जननी जन्मभूमी आणि शिक्षक हेच तर खरे संस्कृतीचे रक्षक आहेत.
अपवाद जरी असेल कुणी परि असंख्य शिक्षक आहेच आमचे गुणी.चला करूया गुरूंचे स्मरण ज्यांनी फुलविले आमचे जीवन..
माझ्या सर्व गुरुजनांना आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या देशात अनेक दिन साजरे होतात ते कोणत्या ना कोणत्या कारणाने. तसाच आजचा शिक्षकदिन ही असेच एका खास निमित्त साधून केला जातो आणि ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांच्या सामर्थ्याचा, स्वप्नांचा आणि तत्वांचा आदर व्हावा यासाठी आजचा दिवस शिक्षक दिन.
डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती. पण त्या अगोदर त्यांची खरी भूमिका, खरे व्यक्तित्व म्हणजे ऋजू स्वभाव, प्रांजळ मन, चिंतनात्मक तात्विक विचार असणारे एक शिक्षक हीच ओळख सर्वश्रुत आहे.

काही शिक्षक हे केवळ वर्गातल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांची संख्या अधिक असते. पण याही पुढे जाऊन काही शिक्षक आपल्या बरोबरच्या आणि आणि अनेक भावी पिढ्यांचे ही शिक्षक असतात. हे शिक्षक पद किंवा गुरुपद त्यांच्या खोल व तत्त्वनिष्ठ, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होत असते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे याच गटातील थोर आचार्य होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून त्यांना दिशा देण्याचे आणि प्रेरणा देण्याचे काम ही तेच करतात. व्यक्तिमत्व विकास, समाज सुधारणा असो की समाजपरिवर्तन, सर्वांचे मूळ शिक्षण आणि शिक्षक हेच आहे. म्हणूनच त्यांना नव्या समाजाचे नवे शिल्पकार असं मानलं जात. नदी ज्याप्रमाणे वाहत जाऊन समुद्राला जाऊन मिळते तसे काही शिक्षक घरोघरी जाऊन ज्ञान देतात. म्हणूनच त्यास महान समाजसेवक मानतात. या निर्मात्याला शतशः प्रणाम..
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात सर्वश्रेष्ठ शिक्षण महर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळला जाऊ लागला या मागचा उद्देश म्हणजे शिक्षकांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे हाच आहे.
लहान मूल जेव्हा जन्मते तेव्हा त्याचे ज्ञान शून्य असते. आईवडील त्याला मोठे करतात आणि शाळेला पाठवतात. एखादा शिल्पकार जसा दगडाला मूर्त स्वरूप देतो तसं शाळेत आलेल्या मुलासमोर आपले ज्ञानाचे भांडार खुले करून देऊन त्याला सुसंस्कृत बनवतात.

आपल्या संस्कृतीत जे तीन ऋण मानले आहेत. त्यात मातृ-पितृ आणि गुरु ऋण आहे. आपल्या परंपरेत शिक्षकाचे स्थान श्रेष्ठ आहे कारण शिक्षक हे आपले ज्ञानदाता आहेत. इतर दाना पेक्षा ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानले जाते. कारण अन्नदानातून क्षणिक समाधान आनंद मिळतो. परंतु ज्ञानदानातून जीवनभर आनंद व समाधान मिळते. हे काम होते ते फक्त केवळ सच्च्या शिक्षकाकडून होतं असतं म्हणूनच शिक्षकांना समाज निर्माण करणारा शिल्पकार असे म्हटले जाते….
नभ असे हे औदार्य
असावे जयाचे थोर…
अशा या शिक्षण महर्षींना व गुरुजनांना माझा शतशः नमस्कार…

— लेखन : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🙏