‘मार्मिक’ आणि ‘सोबत‘
सुरवातीला काही दिवस मासिक स्वरूपात आणि आकारात प्रसिद्ध झालेलं ‘ सोबत ‘ लवकरच साप्ताहिक झालं॰ त्यावेळेस ‘ माणूस ‘ प्रसिद्ध होऊन 6 – 7 वर्षे झाली होती; आणि ते तरुण आणि वयस्कर, विचारी आणि जाणकार वाचकांत फारच लोकप्रिय होते॰
‘ माणूस ‘ ही प्रथम मासिकच होतं. तेही नंतर पाक्षिक आणि अखेरीस साप्ताहिक झालं. ‘ मार्मिक ‘ ही 13 ऑगस्ट 1960 पासून प्रसिद्ध होऊ लागलं होतं; आणि 1959 पासून नासिकहून प्रसिद्ध होणारे ‘ रसरंग ‘ हे चित्रपट आणि खेळावरचे साप्ताहिकही निदान तरुण वर्गात तरी लवकरच लोकप्रिय झालं॰ ही चारही साप्ताहिके आम्ही असोशीनं न चुकता वाचत असू.
या चार साप्ताहिकांनी आमच्या मनाची मशागत केली॰
तशी ‘ साधना ‘ आणि ‘ विवेक ‘ ही साप्ताहिकेही यांच्या आधीपासून प्रसिद्ध होत होती॰ पण ती फक्त समाजवादी आणि सङ्घीयच वाचत असत॰ शिवाय, छपाई आणि अन्य बाबतींत ती कळकटच वाटत असत॰ मात्र, हीच दोन साप्ताहिके आणि ‘ मार्मिक ‘ अजून साठ / सत्तर वर्षांनंतरही चालू आहेत॰ अन्य दोन साप्ताहिके ‘ माणूस ‘ आणि ‘ सोबत ‘ केव्हाच बंद पडली ! ( सुमारे दोन महिन्यांपूर्वीच ‘ सोबत’ च्या दिवंगत संपादकांचे चिरंजीव रवि बेहेरे यांच्याशी एक ‘ न्याहरी भेट ‘ झाली होती ! )
‘ साधना ‘ आणि ‘ विवेक ‘ या दोन्ही साप्ताहिकांनी आता कात टाकली असून ती अनेक बाबतींत आकर्षक झाली आहेत॰ या पैकी समाजवादी लोकांनी चालवलेल्या ‘ साधना ‘ मध्ये माझे चित्रपटावरचे बरेच लेख प्रसिद्ध झाले होते.
‘ मार्मिक ‘ ठाकर्यांच्या व्यंगचित्रांमुळे आणि ‘ शुद्ध निषाद ‘ च्या शेवटच्या पानावर प्रसिद्ध होणाऱ्या परखड, खुसखुषीत आणि टोकदार शेर्यांमुळे, चित्रपट समीक्षणाचं सदर ‘ सिनेप्रिक्षान ‘ अत्यंत लोकप्रिय झाले होते॰ त्यावेळेस शिवसेना स्थापन झालेली नव्हती; पण ठाकर्यांनी त्यांच्या व्यंगचित्रांमुळे अमाप लोकप्रियता मिळवली होती॰
या ‘ सिने प्रिक्षान ‘ बद्दल एक गम्मत सांगावयास हवी॰
हे सदर ‘ शुद्ध निषाद ‘ या टोपण नावाने लिहिलं जात होतं॰ ते अत्यंत परखड आणि तितक्याच खुसखुषीत भाषेत लिहिलेलं असे॰ त्याची शीर्षके ‘ गोष्ट गेली हाती कसाया. ‘ मेरा साया ‘ मेरा साया ! ’; ‘ यह रात फिर न आयेगी ‘ – मत आने दो ‘ अशी मन खेचून घेणारी असत. साहजिकच ‘ शुद्ध निषाद ‘ कोण, याची आम्हालाही उत्सुकता असे॰ ( खरं तर या ‘ प्रिक्षान ‘ वर एक सुंदर लेख करता येऊ शकेल॰ )
त्यावेळेस आम्ही ‘ व्ही.जे.टी.आय. ‘ मध्ये शिकत होतो; त्यामुळे त्या संस्थेत नोकरी करणाऱ्या प्रख्यात विनोदी लेखक वि॰ आ॰ बुवांना आम्ही ( म्हणजे सुभाष सावरकर, दिलीप करंदीकर आणि मी ) वारंवार भेटत असू॰ बुवा हे ही सर्व सामान्य हिन्दी चित्रपटांवर नेहेमीच टीका करणारे होते॰ त्यामुळे हे सदर ते लिहीत असावेत, अशी आम्हाला शंका होती॰ आम्ही मोकळेपणानं या बद्दल त्यांना विचारण्या इतकी आमची त्यांच्याशी जवळीक होती॰ पण आम्ही असं विचारल्यावर स्पष्ट नाही न म्हणता ते सदर आपणच लिहीत आहोत, असा आव ते आणत असत॰ सहसा टोपण नावे गुप्त राखली जातात. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे त्यांना छेडलं नाही. त्यामुळे आमचा समज तेच हे सदर लिहीत आहेत, असा झाला होता; साहजिकच, आमच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला होता॰
अशी दोन – अडिच वर्षे गेली॰
नंतर 1966 च्या फेब्रुवारी / मार्चमध्ये ‘ साज औऱ आवाज ‘ या चित्रपटाचे परीक्षण आलं॰ त्यात रफीने गायलेल्या ‘ साज हो तुम आवाज हू मै ‘ या ‘ पटदीप ‘ रागातल्या गाण्यात रफीने धैवत आणि निषाद हे चुकीच्या पद्धतीने लावल्याबद्दल त्याच्यावर आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्या चित्रपटाचे संगीतकार नौशाद यांच्यावर कडक टीका केली होती॰
हे वाचल्यावर मात्र हे सदर बुवा लिहीत नाहीत, या बद्दल निदान माझी तरी खात्रीच झाली॰ कारण बुवांना शास्त्रीय संगीतात ( किंवा अन्य संगीतातही ) फारशी रुचि नव्हतीच॰ त्यांच्या उपस्थितीत मी शास्त्रीय / उपशास्त्रीय संगीतावर बोललो तर बुवा मौनच बाळगत असत, हे माझ्या लक्षात आलं होतं॰ मग मात्र मी बुवांना सरळच म्हटलं की बुवा, हे सदर तुम्ही लिहीत नाही हे कबूल करा॰ या संगीतातील आपली इतकी जाणकारी आम्हाला कधीही जाणवली नाही॰
मग मात्र बुवांनी मोठेपणा दाखवून ते सदर आपण लिहीत नसल्याचं कबूल केलं; आणि ते सदर श्रीकांत ठाकरे लिहीत असल्याचे आम्हाला सांगितले ! त्यावेळेस श्रीकांत ठाकरे हे संगीत दिग्दर्शक झाले नव्हते॰
‘ सोबत ‘ चे संपादक ग॰ वा॰ बेहेरे हे सुरवातीपासून शिवसेनेवर कडक टीका करत असत॰ बेहेर्यांच्या साहित्यिक, परखड, हिंदुत्ववादी, सर्व सामान्यपणे कॉङ्ग्रेसवर टीका करणार्या लेखनामुळे आणि ललित लेखनामुळे आम्ही त्यांचे लवकरच फॅन झालो॰ त्यामुळे बेहेरे आणि ठाकरे यांच्यांत दिल जमाई व्हावी असे आम्हाला वाटत असे॰ ठाकरे त्यावेळेस उघड हिंदुत्ववादी झाले नव्हते; पण त्यांना सावरकरांबद्दल आदर होता, हे आम्हाला त्यांच्या ‘ कामगार सेने ‘ चा सेक्रेटरी अरूण मेहताकडून ( शशी मेहताचा सख्खा धाकटा भाऊ ) कळलेलं होतं॰ शिवाय, त्यांच्या व्यंगचित्रांतून आणि लेखांतून मुसलमानांवर आणि ख्रिश्चनांवर ते मर्मभेदी टीका वारंवार करत असत॰ या दोन विषयांवरची त्यांची कित्येक व्यंगचित्रे संस्मरणीय आहेत॰
त्याच वेळेस गोपाळ गोडसे यांच्याशी 19 सप्टेंबर 1968 रोजी आमची ओळख झाली; आणि ती इतकी वाढली की पुण्याला राहणारे गोडसे पुण्याहून मुंबईला आठवड्यातून दोन – तीनदा तरी रात्रीच्या पॅसेंजरने येत असत, आणि सकाळी ते मुंबईला आले की ते दादरला उतरून न चुकता प्रथम आमच्या माटुंग्याच्या वसतीगृहातील खोलीवर येऊन तोंड धुवून, चहा घेऊन, आंघोळ आणि न्याहरी करून आपल्या कामाला निघत असत॰
गोपाळ गोडसे यांच्या ‘ गांधीहत्त्या आणि मी ‘ या लेखमालेला ग॰ वा॰ बेहेरेच त्यांच्या ‘ पैंजण ‘ मासिकामधून दरमहा प्रसिद्धी देत असल्यामुळे ते बेहेर्यांच्या नित्य बैठकीतील होते॰
मग गोपाळ गोडसे यांच्यामार्फत आम्ही ग. वा. बेहेर्यांना ठाकर्यांशी जुळवून घ्या, असे निरोप अनेक वेळा पाठवले आहेत॰ त्याच सुमारास बडोद्याचे डॉ॰ दा. वि. नेने हे ‘ दादूमिया ‘ नावाने राजकीय लेखन करू लागले होते; त्यांचे ‘ सोबत ‘ मध्ये ही लेख प्रसिद्ध होत असत; आणि ते तुफान लोकप्रिय झाले होते.
