भटकंतीवर असताना आपल्याला अनेक ठिकाणी प्राणी संग्रहालय पाहायला मिळतात. अगदी राणीच्या बागेपासून याची सुरुवात होते. पण प्राण्यांचे-पक्ष्यांचे अनाथालयही असू शकते, ही कल्पना कशी वाटली तुम्हाला ? खरे नाही ना वाटत ? पण आहे, असेही एक घर… हे घर आपल्याला बघायला मिळतं ते वर्धेत…
आशिष गोस्वामी या प्राणिमित्राने प्राण्यांकरिता, पक्ष्यांकरिता, अगदी अजगराकरिता आणि बिबट्याकरिताही निवारा बांधला… ही मंडळी तिथं अतिथी म्हणून राहतात आणि आशिषकडून लाड करुन घेतात..

आशिष लहानगा होता तेव्हापासून तो जखमी प्राण्या पक्ष्यांना मदत करत असे… आवडतं ते त्याला.. त्याचा तो छंदच होता… कुठे जखमी प्राणी पक्षी आढळला की आशिष त्याची काळजी घेऊन त्याच्यावर उपचार करू लागला. त्याची ही माहिती परिसरात पसरली, आणि मग लोक आपसूक त्याच्याकडे सेवा-सुश्रृषेकरिता प्राणी-पक्षी घेऊन यायला लागले..
हळूहळू हे काम वाढू लागले. मग 1997 साली आशिषने एका संस्थेची स्थापना केली.. पीपल्स फॉर animals ही संस्था आकारली. शासनाची कोणतीही मदत न घेता आशिषने आपल्या या परिसरात 2 हेक्टर वर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी एक हक्काचे घर तयार केले त्याला नाव दिले करुणाश्रम.
1999 पासून मूर्त स्वरूपात या संस्थेचे काम सुरू झाले.यात जखमी गाई, म्हशी, कुत्रे, मांजरी हे पाळीव प्राणी आणून त्यांच्यावर उपचार केले जावू लागले. तर या परिसरात जे रेस्क्यू सेंटर आहे तिथे वन्य प्राणी पक्षी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वनखात्याला कुठे जखमी जंगली प्राणी-पक्षी मिळाले की ते आशिष कडे आणून देऊ लागले. मग त्याठिकाणी ते बरे होईपर्यत ठेवले जाऊ लागले. ज्यावेळी ते पूर्ण बरे होतात त्यावेळी त्यांना वनात सोडले जाऊ लागले.

या कामात सुरुवातीला आशिषला खूप अडीअडचणींना सामोरे जावे लागले. अगदी पोलिसांपासून लोकांनीही त्याला खूप त्रास दिला. कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पण आशिष हरला नाही की त्याच्या कामापासून हटला ही नाही. सगळ्या लढाया तो लढत लढत आपले काम करत होता.
एका वेळेला 500 प्राणी पक्षी सांभाळणे खाऊ नाही. पण आशिष ने हे शिवधनुष्य पेलले आहे. आता सद्या आशिष च्या या करुणाश्रमात 150 गाई आहेत. अनेक कुत्री आहेत . काळवीट आहे. चौशिंगी आहेत. मोर, हरीण, अस्वल, माकड, बिबट्या असे अनेक जण आहेत. जखमी घोरपड, अजगरही आहे. काहींची ऑपरेशन झालेली आहेत. या सगळ्यांची आशिष खूप आपुलकीने काळजी घेतो. आशिषच्या या कामाचे कौतुक स्वतः मेनका गांधी यांनीही केले आहे. तर या करुणाश्रमाला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ही मान्यता दिलेली आहे.
यात कासव ही आहेत. या सगळ्यासाठी लागणारे खाद्य त्यांचे डॉक्टर वेळेवर औषधे देण्याचे काम येथे वेळेतच होते. सर्वांना प्रेमाने वागवले जाते. परिसरात चारा पिकवला जातो. परिसरात कुठेही घाणीचे चित्र नाही. अतिशय स्वच्छ परिसर पाहून आपल्याला ही खूप छान वाटते.
आशिषकडे या कामासाठी आपण ही जाऊन सामील होऊ शकतो. स्वयं स्फूर्तीने ज्यांना कोणाला या कामात सहभागी होऊन आपली सेवा द्यायची असेल तर आशिष सोबत आपणही जॉइन होऊ शकतो. याकरिता आपण आशिष गोस्वामी यांना 9422141262 या नंबरवर संपर्क करु शकता.

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आशिष चे खूप कौतुक आणि एक salute.
मुक्या प्राण्यांची सेवा करण्यासारखे दुसरे पुण्य कर्म नाही.मी बरीच दूर रहाते म्हणून नाहीतर मदत करण्यासाठी नक्की आले असते.
ही माहिती शेअर करण्यासाठी मानसीताई यांचे आभार.
….एक प्राणी प्रेमी,
,…,..नीला बर्वे.
सिंगापूर
कौतुकास्पद आणि अभिनंदनीय उपक्रम.