काकडीचा धोंडस कोकणातील हा पदार्थ गौरीच्या नैवेद्यासाठी बनवला जातो. तर नवरात्र मध्ये ही देवीच्या नैवेद्यात ठेवला जातो.
यासाठी तांदळाचा रवा गव्हाचा रवा किंवा आपला साधा रवा ही वापरला जातो. यात प्रामुख्याने असते ती हिरवी मोठी काकडी जिला तवस असे म्हणतात तिचा एक छान वास याला येतो. घरातील अगदी थोडे जिन्नस वापरून हा पदार्थ अतिशय सुंदर बनतो.
यासाठी लागणारे साहित्य :
मोठी हिरवी काकडी 1
2 वाट्या कोणताही रवा
दीड वाटी गूळ 1 नारळ खवलेला
जायफळ वेलची पूड
शेंगदाणे थोडे आणि थोडे ड्राय फ्रूट
कृती … प्रथम किसलेल्या नारळाचे जाडसर वाटण करून घ्यावे. हिरवी काकडी बिया बाजूला काढून साल काढून किसून घ्यावी. मग कढईत थोडे साजूक तूप टाकावे त्यात जो रवा घेतलेला असतो तो छान खरपूस भाजून घ्यावा.
एका जाड बुडाच्या लगरीत किंवा पातेल्यात किसलेली काकडी तिच्या असलेल्या पाण्यासहित घालावी. ती गरम झाली की त्यात गूळ घालावा तो विरघळला की वाटलेला नारळ त्यात घालावा. नारळ वाटताना थोडे पाणी घातल्याने आता आपल्याला जास्तीचे पाणी लागणार नाही.
आता हे सर्व मिश्रण उकळी येईपर्यंत गॅस वर ठेवावे. मग त्याला उकळी आली की त्यात हळू हळू रवा घालून ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात भाजलेले शेंगदाणे ड्रायफ्रुट वेलची जायफळ पूड घालून पुन्हा एकदा ढवळून घ्यावे.
नंतर त्यावर केळीचे पान घालून ते झाकून ठेवावे. गॅस वर खाली एक तवा ठेवावा आणि आपले पातेले त्यावर ठेवावे. पातेल्यावर ही एक तवा ठेऊन त्यावर जळते निखारे ठेवून मंद गॅस वर अर्धा तास ठेवावे. मग गॅस बंद करून 5 तास तसेच भांडे ठेवावे. छान थंड झाले की एका ताटावर पातेले उलटे करावे. मग काकडीचा धोंडस, केक सारखा सुटून येतो.
कसा वाटला हा प्रकार ? आहे की नाही छान ? तर उठा लगेच करून बघा मला सांगा कसा झाला..

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800