एक झाड आणि दोन पक्षी
कादंबरीकार , नाटककार, पटकथाकार, दिग्दर्शक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या विश्राम बेडेकर यांच्या चरित्राबद्दल अनेकांना कुतूहल असणारच. त्यातून ते आत्मचरित्र असेल तर साहित्य रसिकांना ते जास्त आवडेल यात शंकाच नाही.
अनेक साहित्यिकांनी आत्मचरित्र लिहिली आहेत. परंतु विश्राम बेडेकर यांचे “एक झाड दोन पक्षी” हे आत्मचरित्र त्यांच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला शोभेल असेच आहे़. हे आत्मचरित्र वाचल्यानंतर असे लक्षात येते की बेडेकर वाचकांना कधी सरळ सांगतच नाहीत. त्यांना आपल्या जीवनाविषयीचं काही सांगायचं आहे़ तसेच ‘बरंचसं’ लपवायचं आहे़. लेखाचा बाज मात्र मंडूकोपनिषदातल्या एका वृक्षावरील दोन पक्षांचा दृष्टांत देत ‘हा मी’ आणि ‘तो मी’ अशा प्रकारचा एक ‘मी’ विवेकी तर दुसरा ‘मी’ विकारी.
माणसाचे एक मन जीवनाचा अनुभव घेते, तर दुसरे मन त्या अनुभवाचे विश्लेषण, चिंतन करणाऱ्या ‘मी’ ने अनुभव घेणाऱ्या ‘मी’ ची जीवनकथा सांगितली आहे़. म्हणूनच हे आत्मकथन असूनही तृतीय पुरुषी निवेदन आहे़. ‘मी’ च्या न्यायालयात अखंड चाललेली ‘मी’ चीच ही छाननी उलट तपासणी जीवनवृक्षावरील या दोन पक्षांच्या संवाद संघर्षातच विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्राचे बळ साठवलेले आहे़. त्यामुळे वाचकरुपी न्यायाधिश म्हणून मी माझ्या निकालपत्रात मला समजलेले बेडेकर कसे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे़.
विश्राम बेडेकरांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. त्यांचे पाळण्यातले नांव विश्वनाथ होते. त्यांचा एक “श्रीराम” नावाचा खास मित्र होता. त्यामुळे विश्वनाथ बेडेकरांनी स्वतःचे नांव बदलून विश्राम केले. यावरून बेडेकरांच्या मनाला मैत्रीची किती भुक होती हे दिसून येते.
सामान्य पुरुषाचे चरित्र म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांच्या कथांची बेरीज. आईपासून बहिणीपर्यंत, बायकोपासून मैत्रिणीपर्यंत. बेडेकरांचे आयुष्य म्हणजे त्यांच्या स्त्रीपुरुष मित्रांच्या कथांची बेरीज वजाबाकी.
“एक झाड आणि दोन पक्षी” हे बेडेकरांचे आत्मचरित्र म्हणजे मुद्देसूदपणाचा अभाव आहे़. ३५१ पाने असलेले पुस्तक वाचल्यानंतर बेडेकरांना नक्की काय सांगायचे आहे़ ते समजत नाही. कोणतेही प्रकरण सलग दिलेले नाही. नेहमी त्यांची मनःस्थिती द्विधा असायची. म्हणूनच त्यांचे जीवन म्हणजे एक झाड व दोन मने म्हणजे दोन पक्षी असे त्यांना सुचवायचे आहे़.

विश्राम बेडेकर इंटर सायन्सला असताना त्यांच्या वडिलांनी एका सामान्य मुलीशी त्यांचा विवाह ठरवला. बेडेकर यांना ते लग्न पसंत नव्हते. परंतु वडिलांना विरोध न करू शकल्याने बेडेकर लग्नाला तयार झाले. परंतु त्या स्त्रीबरोबर शेवटपर्यंत संसार केला नाही. लग्नानंतर पाचच दिवसांनी परिक्षा होती. त्यांनी निषेध म्हणून गणिताचे पेपर दिले नाहीत व ते नापास झाले.
बेडेकरांनी लग्नानंतर संसारात रमण्यापेक्षा ‘ब्रम्हकुमारी’ नाटक लिहिले. ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत महिना महिना घराबाहेर असत. त्यांची पत्नी गोरी, कामसू व अबोल होती. परंतु बेडेकरांना बरोबरीच्या जोडीदारासाठी ओढ होती. पहिली पत्नी आपल्या बरोबरीची आहे़ असे वाटत नसल्याने ते तीच्या बरोबर संसार करत नव्हते. परंतु बाळुताई खरे बरोबरीच्या वाटल्यामुळे त्यांच्याशी बेडेकरांनी लग्न केले. तरीसुद्धा जेव्हा त्या बेडेकरांपेक्षा काकणभर सरस ठरल्या त्यावेळेस बेडेकरांचा पुरुषी अहंकार दुखावला. बेडेकरांनी त्यांच्याबरोबर सुध्दा व्यवस्थित संसार केला नाही.
प्रेम, प्रीती या शब्दांचे बेडेकरांना फार वावडे होते. तू मला आवडतेस म्हणणे म्हणजे त्यांच्या जीवावर संकट उभे राहायचे. बाळूताई नेहमी बेडेकरांना म्हणत असत की तुझ्या मनात काय चाललेलं असतं कळतच नाही. बेडेकरांच्या बोलण्यावर नेहमी उपरोधाचा, थट्टामस्करीचा मुखवटा असे. कोणाशीही बोलतानासुध्दा मनातले काही सुचवायचे ते आड वळणाने, तिरकसपणे, थट्टेच्या स्वरात आणि शब्दांत बोलत असत.
