भारतीय संस्कृती मधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग म्हणजे गुरु शिष्य परंपरा होय. शिक्षक हे जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करतात.
दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. ते स्वतः एक महान दर्शनीक आणि शिक्षक होते. शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम त्यांना होते. आदर्श शिक्षकांचे महत्त्वाचे गुण त्यांच्या ठायी होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
खरं म्हणजे, शिक्षकांच्या हातातच देशाचं भविष्य असतं. भविष्यातले डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, लेखक, संशोधक आणि इतर अनेक क्षेत्रातले नामवंत शिक्षकांमुळेच घडतात. देशाचे नाव उज्वल करणारी सामर्थ्यवान पिढी तयार होण्यात शिक्षकांचे महान योगदान असते. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर ताठ मानेने उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचं महत्त्व समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक एकाच बागेत विविध फुलझाडे फुलवणारा जणू एक कुशल माळी असतो. एक प्रकारे मार्गात काटे जरी असले तरी गुलाबाप्रमाणे हसत सुगंधित जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक प्रेरणा देत असतात. शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असतं. शिक्षक चांगल्या चारित्र्याची पिढी घडवण्यास समर्थ असतात आणि म्हणून ते सन्माननीय असतात.
मात्र आज खेदाने म्हणावेसे वाटते की शिक्षणाचा धंदा झाला आहे. ज्ञानाची बोली लावली जाते. पदव्या विकत घेतल्या जातात. शिक्षण क्षेत्रात दुर्व्यवहार वाढले आहेत आणि यास दुर्दैवाने शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही जबाबदार ठरतात. एक काळ असा होता की विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी प्रचंड आदर होता आणि शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीची तळमळ होती. पण खेदाने म्हणावे लागते आज या पवित्र नात्याला कुठेतरी लोभ, स्वार्थ, हाव यांची कीड लागलेली आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे शिक्षक दिन साजरे करून पुन्हा एकदा गुरु शिष्य परंपरेला उजाळा मिळावा हाही हेतू असतोच. या महान परंपरेला उत्तमरित्या समजून नव समाज निर्मितीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहयोग प्रदानाची अपेक्षा आहे.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली आणि राधाकृष्णन यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे सुचवले. तेव्हापासून पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी विद्यार्थी शिक्षकांची भूमिका घेऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन आवडीचा विषय घेऊन शिकवतात. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षकांचा सन्मान करतात. आदराने पुष्पगुच्छ, भेट वस्तूही त्यांना देतात. थोडक्यात या दिवसाचे महत्त्व म्हणजे गुरु शिष्य परंपरेचे पावित्र्य सांभाळणे.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि नवी सुसंस्कारित, चारित्र्यवान पिढी निर्माण करणे हेच होय. यात समस्त भारतीयांचा सहयोग असावा हीच अपेक्षा. धन्यवाद !

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800