Sunday, July 13, 2025
Homeलेखसाहित्य तारका : १५

साहित्य तारका : १५

काशीबाई कानिटकर

स्त्रीने स्वतंत्रपणे कादंबरीरुपाने केलेला लेखनाचा पहिला प्रयत्न म्हणजे १८७३ मध्ये प्रकाशित झालेली साळूबाई तांबवेकर यांची “चंद्रप्रभाविरहवर्णन” ही कादंबरी.. मराठीतील पहिली कादंबरी. “चंद्रप्रभाविरहवर्णन’ लिहिण्याचा मानही त्यांचाच.. स्त्री लिखीत पहिली कादंबरी म्हणून “चंद्रप्रभाविरहरवर्णन” (१८७३) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो..
त्यानंतरच्या कालखंडामध्ये ब-याच स्त्रियांनी कादंबरी लेखन केले…

आधुनिक मराठी साहित्यातील आद्य लेखिका, पहिल्या स्त्री कथाकार-कादंबरीकार काशीबाई कानिटकर.. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध…भारतीय स्त्रीच्या हातात शिक्षणाची गंगा येऊन जेमतेम तेरा चौदा वर्षं झाली होती. शतकानुशतकं माजघर-स्वयंपाकघराचा उंबरा न ओलांडणाऱ्या स्त्रियांनी पाटी-पुस्तक घेऊन शाळेत जाण्याचा विचार अजून जनमानसांत रुजलेला नव्हता.

मराठीतली पहिली स्त्री कादंबरीकार, लेखिका म्हणून ख्याती मिळवलेल्या काशीबाई कानिटकर यांचा जन्म २० जानेवारी १८६१ रोजी सातारा जवळील अष्टे या गावी झाला.
काशीबाई कानिटकर आधुनिक मराठी साहित्यातील आद्य लेखिका.मराठी साहित्यातील कादंबरी, चरित्र आणि कथा या साहित्य प्रकाराचे महिला म्हणून त्यांनी प्रथमता लेखन केले.. त्या काळाच्या कित्येक पावलं पुढे असलेले विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले आणि साहित्य निर्मितीची कवाडं स्त्रियांसाठी सताड उघडली.

लहानपणापासून घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे असे खास मुलांचे म्हणून मान्यता पावलेले खेळ काशीबाई यांच्या विशेष आवडीचे.
साधी अक्षर ओळखही नसलेल्या काशीबाई लग्नामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्या अक्षर ओळख करून घेऊ लागल्या. ‘शिवलीलामृता’ सारखे धार्मिक ग्रंथ, ‘नवनीत’ आणि सहावीच्या मराठीच्या पुस्तकाचा त्यांनी अभ्यास केला.
औपचारिक शिक्षण न घेतलेल्या काशीबाई या गोविदरावांकडून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करीत.

गोविंदरावांच्या सहवासात काशीबाईंना अनेक विषयांची गोडी लागली. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली.

काशीबाईंच्या लेखनाला त्यांच्या स्वतंत्रपणे बहरण्याला गोविंदरावांचा पाठिंबा होता. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. सन १८८४ पासून काशीबाईंनी ‘”रंगराव”’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीची प्रकरणे लिहून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. याच कादंबरीने त्यांना “‘मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार”’ ही ओळख मिळवून दिली.
“पूर्वीच्या स्त्रिया व हल्लीच्या स्त्रिया” स्वत:च्या मनाने लिहिलेले काशीबाईंचे हे पहिले स्वतंत्र लेखन. हाच लेख १ मे १८८१ च्या ‘”सुबोध पत्रिके’”त छापून आला.

गोविंदरावांसोबत त्या प्रार्थना समाजातील सभांना जात, चर्चेत भाग घेत असत.त्यांना प्रार्थना समाजातील व्याख्याने ऐकून शास्त्रीय विषयांची गोडी लागली. त्यांनी मराठीतील प्राथमिक शास्त्रीय पुस्तके वाचली तसेच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसह भारतसार व पेशवे, होळकर, पटवर्धन, शिवाजी महाराज इ. बखरीही त्यांनी वाचल्या. याशिवाय कुमारसंभव, किरातार्जुनीय, मेघदूत या संस्कृत नाटकातील बरेचसे श्लोक त्यांनी तोंडपाठ केले होते. शाकुंतल, वेणीसंहार, मृच्छकटिक, मुद्राराक्षस इ. संस्कृत नाटकांचे वाचनही त्यांनी केले होते त्याचबरोबर इंग्रजीही त्या शिकत होत्या.

गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी यांनी मनोरंजन आणि निबंध चंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले मनोरंजन, नवयुग आणि विविध ज्ञानविस्तार इ. मासिकांमधून त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध झाले.
रंगराव (१९०३) व पालखीचा गोंडा(१९२८) या कादंबर्‍या आणि शेवट तर गोड झाला (१९८९), चांदण्यातील गप्पा (१९२१), शिळोप्याच्या गोष्टी (१९२३) हे कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले तर डॉ.आनंदीबाई जोशी यांच्या चरित्रात्मक पुस्तकाने साहित्यात त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. तसेच हरीभाऊंची पत्रे हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

काशीबाईं यांचे लेखन हे अनुभवावर आधारित असल्याने प्रत्ययकारी आहे. वर्णने लांबलचक, तपशीलवार असतात. पण त्यातही त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्तीच प्रत्ययाला येते…

१९०६ मध्ये पुणे येथील ग्रंथकार संमेलनाचे गोविंदराव कानिटकर अध्यक्ष असताना त्या संमेलनाला त्या एकट्या स्त्री लेखिका म्हणून उपस्थित होत्या.

१९०९ मध्ये वसंत व्याख्यानमालेत काशीबाई अध्यक्ष होत्या. त्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ठरल्या. पुणे सेवासदन संस्थेच्या स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. सेवासदनच्या काशीबाई उपाध्यक्षा होत्या. तर पंडिता रमाबाईंबरोबर काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाला हजर असणार्‍या आठ महिला सदस्यांपैकी महाराष्ट्रातील एकमेव हिंदू महिला-काशीबाई उपस्थित होत्या.

एक अशिक्षित खेडवळ मुलगी ते मराठीमधील पहिली स्त्री कादंबरीकार हा त्यांचा प्रवास विस्मयचकीत करणारा आहे. या उंचीवर त्या पोहोचल्या त्यात अनेक घटक गोष्टींचे योगदान आहेच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांची अंत:प्रेरणा.
लेखिका होण्यासाठी आवश्यक असलेली व्यक्त होण्याची, आपले म्हणणे खुलेपणाने मांडण्याची ऊर्मी त्यांच्यात बीजरूपाने होतीच. अनुकूल पर्यावरणामुळे त्याचे एका सुंदर फळाफुलांनी लगडलेल्या वृक्षात रूपांतर झाले.

मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठविणा-या या महान लेखिकेचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments