सरींवर सरी श्रावणसरी
मोगरा,अनंत फुलले दारी
मंगलकलश घ्या हो करी
मंगळागौर आली घरोघरी
या सयांनो या ग या
मंगळागौर पूजायला
रात्र लागली घुमायला
फुगड्या लागल्या रंगायला
फुगडी घालू गरागरा
गिरकावूया भराभरा
तास वाजतो खणाखणा
फुगडी घाला दणादणा
कुणीही कां बोलवेना
खुर्ची का मिर्ची बोल ना
नसला गजरा वा दागिना
नाच ग घुमा नाच ना
आळुंखी साळुंखी रामाची पालखी
टिचक्यांच्या तालावर बदला पाटी
पाणी लाटा बाई पाणी लाटा
खेळा आगोटा पागोटा
लाट्या बाई लाट्या लाटणी घ्या
किकीच्या पानासाठी धावत या
किस बाई किस दोडक्यांना
झुंजवू या ना कोंबड्यांना
दोन उड्या पुढे दोन मारा मागे
हटुश्य पान बाई हटुश्य
गोठतोडे घालू आपण नटूश्य
सरसर गोविंदा येतो
लाडूझिम्म्याला रंगवितो
मोर नाचरा खुलवतो
खेळणा-यांना नाचवितो
आई मी येऊ कां खेळायचे कां?
सवती मत्सर दाखवायचा कां?
नको बाई भांडण नको तंटा
गंमत जंमत नुसतीच थट्टा
सासर माहेरच्या माणसांचा मेळ
रंगतो मंगळागौरीचा खेळ
थोडीशी होते धीट सूनबाई
तो-याशी फारकत घेते सासूबाई
विसरतात वयं निसटतात मणी
ओठावर येतात आठवणीतील गाणी
श्र्लोक,कविता शब्दांचा मेळ
जोडीला होतो उखाण्यांचा खेळ
तालासुरांच्या नादात खेळाची चढते नशा
कळतच नाही कधी सरली केव्हां निशा
तृप्त आनंदाची घेऊन ताजी शिदोरी
पहाट सरून सूर्यबिंब आले क्षितिजावरी

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800