विश्राम बेडेकर स्त्रीलंपट नव्हते. सिनेक्षेत्रात वावरताना त्यांना अनेक संधी आल्या असतील तरीही त्यांनी कोणातही मन गुंतवले नाही असे आत्मचरित्र वाचल्यानंतर वाटते. परंतु त्यांनी तेवढा भाग टाळला आहे़ की काय ? असाही संशय येतो.
हरी मोटे हा विश्राम बेडेकरांचा खास मित्र होता.त्याची प्रेयसी कृष्णाताई, हरी मोटे यांच्या बरोबरीने बेडेकरांवर सुध्दा प्रेम करत होत्या. किंबहुना बेडेकरांना त्या प्रथम प्राधान्य देत होत्या. तसे त्यांच्या अप्रत्यक्ष बोलण्यातूनही समजत होते. इंग्लंडला गेल्यावर कृष्णाबाईंनी बेडेकरांना दहा पत्रे लिहिली. परंतु बेडेकरांनी ती फोडून वाचली नसली तरी जपून ठेवली व नंतर कृष्णाबाईच्या ताब्यात दिली. यावरून त्यांनी कृष्णाबाईच्या प्रेमाला साथ दिली नसून त्यांच्या मित्राच्या प्रेमाला साथ दिली व मित्राच्या आणि कृष्णाबाईच्या प्रेमातला आपला अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हरीचे व कृष्णाबाईचे लग्न झाले. परंतु कृष्णाबाईनी हरीची व बेडेकरांची मैत्री तोडण्याचा तर प्रयत्न केलाच व ज्या ज्या वेळेस बेडेकरांचा अपमान करण्याची संधी येईल त्या त्या वेळेस कृष्णाबाईनी बेडेकरांचा अपमान केला. परंतु दैवयोग असा होता की कृष्णाबाईंच्या भगिनी बाळूताई बेडेकरांच्या प्रेमात पडल्या व त्यांचे ३० डिसेंबर १९३८ रोजी लग्नही झाले. त्यांना १९४० साली मुलगा झाला त्याचे नांव श्रीकांत ठेवले. मुलगा होऊनही बेडेकर संसारात रमले नाहीत. बाळूताई व बेडेकर यांचे किरकोळ गोष्टींवरून खटके उडायचे. कृष्णाबाई आगीत तेल ओतायच्या. त्यामुळे संसार तुटण्यापर्यंत पाळी यायची.
बाळूताई यांचे ‘विरलेले स्वप्न’ हे पुस्तक लोकप्रिय झाले होते. त्यासंदर्भात त्यांनी बेडेकर यांना प्रतिक्रिया विचारली. त्यांनी ते पुस्तक ‘भिकार’ आहे़, असे म्हणून बाळूताई यांचा अपमान केला. त्यावर बाळूताई चिडल्या व म्हणाल्या तुला त्या पुस्तकाला नांव ठेवण्याचा काय अधिकार ? तू अद्याप एकच नाटक लिहिलं आहे़. ते सुध्दा जन्मल्यानंतर सहा महिन्यात मेलं आहे़. विश्राम बेडेकर यांना ते शब्द वर्मी लागले. त्यांनी दुसऱ्या दिवसांपासून बाळूताईच्या नकळत लेखनास सुरुवात केली व दोन महिन्यांत पुस्तक प्रकाशित करून दाखवलं. ते पुस्तक म्हणजेच “रणांगण” कादंबरी. हया एकाच कादंबरीने बेडेकर यांचे नांव साहित्य क्षेत्रात दुमदुमले. असे हे बेडेकर जिद्दी तर होतेच परंतु बुध्दीमानही होते हे सिध्द झाले.
विश्राम बेडेकरांचे बोलणे चमकदार होते पण व्यासंगाचे, विद्वत्तेचे बूड नव्हते, श्रम अभ्यास, शिस्त, सातत्य हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांच्या बोलण्यात मुद्देसूद मांडणीची आरास नव्हती. तसेच लेखनातही मुद्देसूद पणा नव्हता असे आत्मचरित्र वाचताना वाटते. माणसाचा आत्मगौरव त्याने गोळा केलेल्या अनेक असत्यावर उभा असतो. बेडेकरांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर असा प्रश्न पडतो की बेडेकरांची नैतिकता सावध होती की तिला कसोटीच लागली नव्हती ? इत्यादी प्रश्नांचे गुढ संपुर्ण आत्मवृत्त वाचल्यानंतरही मला उलगडले नसले तरी या आत्मचरित्राला १९८५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. इतर अनेक साहित्यिकांनी विपुल साहित्य निर्मिती केली तसेच त्यांना विविध पुरस्कार मिळाले असले तरी त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले नाही. त्या बाबतीत विश्राम बेडेकर भाग्यवान ठरले. त्यांना १९८८ साली मुंबई येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले होते. बेडेकरांनी ३० ऑक्टोंबर १९९८ रोजी जगाचा निरोप घेतला.
वाचकांनी बेडेकर यांचे आत्मचरित्र जरूर वाचावे, ही अपेक्षा.

— परीक्षण : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800