Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : 26

मी वाचलेलं पुस्तक : 26

खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा

पूर्वी काही मासिकात विशेषतः मराठी, इंग्रजी डायजेस्ट मासिकात एखादा लेख संपला की ब-यापैकी मोकळ्या पानावर वृत्तपत्राच्या भाषेत ‘पानपुरके’ म्हणत असत, त्यात थोरामोठ्या विभुषितांचे, संतांचे छोटेसे सुभाषित दिले जायचे. त्यात खलील जिब्रान यांच्या ‘सुभाषितांचा आणि ‘ ‘विचारा’चा प्रामुख्याने समावेश असायचा ! त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल काहीसे कुतुहल होते ! ते पुस्तकाचा शोध घेतांना अचानक मला ‘खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा’ या पुस्तकामुळे मिळाले. त्याचा मराठी अनुवाद स्मिता लिमये यांनी उत्तमपणे केला आहे़.

या पुस्तकामुळे खलील जिब्रानच्या जीवनाचा आलेखही समजला आणि सर्व कथा देखील आवडल्या ! या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे, जास्तीत जास्त पाव ते अर्धा आणि दीड पानात बहुतेक कथा समाविष्ट आहेत. फक्त तीनचार पानांच्याही काही आहेत. अत्यंत कमीतकमी शब्दात या कथा साकारलेल्या आहेत. हे वैशिष्ट्य मला तरी फार आवडले !

खलील जिब्रान (1883ते 1930) हे इंग्रजी व अरबीतील लेखक व चित्रकार म्हणून आजही कायम नावाजले जातात. त्यांनी लिहिलेल्या 25 पुस्तकापैकी 17 इंग्रजी व 8 अरबी भाषेतील आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कथांचा जगातील वीसपेक्षाही अधिक भाषेत अनुवाद झाला आहे. त्यांच्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट 51 कथांची निवड करून देण्याचा प्रयत्न स्मिता लिमये यांनी मराठी साहित्याच्या वाचकांना या पुस्तकात छान पैकी केला आहे. त्यातील अर्धा ते एक पानांच्या 48 कथा असून तीन दीर्घ कथा कथांचा समावेश आणि खलील जिब्रान यांचा धावता परिचय देखील केला आहे.

आपल्या स्फोटक आणि सडेतोड लेखनाने खलील जिब्रान यांनी त्यांच्या लेबनानमध्ये एकेकाळी अराजक निर्माण केले होते. ख्रिस्ती धर्माबद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा होता. मात्र त्यातील दांभिकतेवर ते कठोर प्रहार करीत असत. पाद्री लोक ख्रिस्ताच्या शिकवणूकीचा चुकीचा व मनमानी प्रचार करून गरीब भोळ्या जनतेचे शोषण करीत आणि त्यांना फसवून आपलं घर भरत होते. तर शासक त्यांच्या या प्रवृतीला उत्तेजन देत होते. सगळीकडून मार खाणा-या जनतेचा आवाज ऐकणारा मात्र कुणीच नव्हता. खलीलच्या मनात खदखदणारा हा संताप साहित्यरुपाने बाहेर आला आणि अल्पावधीत त्यांचे बंडखोर विचार सर्वत्र प्रसिद्ध झाले. इतके की त्यांना धर्माच्या बाहेर काढून टाकून देशातूनही हद्दपार केले. त्यांचे सर्व साहित्य जाळून टाकले.

पुढे ते संकटाला तोंड देत पॅरिस व नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. स्वतः चित्रकार असल्याने त्यांनी न्युयाँर्क येथे छोटा स्टुडिओ थाटला. त्यांच्या या पेंटिंग्जची प्रदर्शने अमेरिका, फ्रान्स, इंग्लंडमध्ये आयोजित केली. कलेच्या प्रतिभेबरोबरच ते साहित्याचे सृजनशील लेखन करीत राहिले. ‘द मॅडम’, ‘द फोर रबर’, ‘द गार्डन आँफ द प्राँफेट’, ‘जीझसःद सन ऑफ मँन’ या त्यांच्या काही श्रेष्ठ साहित्य कलाकृती आहेत. विशेष म्हणजे ज्या चर्चच्या आदेशानुसार खलील यांना हद्दपारीची शिक्षा दिली, त्याच चर्चच्या हुकुमानुसार लेबनानमधील स्वतःच्या ‘बशरी’ गावात त्यांचे शव अमेरिकेतून आणून विधिवत व सन्मानाने दफन केले गेले !

खलील जिब्रान

मानव जात सुख, चैन, आणि आरामाचे जीवन जगण्याच्या लायक होण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते त्यांच्या नावाप्रमाणेच समर्पक आहेत. खलीलचा अर्थ ‘निवडलेला प्रिय मित्र’ आणि जिब्रानचा अर्थ ‘आत्म्याला संतोष देणारा’ असा सार्थ आहे. हे झाले त्यांचे जीवन चरित्र ! तथापि त्यांच्या सुभाषित व छोट्या छोट्या कथा सादर करण्याचा मोह मला होत आहे, त्या याप्रमाणे….

सुभाषित.

1- अत्यंत धनवान आणि अत्यंत कमी निर्धन यामध्ये एक दिवसाची भूक आणि एक तासाच्या तहानेचं अंतर आहे.
2- जे पुरुष स्त्रियांच्या छोट्या छोट्या अपराधांना क्षमा करीत नाहीत, ते तिच्या महान गुणांचं सुख भोगू शकत नाहीत.
3- आनंद, वेदना आणि आश्चर्याच्या रसात कांही शब्दांना सामील करणं म्हणजेच कविता आहे.
4- आईच्या ह्रुदयातल्या शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या बाळाच्या ओठांवर खेळतं.
5- जगात फक्त दोन तत्वं आहेत- एक सौंदर्य आणि आणि दुसरं सत्य. सौंदर्य प्रेम करणा-यांच्या ह्रदयात आहे आणि सत्य शेतक-याच्या बाहूंमध्ये !
6- काट्याचा मुकुट बनवणारे हातसुध्दा आळशी हातांपेक्षा बरे आहेत.

आणि दोन छोट्या कथा.

1- स्वप्न.
“एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा आपल्या स्वप्नांचा अर्थ विचारायला तो आपल्या ज्योतिषाकडे गेला.
ज्योतिषाने त्याला म्हटले, “माझ्याकडे तू जेव्हा अशा स्वप्नांचा फळ विचारायला येशील, ज्याला तू जागेपणी पाहिलं आहेस, तर त्याची फळ मी तुला सांगू शकेन, पण झोपतल्या स्वप्नांचा ना माझ्या ज्ञानाशी काही संबंध आहे, ना तुझ्या कल्पनेशी”!

2. पूर्ण चंद्र….

पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण तेजासहित उगवला. नगरातील सा-या कुत्र्यांनी चंद्रावर भुंकायला सुरुवात केली.
केवळ एक कुत्रा गप्प होता. त्याने मोठ्या गांभीर्याने इतर कुत्र्यांना म्हटलं “शांततेला तिच्या झोपेतून उठवू नका आणि चंद्राला आपल्या हल्ल्याने भूमीवर बोलवू नका”
दुस-या कुत्र्यांनी भुंकणं बंद केलं. भयावह शांतता पसरली, पण तोच उपदेशक कुत्रा सारी रात्र शांततेचा उपदेश देत भुंकत राहिला !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments