“नवंकथेचे जनक” म्हणून ओळखले जाणारे गंगाधर गाडगीळ यांची आज शंभरावी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
थोर कथाकार गंगाधर गाडगीळ यांचा जन्म २५ ऑगस्ट १९२३ रोजी झाला. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे नामवंत अर्थतज्ञ तर होतेच परंतु कथा, कादंबऱ्या, समीक्षा, नाटके, बालसाहित्य, आत्मचरित्र अशा सर्व साहित्यप्रांतांत त्यांनी लेखणी चालविली. पण मराठी कथेला नवे वळण देणारे कथाकार म्हणून “नवकथेचे जनक” म्हणून ते जास्त ओळखले जाऊ लागले.

मानसचित्रे, कडूगोड, नव्या वाटा, तलावातील चांदणे, पाळणा, वेगळे जग, गुणाकार, गाडगीळांच्या कथा हे त्यांचे गाजलेले कथा संग्रह. विकारी प्रवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी ‘ लिलीचे फूल ‘ ही कादंबरी. लोकमान्य टिळकांवर ‘दुर्दम्य ‘ नावाची द्विखंडात्मक चरित्र कादंबरी त्यांनी लिहिली आहे़. साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे ‘खडक आणि पाणी ‘ , विविध साहित्य प्रकारांतल्या मराठी ग्रंथांचे रहस्योद्गघाटन करणारे ‘साहित्याचे मानदंड ‘ तसेच मुंबईतील लोकजीवनाची जडणघडण शब्दबद्ध केलेले ‘ मुंबई आणि मुंबईकर ‘ हे त्यांचे साहित्यक्षेत्रात जास्त लोकप्रिय झाले.

१९८२ मध्ये रायपूर येथे संपन्न झालेल्या ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. थोर अर्थतज्ञ तसेच विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन करणारे गंगाधर गाडगीळ यांचे १५ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गंगाधर गाडगीळ यांनी मराठी कथेला उंची प्राप्त करून दिली.