जगाच्या पाठीवर हिंडण्याची एक वेगळीच मजा असते. आपण राहतो त्या देशाचा सर्व परिसर पाहून झाला की परदेशवारी कराविशी वाटते. माझी युरोप टूर झाली होती. आतां मी अमेरिकेसाठी सज्ज झाले होते. खरं तर त्याची एक गंमतच झाली. माझ्या मनाला उत्तर नाही पण दक्षिण अमेरिका खुणावत होती. पण तेथे जाण्याची risk सर्व टूरिस्ट कंपन्या घेत नव्हते. अर्थात तो काळ होता 2013 चा. तिथे जाण्याचा योग नव्हता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ध्यानी मनी नसतांना अचानक माझ्या मैत्रिणीने अमेरिकेला येतेस कां असे विचारले आणि आठ दहा दिवसातच आमची अमेरिका ट्रीप फिक्स झाली.
17 जुलै 2013 ला आमचे विमान अमेरिकेकडे झेपावले आणि त्याच दिवशी ते न्यूयार्कला land झाले जवळजवळ बावीस तास प्रवास करून! हे कसे काय ते लक्षात आलेच असेल आपल्या. अहो ! आपल्यापेक्षां अमेरिका 12-14 तास मागे आहे ना ! असो. तर त्या दिवशी फक्त आराम !
दुस-या दिवशी नाश्ता करून आमच्या स्वा-या स्वातंत्र्यदेवतेला प्रणाम करण्यासाठी रवाना झाल्या. हा पुतळा एका बेटावर वसविला आहे. तो पाहण्यासाठी बोटीने जावे लागते. हे बेटही कृत्रिम रितीने बनवले आहे. हडसन नदीवर जवळजवळ अडीच हजार टन कांक्रीट टाकून बेट बनविण्यात आले. या पुतळ्याचे स्टक्चर आयफेल गुस्तावने बनविले. पुतळा ज्याने बनवला त्याने त्या पुतळ्याला आपल्या आईचा चेहरा दिला. हा पुतळा 42 फूट उंच असून त्याच्या हाताची लांबी 16 फूट पंजा 8 फुटी तर बोटे 6 फुटी आहेत. हातात मशाल घेतलेली आहे. डोक्यावर मुकुट असून त्याला 7 टोके व 25 खिडक्या आहेत. ही सात टोके म्हणजे सप्तरंग व सप्तसागरांचे प्रतीक तर 25 खिडक्या या 25 रत्नांचे प्रतीक होय.
या एलीस बेटावर प्रथम ब्रिटिश वसाहती होत्या. कॅनडात फ्रेंच राहात होते. फ्रेंचांचा यांच्याशी 36 चा आकडा ! म्हणून फ्रेंचांनी original वसाहतवाल्यांना पैसा, शस्त्रे पुरवून स्वातंत्र्य मिळविण्यास उद्युक्त केले. स्वातंत्र्य मिळताच यांनी न्यूयार्क ही राजधानी केली. इथे एका ठराविक लोकांची वसाहत कधीच नव्हती. ‘कुणीही यावे टपली मारूनी जावे’ तसे इथे कुणीही यावे वस्ती करूनी राहावे असे होते.
क्रमशः
— लेखन : स्वाती दामले
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800