ताई, २४ ऑगस्ट २०२३ ला तू हे जग सोडून गेलीस. अनंतात विलीन झालीस. गेले काही दिवस तू आजारी असल्याचे माहीतच होते. अलझायमर्स सारख्या अत्यंत करूण व्याधीने तुझा घास घ्यावा हे तुझ्या सर्वच चाहात्यांना फार वेदनादायी होते. कारण तुझी एक मूर्ती, एक प्रतिमा त्याकाळच्या आम्हा रसिकांच्या मनावर ठामपणे कोरलेली आहे.
तसं पाहिलं तर तुझी आणि आमची पिढी एकच. पण पडद्यावरची तुझी अभिनेत्री म्हणून असलेल्या ओळखीने एक वेगळंच आदराचं स्थान आम्ही तुला मनोमन आणि मनापासून दिलं होतं.
मला वाटतं १९५७ साली “आलिया भोगासी” या चित्रपटातून तुझं सिने सृष्टीत पदार्पण झाले. वास्तविक खूप लहानपणी पाहिला होता हा चित्रपट. तेव्हा इतकी जीवनाविषयीची जाणीव नव्हती. चित्रपटही आता फारसा स्मरणात नाही. मात्र कुठेतरी तुझी बहिणीची भूमिका मनावर त्या वेळेपासून नक्कीच कोरली गेली.

“नलिनी सराफ” हे तुझं मूळ नाव. पण सिनेसृष्टीत काही नलिनी त्यावेळी आधीच होत्या म्हणून तुला सीमा हे नवे नाव मिळाले आणि चित्रपट सृष्टीत याच नावाने तुला खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. एक वलय मिळालं.
तुझे १९६० पासूनचे अनेक चित्रपट झळकले. त्यात तुला नायिकेच्या भूमिकेत पाहिले. जगाच्या पाठीवर, वरदक्षिणा, सुवासिनी, या सुखांनो या, अपराध, मोलकरीण अशा अनेक चित्रपटातल्या तुझ्या भूमिका गाजल्या. आणि या माध्यमातून तुझं सात्विक रूप, सौंदर्य, आवाजातील माधुर्य, शालीनता, तुझा रसरशीत अभिनय, प्रेक्षकांच्या मनावर ठसला. सीमाताई ! खरं सांगू, चित्रपटांचा समाजावर नायक नायिकांच्या चांगल्या वाईट भूमिकांद्वारे परिणाम होतच असतो. आदर्श स्त्रीत्वाचा समाजाला संस्कार देणारी तू अभिनेत्री होतीस हे नक्कीच. आमच्या पिढीवर तुझ्या भूमिकांचे आणि अभिनयाचे संस्कार झालेच. स्त्री म्हणून वाढत असताना काय चूक काय बरोबर याचे धडे तुझ्या भूमिकांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. चित्रपटातील आणि नंतर प्रत्यक्ष जीवनातील तुझी आणि रमेश देवची जोडी म्हणजे सिने रसिकांचे प्रमुख आकर्षण.

प्रियकर प्रेयसीचं नातं, पती-पत्नीचं नातं, इतर कौटुंबिक नाती, नायक खलनायक, सासु सुनेचं नातं अशा विविध स्तरांवरील नाती तुमच्या अभिनयातून खुलत असताना नकळत एक समाज घडत होता. आदर्श मूल्यांचं खतपाणी होत होतं. त्यादृष्टीने सीमाताई, तुझ्या वेगवेगळ्या पदर असलेल्या भूमिका महत्त्वाच्या होत्या.
हिंदी चित्रपटातही तू काम केलेस. पण तिथेही तुम्ही दोघांनीही तुमचं मराठी मन सांभाळलं. मराठी संस्कृती जपलीत.
काही वर्षांपूर्वीच तुझं “सुवासिनी” हे आत्मचरित्र वाचलं होतं. एक अत्यंत प्रामाणिकपणे लिहिलेलं लेखन. त्यात तुझं बालपण, आर्थिक परिस्थितीमुळे तुला सिने क्षेत्रात यावे लागल्याचे किस्से, फिल्मिस्तानच्या नडीयादवालांची शिफारस, तुझी नृत्यकला, तुझे चित्रपट, राजा परांजपे, राजा ठाकूर यांसारखे तुझे गुरु, रमेश देव आणि तुझी प्रेम कथा, विवाह, संसार, मुलं— नातवंड यात तुझं रमणं. हे सगळं अतिशय प्रवाही आणि वाचनीय वाटलं होतं. ते वाचताना तू आम्हाला आमच्यातलीच वाटली होतीस. शिवाय हे सगळं वाचत असताना एकीकडे एक सेलिब्रिटी, करियर वूमन, नामांकित अभिनेत्री बरोबरच एक कुटुंब वत्सल, कर्तव्यदक्ष, जबाबदार गृहिणी, मुलं, सुना, नातवंडं मध्ये रमणारी स्त्री, एक आदर्श पत्नी, माता, सासु म्हणूनही तू दिसलीस. आणि अधिक भावलीस. पडद्यावरच्या विविध आभासी भूमिका साकारताना त्याच भूमिका प्रत्यक्ष जगतांनाही निभवल्यास हे विशेष.

दीड वर्षांपूर्वी रमेश देव यांचे निधन झाले तेव्हा मनात पहिला विचार आला तो म्हणजे, “दोन हंसा ची जोडी तुटली” हाच.
सीमाताई ! आज हे लिहीत असताना मनात हुंदका दाटून येतो. नाटकातल्या, सिनेमातल्या सगळ्या भूमिका आठवतात. एकेका भूमिकेला पडद्यावर तू दिलेला न्याय, जिवंत आकार पुन्हा पुन्हा नजरेसमोर येतो आणि वाटतं एक युग आता संपलं ! सात्विकता ! सौंदर्याचं एक पर्व पडद्याआड गेलं. मराठी चित्रपट सृष्टीतील आणखीन एक हिरा हरपला.
तुला पुष्कळ पुरस्कार मिळाले. झी मराठीच्या जीवनगौरव पुरस्काराने तुझ्या संपूर्ण कारकिर्दीला मानाचा मुजरा मिळाला. आणि या सर्वांपेक्षा ही महत्वाचे तुझ्यासाठी काय असेल तर रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम ! तू गेलीस, डोळ्यातले अश्रू मागे ठेवून.
…एकवार पंखा वरती फीरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात..”
या गाण्याच्या वेळचा तुझा अस्सल अभिनय ..तो मागे ठेवून गेलीस.
“बाई मी विकत घेतला श्याम” असो किंवा “येणार नाथ आता येणार नाथ आता” या विरह गीतातील तू, कशी पडद्याआड होईल ?
सीमा, तुला प्रेम भावाने श्रद्धांजली वाहताना सांगावस वाटत, तू आमच्या स्मृति पटलावर तुझ्या अभिनय शिल्पाच्या रूपात कायम राहशील…

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सीमा देव सारखी अभिनेत्री परत होणे नाही
👌👌