हर हर महादेव….
कैलासराणा, शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा, मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू, भवदु:खहारी |
तुजवीण शंभो, मज कोण तारी || १||
लहानपणी आईने शिकवलेला हा पहिला श्लोक…..
लहानपणी आमच्या जवळच्या देवळात सुरेख शंकराची पिंड होती. मुख्य देवळाच्या प्रशस्त सभागृहातून आत गेले कि एका चोथऱ्यावर पितळेचा नंदी होता. वर मोठी घंटा होती. ती वाजवून, नंदीच्या च्या शिंगावर हाताचा पंजा ठेऊन, त्या मधल्या जागेतून वाकून समोर पाहिले कि गाभारा आणि शंकरांचा फोटो दिसायचा, भक्तिभावाने असे पहाणे तेव्हा व्हायचेच.
चार पायऱ्या उतरून गेले कि खाली गाभाऱ्यात शंकराची पिंड होती. संगमरवरी फरशीवर ती काळी पिंड उठून दिसायची. बाजूला पांढऱ्या टाईल्स, उदबत्त्याचा सुवास, त्यात मिसळलेला, वाहिलेल्या रंगिबीरंगी फुलांचा मंद वास, पिंडीवर टांगलेल्या चांदीच्या कलशातून थेंब थेंब होणारा दुधाचा अभिषेक, पुजाऱ्यांचा धीर गंभीर आवाज… खूप प्रसन्न वाटायचं !
पिंडीवरून पडणारे दूध, पाणी, नंतर हाताच्या ओंजळीत घेऊन, तीर्थ म्हणून घ्यायचे. त्याची चव दुसऱ्या कशालाच, कधीच येत नाही. ते घोटभर तीर्थ प्यायचे आणि डोळ्यांना लावून तृप्त होऊन, शांत होऊन, निर्भय होऊन, गाभाऱ्याबाहेर यायचे.
आमच्या पलिकडे, एक मोठा आश्रम होता. तिथे मोठ्या सर्व देव देवतांच्या संगमरवरी मुर्ती होत्या. तिथे श्रावणातल्या दर सोमवारी, शंकराची मोठी पूजा असायची. कधी लोण्याची पिंड केलेली असायची, कधी फुलांची.. खूप छान आरास असायची. ते पहायला आम्ही भक्तीभावानी जात होतो.
अजूनही सोमवारी सकाळी अनेक जण लगबगीनं छोट्या पेल्यात दूध, फूलं, बेलाची पानं, तांदूळ, सुपारी, गंध फळ, घेऊन शंकराच्या देवळात जातांना दिसतात. जे देवानी दिले आहे तेच कृतज्ञतेने त्याला वहातात. त्यातलेच प्रसाद म्हणून भक्तिभावाने सेवन करतात. मनांतल्या इच्छा पुऱ्या कर म्हणून प्रार्थना करतात. नविन लग्न झालेल्या महिला पहिली ५ वर्ष शिवामूठ म्हणून दर सोमवारी धान्य (प्रथम तांदूळ, मग पांढरे तीळ, मूग, जवस, सातू) अर्पण करतात. ५ वर्षानंतर उद्यापन करतात. काही जण दिवसभर उपवास करतात. फळं, दूध घेतात. संध्याकाळी लवकर जेवतात.
आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारी आमची शाळा अर्धा दिवस असायची. काही ॲाफिसेस पण लवकर सुटायची. एक वेगळच वातावरण या श्रावणी सोमवारचं असायचं. मोठे झाल्यावर, लहानपणच्या निरागसेत असलेला हा भक्तीभाव काहींचा कमी होतो, तर काहींचा तोच आधार ठरून …. वाढतो.
जेव्हा मन शुध्द असतं, तेव्हा वातावरणही शुध्द असतं, निर्मळ पवित्र असतं.
हे श्रावणी सोमवारी अनुभवायला मिळतं.
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्रावणी सोमवार ही मनाला आनंदून टाकणारी गोष्ट वाचून लहानपण आठवले.सुरेख शब्दांकन.