Sunday, July 13, 2025
Homeसाहित्य'ऋतुस्पर्श' : समिक्षा

‘ऋतुस्पर्श’ : समिक्षा

प्रस्तावना :
कृषिप्रधानतेने नटलेला समृद्ध असा देश म्हणून संबंध विश्वात भारत देशाची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील राज्य आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे चार विभाग राज्याचे आहेत. ‘मराठवाडा’ ही संताची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. अनेक प्रतिभावंत आदर्शमूल्याचे संस्कार या विभागाला आणि देशाला मिळालेले आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गोकुळवाडी’ येथील कवयित्री पूनम सुलाने यांच्या ‘ऋतुस्पर्श’ काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन “आपल्या जन्मगावात व्हावे” अशी इच्छा सुलाने यांची होती या पद्धतीने या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात गावकऱ्यासमवेत झाले त्याबद्दल मी कवयित्री पुनम सुलाने-सिंगल यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो.

साहित्यादी कलाकृतीमध्ये कलावंताच्या जाणिवेला अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण ही जाणीव म्हणजे त्याला जाणवलेले जीवन असते. सभोवतालच्या विविध प्रश्नाची जाणीव कलाकृतीत अभिव्यक्त करताना कलावंताना त्याचे अनुभवविश्व मदत करीत असते. अनुभवामुळे त्या जाणिवा सशक्तपणे आणि समृद्धपणे उभ्या राहतात. कलावंताचे जेवढे अनुभवविश्व व्यापक तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या कलाकृतीतील जाणिवांना व्यापकता प्राप्त होते. कलाकृतीत आविष्कृत केलेल्या अनुभवातून समाजाचे आकलन व अवलोकन होत असते. कलावंत कला आणि समाजाशी किती प्रमाणात समरस झाला आहे हे यावरून समजते.

या सर्व अनुषंगाने कवयित्री पुनम सुलाने यांची कविता एकूणच वेगळ्या वळणाची, पाऊस, पाणी, झाडे, श्रावण, आकाश माती यांचे माहात्मे सांगणारी, विठ्ठलावर त्याचबरोबर कृष्णावर देखील श्रद्धा असणारी, जीवनविषयक चिंतन मांडणारी, पर्यावरणपुरक संदेश देणारी सकारात्मक जाणीव मांडणारी, स्त्री जीवनाचे महत्त्व सांगणारी, निसर्गाचा लहरीपणा, निसर्गाचा प्रकोप, ऋतुसंवेदना, आदर्श शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करणारी आत्मीयता प्रकट करणारी प्रेमभाव आणि जगण्याविषयी ओढ निर्माण करणारी, देशप्रेम, देशाभिमान, अभंगसदृश्य रचना ओवीबद्धता आणि ‘युद्ध नव्हे बुद्ध हवा’ अशा विचारधारेतून त्यांचा “ऋतुस्पर्श’ हा पहिला काव्यसंग्रह जाताना दिसतो.

*ऋतुस्पर्श’ काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये :

१) निसर्गाचा आविष्कार:
पाऊस, पाणी, झाडे, श्रावण, आकाश माती यांचे वर्णन कवयित्रीने केलेले दिसून येते. निसर्गाचे सौंदर्य, नैसर्गिक समुद्धी आणि सर्वात म्हणजे निसर्गाची संवेदना, निसर्गाचा आगळावेगळा अविष्कार या संग्रहामध्ये दिसून येतो.
निसर्गातील नवलाईचे चित्रण कवयित्री करताना, ‘असा पाऊस होऊ दे’ या कवितेतून म्हणते की,
              “नको चिंता, नको भीती
                तव वासल्य राहू दे
               प्रीत अंकुरित व्हावी
               असा पाऊस होऊ दे”
अशा पद्धतीने कवयित्री पावसाला नैसर्गिक चैतन्याची भरभराट व्हावी आणि माझा शेतकरी चिंतामुक्त होऊ दे अशी विनंती करते.

2) पर्यावरणपूरक संदेश :
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संगोपन केले पाहिजे, असे कवयित्रीला वाटते त्यामुळे झाडाची महती विशद करताना कवयित्री झाडाच्या पालन पोषणाची जबाबदारी ही पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येकाची आहे. झाडामुळे नवचैतन्य, समृद्धी येत असते त्यामुळेच कवियत्री लिहितात की, उद्याच्या पिढीला समृद्ध ठेवा म्हणून आपण वृक्ष देऊया असे म्हणताना कवियत्री लिहितात की,
               “सजलेली ही धरती
               भेट पिढीस देऊ या
               श्वास मिळविण्या नवा
                झाडे मिळून लावूया”
या पद्धतीने पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून कवयित्री आपल्या भावना मांडताना झाडाचे महत्व, उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात किती जास्त प्रमाणात आहे याचे वर्णन वरील कवितेतून विशद करताना आपल्याला दिसते. पर्यावरणाचा समतोल जपला पाहिजे त्यासाठी पर्यावरणाची प्रत्येकाने जपवणूक करावी हा मोलाचा संदेश महत्त्वाचा वाटतो.

3) भक्तीपूर्ण रचना :
कवयित्री पूनम यांची कवितेतून,अभंग, ओवी याची रचना आपल्याला दिसते,,पंढरपूरचा पांडुरंग हा संपूर्ण विश्वाचा श्रद्धास्थान असणारे देव आहे. युगे अठ्ठावीस हा देव विटेवर उभा आहे अशा या देवा विठ्ठलाची वारी झाल्यावर चित्ताला शांती लाभते म्हणून कवयित्री आपल्या एका कवितेत म्हणते की,
           देवा माझा पांडुरंग
           मनी ओढ दर्शनाची
           चित्त लावण्या चरणी
           हवी साथ माऊलीची
पंढरपूरची वारी पायी करणारा वारकरी माळकरी कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने टिपलेला आपणास दिसतो त्यांची भाषा अगदी सरळ सर्वांना समजेल या पद्धतीने आहे म्हणून भक्तीपूर्ण रचना ह्या देखील इतर कवितेप्रमाणे त्यांच्या काव्यसंग्रहाचे ठळक वैशिष्ट्य म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.

४) नाते संबंधांचे वर्णन :
आई वडील हे मुलांवरती, मुलींवरती संस्कार करत असतात. आई म्हणजे काय हे आपण पाहूया आ+आत्मा ई+ईश्वर आहे हा शब्द तयार होतो. अनेक साहित्यिकांनी आईवरती खूप लेखन मराठी साहित्यामध्ये केलेले आपणाला दिसते. म्हणून कवयित्री पुनम या याला अपवाद ठरू शकत नाही. त्यांनी ‘आई’, ‘बाप’ या दोन्ही कवितेतून त्यांच्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. त्या म्हणतात की,
“बाप,, नात्यांच्या भितीचा
भार वाहे जन्मभर
साथ सुटता बापाची
नुसतीच नाती भाराभर”
“बाप” हा आपल्या घराचा आधार असतो आपणाला कधीच तो निराधार होऊ देत नाही. म्हणून संपूर्ण घराची जबाबदारी ही जन्मभर वडिलांवरती असते. मरेपर्यंत सावली तो आपल्या लेकरांना देत असतो. नात्यातील दुरावा हा क्षणिक असतो. नुसती नाती भाराभर काहीच कामाची नसतात म्हणून कवयित्रीने बापाच्या महतीचे वर्णन केलेले आहे. मुलांच्या आयुष्यात आईसुद्धा महत्त्वाची असते म्हणून आईविषयी कवयित्री म्हणते,
“जिंकण्याचे ध्येय असणान्या
पंखांमध्ये बळ विश्वासाचे भरते
कोवळ्या मनाच्या मातीमध्ये
संस्काराचे बी आई’ रुजवते.”
जिंकण्यासाठी आई आपल्या मुलांच्या पंखामध्ये विश्वासाचे बळ देते. मुलांच्या कोवळ्या कोमल मनाच्या मातीमध्ये चांगल्या संस्काराचे बी रोवण्याचे काम आई करत असते. असे वर्णन कवियत्री पूनम सुलाने आपल्यावरील कवितेत केले आहे. म्हणूनच आईची महती सांगणारी ही कविता महत्त्वपूर्ण वाटते.