गोपाळ गोडसे यांची ‘ सोबत ‘ मधील ‘ संघ – जनसंघ ‘ ही लेखमाला अतिशय लोकप्रिय झाली॰ त्यांनाही या दोन हिंदुत्ववादी संपादकांनी एकत्र यावे असे मनापासून वाटत होते॰
मग गोडसे आणि नेने यांनी पुढाकार घेतला; आणि हे दोन संपादक एकत्र आले॰
नंतर बेहेरे ठाकर्यांच्या प्रखर हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेच्या एव्हढे प्रेमात पडले की, त्यांच्या ‘ सोबत ‘ मधल्या अग्रलेखांचे चार खंड प्रसिद्ध झाले; त्यातला हिंदुत्वावरच्या लेखांचा चवथा खंड त्यांनी ठाकर्यांना, ‘ चि॰ बाळ ठाकरे – याचा बुलंद आवाज हिंदूंना संरक्षणाची ग्वाही देतो ‘ अशा अर्थाचा मजकूर लिहून अर्पण केला ! ( गम्मत म्हणजे बेहेरे हे ठाकर्यांपेक्षा 4 – 5 वर्षांनी लहान होते ! )
बेहेर्यांच्या निधनानंतर ठाकर्यांनीही ‘ हिंदुत्वाची ‘ सोबत ‘ संपली ‘ असा अग्रलेख लिहिला होता॰
जाता जाता ….
मी 2010 च्या ऑक्टोबर मध्ये वडोदर्याला गेलो असतांना या ‘ दादूमियांना ‘ भेटलो होतो॰
पु॰ ल॰ देशपांड्यांनाही हे ‘ सिनेप्रिक्षान ‘ आवडत असे॰ त्यामुळे त्यांनी ‘ मार्मिक ‘ आल्यावर तो उर्दू पुस्तकासारखा उलटीकडून वाचावयास आपण सुरवात करतो, असे म्हटले होते॰
काही वर्षांपूर्वी ‘ डिम्पल प्रकाशन ‘ चा अशोक मुळे भेटला होता. त्याला एक हमखास लोकप्रिय होणारे पुस्तक प्रकाशित करायचं होतं. त्यावेळेस मी त्याला ‘ मार्मिक ‘ मधील ‘ सिने प्रिक्षान ‘ सदरातील निवडक लेखांचं ‘ निवडक सिने प्रिक्षान ‘ प्रकाशित करावं असं सुचवलं होतं.
त्यानं ते केलं नाही.
अजून कोणीतरी पुढाकार घेऊन ते प्रकाशित करावं. ते निश्चितच तुफान खपेल.
गम्मत ….
गोपाळ गोडसे यांच्याशी वारंवार इतका घनिष्ठ संबंध येऊनही दीड दोन वर्षांत मी, मूळचा प्रखर हिंदुत्ववादी कटटर गांधीवादी झालो !
त्या बद्दल नंतर कधी तरी !

— लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अवती भवती मस्तच आहे. या वेळी सोबत, मार्मिक बाबत नवीन माहिती मिळाली. सिने प्रिक्षान हे शिर्षक मोठे गंमतीशीर वाटले. आपली साहित्यिकांबरोबर बरीच चांगली बैठक होती हे कळाले. खुप भाग्यवान आहात.