग्लासपेटींग, फ्लॉवरमेकींग, लोकरी टॉइज, शिलाई मशीन असे विविध कोर्स त्यांनी कामातील साठवलेल्या पैशातून केले.
एका मोठ्या फळवाल्याकडे ताई पार्ट टाईम जॉब करत. त्यांच्या मालकाच्या मुलाची सायकल तो दर रविवारी दुपारी जेवायला घरी येतांना आणत असे. पण सायकल ला हात लावू देत नसे. तो आला की ताई त्याला पटकन जेवण वाढून देत असे व गुपचूप सायकल एकटीच शिकत असे. रेंजरं सायकल शिवाय मध्ये दांडी तरीही त्या ती सायकल शिकल्या. एकदा शिकत असताना काटेरी झुडुपात पडल्या, सर्वांगाला काटे टोचले पण पटकन उठून सायकल वेळेच्या आत जागेवर ठेऊन दिली.
कित्येकदा पडल्या, जखमा झाल्या पण ताई सायकल शिकल्या. किती सकारात्मक तडफड होती ही अंजना ताईंची मनाचे पंख लेऊन उंच भरारी घेण्यासाठीची !
अकरावीला त्यांनी जुनी रेंजरं सायकल घेतली. ज्यावर खूप रुबाबात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कारण एकतर रेंजर सायकल जि फक्त मुले चालवत ती ताई चालवत असे. त्याचे सगळ्यांना खूप कौतुक वाटायचे. एक टप्पा पूर्ण झाला होता पण अडचणी दमत नव्हत्या आणि ताई पण सज्ज असायच्या अडचणीचा सामना करण्यासाठी.

ताई पुढचा प्रवास सांगू लागल्या. “तिथून पुढे खऱ्या अडचणी सुरू झाल्या. मला कॉमर्स घेऊन पदवी घ्यायची पण ते शिक्षण परवडणारे नव्हते म्हणून योग्य माहिती, मार्गदर्शन मिळाले नाही. शाळेतील काही मुलींनी महिला कॉलेज निवडले मी ही तिथेच आर्ट्स ला ऍडमिशन घेतले. कॉलेज च्या वेळेपर्यंत जॉब त्यानंतर कॉलेज व नंतर घरातील काम. असे करत बारावीला फर्स्ट क्लास मध्ये पास झाले .अकरावी, बारावी अशी दोन वर्षे शास्त्रीय संगीत शिकले.
अंबेजोगाई या ठिकाणी बी एड ला नंबर लागला. समाजबंधूंनी सर्व मदत करू असे आश्वासन दिले पण पहिल्यांदा मी घराबाहेर कशी राहणार ? म्हणून घरून विरोध झाला. खूप समजावून सांगितले तरी घरातील कोणीही सोबत यायला तयार झाले नाही आणि माझी संधी गेली. गव्हर्नमेंट जॉब शोधणे सुरू झाले, फॉर्म सुटले की फॉर्म भरून पाठवणे, D. D. काढणे, परीक्षा देणे, पास होणे, मुलाखती ला बोलवले जायचे सगळं व्यवस्थित पार पडत असे त्यावेळी हवे असणारे पैशाचे वजन किंवा मोठया लोकांच्या ओळखी नसल्यामुळे कळवू म्हणून बोळवण होत असे. असे कित्येक नकार पचवलेत. आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे अश्या गोष्टीना आळा बसला आहे पण माझ्यावेळी सरासपणे पैशांची देवाण-घेवाण होऊनच नोकरी मिळायची.
नोकरीसाठी आवश्यक म्हणून न परवडणारी फी भरून M.S.C.I.T केले. MA झाल्यावर मी एका लेडी ब्रोकर कडे ऑफिस असिस्टंट म्हणून 1200/- महिन्याने पार्ट टाइम नोकरी पकडली. त्यांचा स्वभाव अत्यन्त कडक होता. खूप भीती वाटायची मला. सुरुवातीला मला, त्यांनी सगळी कामे शिकवली. त्यांच्याकडे खूप शिकायला मिळाले. त्यांचे आभार. कारण माझ्यासारख्या दिव्यांग मुलीला त्यांनी नोकरी दिली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण कुठेही गेले तरी जवळपास सर्वच ठिकाणी फक्त अपंगत्व पाहिले जायचे. नोकरी सुरु होती, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होते, Bed करायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. CET परीक्षा दिली. चांगल्या मार्कानी पास झाले. माझ्या इच्छा प्रमाणे मराठा कॉलेज मध्ये नं लागला. पण भरमसाठ फी होती. आता माघार घेणार नव्हते. इतके पैसे स्वतःजवळ नव्हते दोन्ही भाऊ सेटल झाले होते. बहीण दाजी पैसे द्यायला तयार झाले होते पण त्यांच्याकडुन उसने पैसे घ्यायला नकॊ वाटत होते. मोठया भावाला रिक्वेस्ट केली उसने पैसे दे म्हणून. तो तयार झाला. कमी पडणारी रक्कम त्याने दिली. ऍडमिशन घेतले पण वर्षभरात बराच खर्च होणार होता लहान भाऊ ही मध्ये मध्ये पैसे देत होता. मी ते सर्व हिशोब लिहून ठेवत होते कारण मला ते सर्व पैसे परत करायचे होते. 64% मिळवून उतीर्ण झाले.
अपंग आहे म्हणुन आतापर्यंत मी कधीही कोणतीही सवलत घेतली नव्हती. B.ed झाल्यावर अनेक प्रयत्न केले, अनेकांकडे नोकरीसाठी शब्द टाकले पण यश आले नाही. सर्वांनि आश्वासने दिलीत ती अजूनपर्यंत तिथेच आहेत. प्रयत्न अजूनही चालू आहेत. ब्युटी पार्लर चा कोर्स केला. पार्लर चालू केले पण स्वभाव शांत असल्यामुळे उधारी वाढत गेली.. मग तो व्यवसाय बंद केला. घरी शिकवण्या घेतल्या 3/4 बॅच घेत होते पण कामगार वस्ती असल्यामुळे कोणी वेळेवर फी देत नव्हते. सगळ्यात कमी फी असूनही दिली जाईना. मग फ्री शिकवणे सुरू केले.
साईटवर राहणारे कुटूंब स्वतःच्या घरात आनंदाने राहू लागले. पण माझ्या कोणत्याच समस्या सुटल्या नाहीत. मी शिकत राहिले, मी एकतर्फी लढत राहिले, मी झगडत राहिले एकतर्फी. मावस भावाने 8 दिवसात गाडी शिकवली. भित्रा स्वभाव होता पण आता चारचौघात वावरू लागले, मनातील भीती हळूहळू दूर होत गेली, थोडासा आत्मविश्वास वाढत गेला, परीक्षा बाहेरगावी असेल तर एकटी न जाणारी आता बसने एकटीने प्रवास करू लागली. अडचणीत मार्ग शोधू लागली, योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळाला तर जीवनातील बरेच निर्णय घेण्यात सोपं जातं.
मी कधीच स्वतःला काय हवं काय नको, माझं अस्तिव काय, माझा मान, अपमान याचा विचार केला नव्हता. स्वतःचे प्रॉब्लम स्वतः फेस करत होते. या साठी घरून कधीच साथ, होकार भेटला नाही मी माझ्यासाठी काही कराययला गेली तर सगळेच बोलत असत, पण घरातील सर्व स्वयंपाक, धुनी -भांडी बाकीचे काम मीच करत होते, जास्तीत जास्त वेळ घरच्या कामासाठी, येणाऱ्या पाहुण्याच्या खान, पिणं, यासाठी देत होते. पण आता दुसऱ्यांचे सल्ले घेऊ लागले. सतत दुसऱ्यांचा विचार करणारी मी, दुसरे आपला कितपत विचार करतात हे देखील लक्षात येत गेले.
नोकरी मिळत नाही म्हणून मनाने खूप खचले, स्वतःचाच राग येऊ लागला होता”. असं बोलून ताईंनी लांब श्वास घेतला आणि थोडा वेळ शांत होत्या. अंजना ताईंनी केलेला हा संघर्ष ऐकुन दीव्यांग असल्यामुळे खूप वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ही बाब माझ्या लक्षात आली होती. आता ताई परत उत्साहाने त्यांचा पुढील यशस्वी प्रवास सांगू लागल्या.
“2016 ला फेसबुक वर एक पोस्ट पाहिली शिवऊर्जा प्रतिष्ठा चे गाढे सर कळसुबाई या शिखरावर अपंगांसोबत नवीन वर्ष साजरे करणार होते. मला कुतूहल वाटले मी हिम्मत करून फोन करून विचारले तर गाढे सर खुप छान बोलले. तू मनात आणले म्हणजे अर्धा गड सर केलास..बिनधास्त सामील हो आम्ही आहोत, घरून परमिशन घेऊन गेले. आयुष्यात डोंगर काय असतो ते प्रत्यक्षात समजले, प्रोत्साहन देऊन सरांनी व इतर सोबत्यांनी साथ दिल्यामुळे महाराष्ट्र मधील सर्वात उंच शिखर मी पार केले माझं मलाच नवल वाटलं. घरी आल्यावर खूप थकले, पाय खूप सुजले, आठ दिवस खाली बसून जेवता आले नाही पण कामावर सुट्टी घेतली नाही ऑफिस मध्ये ही सर व मॅडम ने माझं कौतूक केलं. इतकं कौतुक झाले की त्या वेदना आनंदात परावर्तित झाल्या.

कळसुबाई सर करण्याचा विचार आणि तो सगळा रोमांचक प्रवास.अंजना ताईंनी त्यातून साधलेला आत्मविश्वास खरंच खूप प्रेरणादायी आहे. ताईंनी कळसूबाई चा अनुभव मांडला आहे.
“कळसुबाई” महाराष्ट्र मधील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर !! समुद्रसपाटीपासून उंची 1646 मीटर. ज्यांना ट्रेकिंग व भटकंती ची आवड असते त्या सुदृढ प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते एकदातरी कळसुबाई शिखर सर करायचे. माझे ही हे स्वप्न होते मला खरंच कधी एखाद्या डोंगरावर जाता येईल का ? आणि मला ती संधी मिळाली, मग काय केली सुरुवात आणि ट्रेकिंग ची आवड निर्माण झाली मग जमेल तसं वेगवेगळ्या ग्रुप सोबत किल्ले चढत गेले, इतिहास समजून घेऊ लागले.
काहीतरी करायचे होते जे मला स्वतःला सिद्ध करेल, माझी मला ओळख होईल असं काही आणि मार्गदर्शन घेत गेले..

मग ठरवले महाराष्ट्र मधील सर्वात उंच शिखर 11 वेळा सर करायचे जे धाडस माझ्यासारखी दिव्यांग मुलगी करणार होती, सुरुवातीला प्रेमापोटी, काळजीपोटी, ईर्षेपोटी विरोध झाला. पण संयमाने निर्णयावर ठाम राहून 31 डिसेंबर ला निरोप देत नवीन वर्षाच्या संकल्पाला अनेक अडथळे दूर करत आलेल्या संकटांवर मात करून सुरुवात केले…
1 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 या कालावधीत ही मोहीम पूर्ण करायची होती. पण अवघ्या 75 दिवसांतच 11 वेळा पूर्ण करून “ब्रॉहो इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” यामध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली.
या 11 मोहिमांमध्ये अनेक अनेक कटू-गोड अनुभव मिळाले. खूप काही शिकायला मिळाले. खूप चांगली माणसे जोडली गेली. यामध्ये अनेकांनी मदत, सहकार्य, मार्गदर्शन व पाठिंबा दिला आणि मी माझे वर्ल्ड रेकॉर्ड चे स्वप्न पूर्ण केले.

आतापर्यंत मी कळसुबाई शिखर 21 वेळा सर केले आहे. जगातील सर्वात खोल दरी म्हणजे “सांधण व्हॅली” मी पूर्ण खाली उतरून परत वर आले. अत्यंत अवघड असणारा “हरिहर” मार्कन्डय पर्वत, स्वराज्याची राजधानी असलेल्या “तोरणा”, अर्थातच प्रचंड गड साताऱ्याचा “सुंदरगड” अर्थात दातेगड, लोणावळा येथील “लोहगड” जयपूर चा “आबेर फोर्ट” कोकणातील सिंधुदुर्ग, खैराई,अंकाई, टंकाई, अंजनेरी, रामसेज, ब्रह्मगिरी, रायगड, प्रतापगड, घारगड, मांगी-तुंगी, चांभार लेणी, पांडव लेणी, दौलताबाद, वेरूळची लेणी, कारल्याची लेणी (एकविरा, लोणावळा), मार्कन्डय-वणी नाशिक, कावणाई
कोराई-लोणावळा, रतनगड, सागरी जलदुर्ग- जंजिरा, कुलाबा, खान्देरी-उंदेरी, पदमदुर्ग, रेवदंडा,कोरलाई, सुवर्णंदुर्ग, फत्तेगड, कणकदुर्ग आणि गोवागड अजूनही संधी मिळेल तसे अनेक किल्ले सर करून इतिहास जाणून घ्यायचा आहे. आम्ही गडावर स्वछता मोहीम राबवत असतो. आणि वृक्षारोपण ही केले जाते.

फक्त 20 दिवसांत स्विमिंग शिकले आणि त्या 20 दिवसाच्या बेसिक शिकण्यावरच मुंबईत झालेल्या स्पर्धेत 2 मेडल मिळवले!!! आणि तिथेच माझं पुढील स्पर्धेसाठी निवड झाली! एक वर्षाच्या आत राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत 3 मेडल मिळून नॅशनल स्पर्धेत निवड झाली… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन 2 रा नंबर आला..
खरं तर मला इंटरनॅशनल स्पर्धेतून आपल्या महाराष्ट्र व भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे…
आपले दुःख, प्रॉब्लम इतरांना सांगून सहानुभूती मिळवली नाही. ताई विचारांनी आणि मनाने कणखर आहेत. कितीही कठीण परिस्थितिती, प्रसंग आला तरी त्याला धीराने तोंड कसे द्यायचे हे त्यांना त्यांचा सखा सह्याद्रीच्या सहवासात शिकत आहेत. दररोज एक समस्या निर्माण होते आणि दररोज शांतपणे त्यावर मात करत हसत हसत वाटचाल त्या करत आहेत. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो आहे. पण आयुष्यात खूप काही करायचे आहे… स्वप्न खूप मोठी आहेत, ताईंचे प्रयत्न सुरू आहेत.
“हिमालय सर करायचा आहे आता” असं म्हणत अंजना ताई दिल खुलास हसल्या. त्यांच्या चमकदार डोळ्यात शुभ्र बर्फाने आच्छादलेला हिमालय दिसत होता आणि तो नव्या सूर्या संगे ताईंना साद घालत होता जणू. भरपूर सकारात्मक ऊर्जेने अंजना ताईंनी माझी ओंजळ भरली होती.
खांद्यावर आपली बॅग आणि माझ्या अनंत शुभेछा घेऊन अंजना ताई निघाल्या होत्या. परत जाताना प्रेरणादायी अश्या ओळी तून अंजना ताई व्यक्त झाल्या
“तकदिर हैं की चलने देती..
जिद्द हैं की रुकने नहीं देती.”.

— लेखन : डॉ राणी खेडीकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800