Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तक : ७

दुर्मीळ पुस्तक : ७

स्वाधीन की दैवाधीन

आजवर मी किती पुस्तके वाचली, संग्रह केली, गमावली, हरवली याला गणतीच नाही. मिळेल त्या मार्गाने पुस्तके वाचत रहावी असे मला नेहमीच वाटत आले आहे. कोणीही सोबतीला नसेल आणि प्रवासात असेल तर हमखास एक का होईना पण माझ्याजवळ पुस्तक असतेच असते. सध्या घरातच राहण्याचे दिवस आहेत. अशावेळी सुद्धा पुस्तकांचा सहवास प्रिय होत आहे.

पुस्तकांचे एक बरे असते. हवे तेव्हा उघडून वाचता येतात आणि हवे तेव्हा मिटवून ठेवता येतात. काही पुस्तके मात्र एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेववतच नाही अशी असतात. दु:ख पर्वताएवढे, घर गंगेच्या काठी यासारखी पुस्तके वाचकांना गुंतवून ठेवतात. असेच एक माझे अतिशय आवडते पुस्तक आहे. मेजर रामचंद्र गो. साळवी, भा. प्र. से. यांचे स्वाधीन की दैवाधीन. माझ्या संग्रहात या पुस्तकाची १९६४ मधील तृतीय आवृत्ती आहे व तेव्हाची किंमत आहे सात रुपये. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादने हे प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना लाभली आहे.

हे पुस्तक सगळीकडे दुर्मीळ झालेले असताना ते अचानक पणजी गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात मी काही कामानिमित्त गेलो तेव्हा माझ्या हाती आले.

या पुस्तकाची मला ओढ कशी लागली याचा मी विचार करतो तेव्हा मला सातव्या इयत्तेत असताना बालभारतीतील एक धडा आठवतो. वाळवंटातील हिरवळ. मेजर रा. गो. साळवी यांचा. अर्थात ते वय असे होते की लेखक कोण याकडे लक्ष नसायचे. या धड्याने तेव्हाच्या किशोर वयाला अतिशय भुरळ पडली होती. इतरही धडे तसेच होते पण या धड्याचे काहीतरी वेगळेपण होते. श्वास रोखून ठेवणारी उत्कंठा वाढविणारी घटना होती. लेखकाला जर्मनीमध्ये एका खडकातील पोकळीत लपावे लागले होते. नेमके त्या खडकावर एक जर्मन सैनिक येऊन चढतो. त्याला लेखक दिसत नाही पण लेखकाला मात्र झुडपांच्या पानातून तो सैनिक दिसत असतो. काळ इतक्या जवळ आलेला होता. अन्नाशिवाय, कपड्यांशिवाय दऱ्या खोऱ्यात – रानावनात लपूनछपून राहण्याची लेखकावर वेळ आलेली होती. त्यांना तेथे मदत करणारी अदलीनाही बिकट परिस्थितीत असते. तिच्या आईला जर्मन सैनिकांनी पकडून नेलेले असते. अदलीना घराच्या छपराच्या सांदीत दिवस काढत असते. खाण्याचे पदार्थ दुर्मीळ झालेले असतात. दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नावर ती दिवस काढत असते. त्याही परिस्थितीत ती तिच्याजवळील ब्रेडचा अर्धा तुकडा मुलाबरोबर पत्रासोबत लेखकाकडे पाठवते.

मेजर रा. गो. साळवी यांनी दुसर्‍या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. टोब्रुकच्या लढाईत दोस्त राष्ट्रांचा पाडाव झाला. त्यावेळी हे जर्मनीचे युद्धकैदी झाले. तेथून त्यांनी मोठ्या युक्तीने व शिताफीने आपली सुटका करुन घेतली. ते इटलीत गेले. शत्रूचे सैन्य सभोवार असल्यामुळे त्यांना अतिशय खडतर जिणे जगावे लागले. अशा खडतर परिस्थितीत इटलीतील लोकांनी त्यांना मदत केली. मेजर साळवी यांनी या खडतर जीवनाच्या आठवणी ‘स्वाधीन की दैवाधीन’ असा परिचय त्यावेळी धड्याच्या सुरुवातीला दिलेला होता. हा धडा मी नंतर विसरुनही गेलो होतो. पुढे काही वर्षांनंतर मी नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयाचा सदस्य झालो तेव्हा अचानक पुस्तकांच्या याद्यांमध्ये ‘स्वाधीन की दैवाधीन’ असे शीर्षक दिसले. मला त्यावेळी धडा आठवला. मी ते पुस्तक घरी आणून वाचायला सुरुवात केली आणि त्या पुस्तकाने माझ्यावर जादूच केली. अर्ध्या ब्रेडच्या तुकड्यावर चार पाच दिवस काढणे म्हणजे किती खडतर जीवन! युद्धकैदी म्हणून लेखक जर्मनांच्या ताब्यांत काही दिवस राहिले. तेथून शिताफीने निसटून इटलीतील व्हिला सान सबास्तिआनो ह्या छोट्या गावांत छपून राहिले. ह्या गावी त्यांना जसे अनेक रोमांचकारी, भयप्रद अनुभव आले तसेच माणुसकीच्या जिव्हाळ्याने ओथंबलेले अनुभवही आले.

रोमानो या इटालियन तरुणाने लेखकाला आपल्या गावी राहण्यास आणले व स्वतः धोका पत्करुन त्यांना हरप्रकारे मदत केली. अदलीना या इटालियन स्त्रीने श्री साळवी यांना आपल्या घरी आश्रय दिला. स्वतः हालअपेष्टा सोसून तिने त्यांना मदत केली.

पुस्तक वाचून परत केल्यावर असे पुस्तक संग्रही असावे म्हणून मला अतिशय चुटपुट लागली. मी हे पुस्तक कोठे मिळेल याचा खूप शोध घेतला पण मला ते मिळालेच नाही. नंतर मुंबईत नोकरीनिमित्ताने गेलो तेव्हा नाशिकमधील ग्रंथालयाशी संपर्कही तुटला. पुढे पणजी गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात कार्यालयीन कामानिमित्त मी गेलो असता सहज या पुस्तकाची चौकशी केली आणि मनी ध्यानी नसताना हे पुस्तक माझ्यापुढे आले. आजही ते माझ्या संग्रहात असून सर्वात आवडते असे पुस्तक आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments