छत्रपती शिवाजी विद्यालय सातपुर, नाशिक येथे शुक्रवारी पाचवी ते सातवी आणि शनिवारी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पावसाची गाणी’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
सौ. सुजाता येवले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमात सौ.सविता पोतदार, सौ.अलका अमृतकर, सौ.लीना जोशी यांनी विविध पाऊस गाणी आणि कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. समृद्ध मराठी साहित्य, साहित्यिक यांबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी यासाठी वरील सर्व साहित्यिकांची धडपड आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना सौ. सुजाता येवले म्हणाल्या, हल्ली इंटरनेटच्या युगात लोप पावत चाललेल्या वाचन, लेखन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही धडपड आहे. पावसाची गाणी या कार्यक्रमांतर्गत ‘येरे येरे पावसा’, ‘ए आई मला पावसात जाऊ दे’, ‘टप टप टप टप थेंब वाजती’, ‘ पाऊस आला पाऊस आला बघा बघा हो आला आला’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी’, ‘अग्गोबाई ढगोबाई’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘नाच रे मोरा’, ‘आला आषाढ श्रावण’ इत्यादी अनेक दर्जेदार कवितांचे वाचन, गायन करण्यात आले. शांता शेळके, मंगेश पाडगावकर, बा सी मर्ढेकर, संदीप खरे, विंदा करंदीकर इत्यादी कवींची माहिती देण्यात आली. तसेच सर्व कवयित्रींनी त्यांच्या स्वतःच्या रचना सादर केल्या.

कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी प्रायमरीचे मुख्याध्यापक श्री एस आर दाणे सर, पर्यवेक्षक श्री ए सी गुंडगळ सर, सौ संध्या ठाकरे मॅडम, तसेच माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री मधुकर पवार सर, पर्यवेक्षिका शिंदे मॅडम, सोनाली अहिरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
पाहुण्यांचा परिचय काळे सरांनी केला. तर आभार प्रदर्शन मोहिते सरांनी केले. कार्यक्रमास विशेष उपस्थिती संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री रायते सर यांची होती.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800