५) देशाभिमान :
संपूर्ण विश्वामध्ये भारत या देशाला आपण ‘भारतमाता’ अस म्हणतो. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी खूप संघर्ष, बलीदान, खुप कष्ट करावे लागले आहे तेव्हा हा देश स्वतंत्र झाला. आज आपला देश हा आपला अभिमान, स्वाभिमान आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणून कवयित्री म्हणाले की,
“देण्या स्वातंत्र्य देशास
वीर लढले महान
सैनिकांच्या त्यागाची
हवी आपल्याला जाण”
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी स्वतः त्यागाची वृत्ती ठेवली नसती तर आपण आजही पारतंत्र्याच्या बेडीतच अडकून पडलो असतो. देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे अशा सैनिकाच्या त्यागाची आपण जाण ठेवली पाहिजे असे असे कवियत्री ‘तिरंगा’ या कवितेतून इथल्या प्रत्येक माणसाला संदेश देत आहे म्हणून आपण देशाच्या प्रगतीमध्ये आपलाही वाटा असावा ही भूमिका प्रत्येक भारतीयांनी ठेवली पाहिजे.

६) स्त्री-जीवनाचे महत्त्व :
स्त्री जीवनाचे महत्त्व विशद करताना कवयित्री पूनम सुलाने या वर्णन करतात की, स्त्रीला फक्त जननी, माता, आई, बहीण मावशी, काकी, मुलगी, आत्या ह्या नात्यापुरतेच मर्यादित न ठेवता स्त्री म्हणजे विश्वदर्शन घडवणारी परमेश्वराची सुंदर रचना आहे. ह्या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहता आले पाहिजे. म्हणूनच कवयित्री पूनम सुलाने लिहितात की,
“विश्वदर्शन घडवणाऱ्याला घडवणारी
स्त्री म्हणजे विधात्याची सुंदर रचना
नवनिर्मितीचे सामर्थ्य अंगी बाळगणारी”
महिलांचे महत्व व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप जास्त आहे कारण जिजाऊ माँ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्याचप्रमाणे एका यशस्वी पुरुषामागे एका महिलेची कामगिरी महत्त्वाची असते म्हणून स्त्रीचं असणं हे महत्त्वाचं आहे तिची किंमत आपल्याला कळाली पाहिजे म्हणून कवयित्री म्हणते की,
       “तिच्या स्त्रीतत्त्वाची कहानी
         फक्त तिलाच कळते
         तिच्या निघून जाण्याने
         तिची किंमत कळते”
स्त्रीत्वाची कहाणी या कवितेतून कवयित्री म्हणतात की. स्त्रीच्या निघून गेल्यानंतर तिची खरी किंमत तिच्या कुटुंबाला कळते म्हणून कोणत्याही स्त्रीला ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे असे विचार कवयित्रीने आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे.

७) आदर्श शिक्षकांचे वर्णन :
आई वडिलानंतर विद्यार्थ्यांचे सूक्ष्मपणे निरीक्षण,परीक्षण करण्याचे प्रेमळ काम हे शिक्षक करतात शिस्त, क्षमस्व, कर्तव्याची जाण ज्याच्या अंगी असते. त्याला आदर्श शिक्षक म्हणतात.अशा आदर्श शिक्षक आदर्शवादी भूमिकेतून कवयित्रीने केलेले आदर्श वर्णन करताना कवयित्री म्हणतात की-
“आजही नकळतपणे
डोळे पाणवतात
शोधताना मार्ग जीवनाचा
धडे शिक्षकांचे आठवतात”
शिक्षकांनी ज्ञानार्जन केलेले आजही आठवते, जीवन जगताना  शिक्षकांचे विचार जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी आजही स्मरणात आहे. त्यामुळेच आपल्या शिक्षकांचे वर्णन करत असताना कवियत्रीला आजच्या शिक्षकांनीही अशीच आदर्श पिढी घडवावी असा संदेश या कवीतेतून द्यायचा आहे.

८) युद्ध नव्हे, बुद्ध हवा :
व्यक्तीच्या जीवनामध्ये अहंकार येवू नये म्हणून गौतम बुद्धांनी जगाला ‘शांतीचा संदेश’ दिला आहे आणि आपण तो विसरत चाललो आहोत. म्हणून युद्धाची परिस्थिती निर्माण होते. सत्य गोष्टीचा स्वीकार आम्ही करत नाही म्हणून कवयित्री म्हणते की,
“भीतीने जीव झाला सैरभैर
जीवन त्यांचे विस्कटले आहे
अस्त्रशास्त्राच्या प्रहाराने
गर्भधरणीचा जळाला आहे”
अशा पद्धतीने कवयित्री ह्या कवितेतून युद्धाचा परिणाम आणि त्यातून होणारे नुकसान यांचे वर्णन युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करताना आपल्याला दिसते.
म्हणून आजही या देशाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या विचारांची आवश्यकता आहे आणि ह्या विचारांचा पाईक होण्याची आज देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला आवश्यकता आहे.

९) मायबोलीचे वर्णन :
मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचा गोडवा, मराठी भाषेची अस्मिता असा पद्धतीने मराठी भाषेचे वर्णन अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून करताना मराठी भाषेला खूप उंची प्राप्त होऊन ती क्षितिजाच्याही पलीकडे गेली पाहिजे. अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच कवयित्री पुनम सुलाने यांनी ही मायबोलीचे वर्णन करताना त्या म्हणतात की,
   “ज्ञानदेवाच्या मुखी
     बोलते मायबोली
     टाळ मृदंगांच्या तालावर
      नाचते मायबोली”
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी,चांगदेवपासष्टी,हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती मराठी भाषेतून केलेली आहे व टाळ मृदंगांच्या निनादाने मायबोली आनंदाने डोलताना दिसते असे कवयित्रीला वाटते म्हणूनच या कवितेत त्यांनी मायबोलीचे विशेष वर्णन केलेले आपल्याला दिसते.

१०) लोकशाहीचे वर्णन :
‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. ही अब्राहम लिंकनची लोकशाहीची व्याख्या आज राज्यकर्ते पायदळी तुडवताना आपणाला दिसतात. राज्यकर्त मुक्तसंचार करताना आपणाला दिसतात म्हणून देशाची प्रगती झाली पाहिजे म्हणून प्रत्येकानी आपल्या गावापासून प्रगतीची सुरुवात केली पाहिजे म्हणून कवयित्री म्हणते  की,
“पुढाऱ्यांच्या हाताखालचे
चमचे होऊन फिरणाऱ्यांनो
थोडे लक्ष आपल्या गावाकडे
देत जा रे, गावकऱ्यांनो”
गावाचा विकास झाला पाहिजे याकरिता पुढार्‍यांच्या हाताखाली चमचेगिरी करणाऱ्यांना कवियत्री खडसवताना आपणाला दिसतात. गावाची प्रगती झाली तर तालुकानंतर जिल्हा, राज्य, देश प्रगतीपथावर जाईल आणि डॉ. अब्दुल कलाम साहेबांचे अपूर्ण स्वप्न महासत्तेचे ते पूर्ण होईल असे कवयित्रीला मनातून वाटत आहे.

समारोप

अशाप्रकारे ‘ऋतुस्पर्श’ या काव्यसंग्रहातून कवयित्रीने एकूण बहात्तर (७२) कवितांचे लेखन करून वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचे त्यांचे कसब महत्वाचे वाटते. या संग्रहातून चौफेर लेखन करून निसर्ग, ऊन, वारा, पाऊस, सण, उत्सव, नातेसंबंध, सुख, दुःख, देशप्रेम, सामाजिक / सांस्कृतिक मूल्ये, कृषी, देव-देवता, प्रेमभाव, ऋतुसंवेदना, शांतीचा संदेश आदर्श शिक्षकांची भूमिका,लोकशाही,गावाचा विकास योग जीवनाचे महत्त्व ,मराठी भाषेची थोरवी पर्यावरणाचा संदेश, निसर्गाचा आविष्कार इ. घटक त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत.अशा पद्धतीने कवयित्री पुनम सुलाने यांचा पहिला काव्यसंग्रह हा मराठवाड्याच्या माय बोलीचा आलेख आहे. त्यांचा ‘ऋतुस्पर्श’ हा संग्रह वाचकांना नवी प्रेरणा, नवी दिशा, नवा जोश, नावीन्यपूर्ण निर्माण करेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो. कवयित्री पूनम सुलाने-सिंगल हातून असंच लेखन व्हावे ही भगवंत चरणी प्रार्थना करतो.

— परीक्षण : प्रा.गणेश मोताळे. परभणी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments