भारत स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त असतानाच्या काळात भारतामध्ये “औद्योगिक विवाद” आणि “कामगार कायदे” ह्यांविषयी विशेषत्वाने कार्य करणारे मोजकेच वकील अस्तित्वात होते आणि एडव्होकेट काॅम्रेड मदन फडणीस हे त्यांच्यापैकी एक होते, जे कामगारांचे प्रतिनिधी म्हणून कोर्टात उपस्थित राहताना व केसेस लढवताना कधीच पैशाच्या पाठीमागे धावले नाहीत. कामगार वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समर्पित असलेले आणि कम्युनिस्ट विचारसरणीने प्रेरित असलेले औद्योगिक चळवळीचे खंदे कार्यकर्ते काॅम्रेड मदन फडणीस हे एक प्रख्यात वकील, एक प्रेमळ व्यक्ती आणि एक सज्जन गृहस्थ म्हणून त्यांच्या शेकडो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते.
श्री. गजानन दत्तात्रय फडणीस आणि सौ. सरस्वतीबाई गजानन फडणीस ह्या दाम्पत्याचे हे दुसरे अपत्य आणि पहिला वहिला लाडका मुलगा… श्री. मदन गजानन फडणीस! जन्म २३ सप्टेंबर, १९२३ ! आज, दिनांक २३ सप्टेंबर, २०२३ रोजी शतकपूर्ती करणारे एक ओजस्वी व्यक्तिमत्व !

ब्रिटिश राजवटीत पोलिस डिपार्टमेंट मध्ये नोकरी करत असलेले, अतिशय करारी आणि कडक स्वभावाचे वडील ! चार मुलगे आणि चार कन्या ह्यांच्या प्रपंचाची धुरा वाहताना अधिकच शिस्तप्रिय आणि काटेकोर वृत्ती अंगी बाणवलेले ; आणि तरीही एक उत्तम क्रिकेटपटू आणि वाचन, लेखन, गायन वगैरे कलांची उत्तम जाण असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व! आई सौ.सरस्वती ह्या कल्याण येथील सुप्रसिद्ध पुरोगामी सुळे परिवारातील कन्या; त्या काळातही शिकलेली आणि कथा-कादंब-या, धार्मिक पुस्तके वगैरे वाचन करणारी सुशिक्षित स्त्री! अशा सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील हा पहिलाच मुलगा,मदन फडणीस !
कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचारांच्या, प्रगत शहरात मदनचा जन्म आणि शालेय शिक्षण झाले. आपल्या मुलाने खूप शिकावे आणि नावलौकिक कमवावा, ही सर्वसाधारण आईवडिलांची इच्छा त्यांच्याही मातापित्यांनी बाळगली होतीच ! मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती असूनही, मदनला इच्छा असती, तर वडीलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करवून दिलेही असते.
पण देशामध्ये स्वातंत्र्याचे वारे वाहात होते. तेजाचे व्रत स्वीकारून प्रत्येक अन्यायाचा प्रतिकार करणा-या लढवय्या कोल्हापूर शहरात, जन्म झालेला तरुण मदन, कोल्हापूरच्या वैचारिक दृष्टीने प्रगत अशा, राजकीय आणि सामाजिक वातावरणात वाढला होता. कोल्हापूरचे शासनकर्ते शाहू महाराज ह्यांच्या विचारांचे युगप्रवर्तक वारे अंगावर खेळवत असलेले मदन आणि त्यांची थोरली बहीण प्रभा हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्यासाने झपाटले होते. करवीर नगरी मध्ये शाहू महाराजांनी मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मोफत करून दिले असल्याने, मोठी बहीण प्रभा पदवीधर झाली; परंतु शिक्षण पूर्ण होताच ती पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत सामिल झाली. आपल्या थोरल्या बहिणीच्या पावलांवर पाऊल टाकून, शालेय शिक्षण पूर्ण होताच, मदन सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीत उतरले. दोघांनीही वेळोवेळी कारावास सोसला. भारत देश स्वतंत्र झाला खरा, पण मदनचे लढवय्ये रक्त त्यांना स्वस्थ बसू देणे शक्यच नव्हते. पुढे स्वतंत्र भारतात, मदन कधी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा लढा , तर कधी कामगार चळवळीत सहभाग, वगैरे सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये गुंतत राहिला.
मदनचे मामा, कल्याण येथील सुप्रसिद्ध कायदेपंडीत एडव्होकेट काॅ.के.टी. सुळे हे तत्कालीन राजकारणात नावाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कम्युनिस्ट विचारांचा पगडा मदनच्या तारुण्याला आवाहन करत होता आणि बदलत्या राजकीय वातावरणातील भोवतालची विषम परिस्थिती त्यांना कामगार चळवळीत स्वतःला झोकून देण्यासाठी साद घालत होती.
शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईला आलेले मदन फडणीस नोव्हेंबर,१९४१ मध्ये, कम्युनिस्ट पार्टीवर प्रतिबंध लागलेले असतानाही पार्टीचे सदस्य बनले. पार्टीचे प्रमुख नेते भूमिगत किंवा नजरकैदेत असताना, ट्रेड युनियनच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी अक्षरशः कोणीही नव्हते, अशा काळात मदनला तेव्हा “गिरणगाव” म्हणून प्रसिद्ध असलेल्या परळ, मुंबई येथील कापड गिरणी कामगारांच्या केंद्रीय कार्यालयात काम करण्यासाठी पाठवण्यात आले, जिथे त्यांना कामगार संघटनेच्या मूलभूत गोष्टींचा प्राथमिक स्तरावर अभ्यास करण्याची संधी मिळाली.
ह्याच दरम्यान, १९४२ मध्ये, मदन फडणीस राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्यात प्रथम क्लार्क म्हणून आणि नंतर पदोन्नति घेऊन रेशनिंग इन्स्पेक्टर म्हणून कामाला लागले होते. नोकरीत असतानाच स्वतःची शैक्षणिक प्रगती साधत मदन स्वतः पदवीधर झाले आणि त्यांनी बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
बी.ए.ची पदवी प्राप्त करून नोकरीमध्ये स्थिरावलेल्या मदनची हुषारी आणि कर्तबगारी ध्यानात घेऊन त्यांचे दुसरे मामा, कल्याण येथील सुप्रसिद्ध वकील आणि समाजसेवक एडव्होकेट बी. टी. सुळे ह्यांनी मदन समोर आपली ज्येष्ठ कन्या कु.विमल सुळे हिच्या बरोबर विवाह करून, सुखाने संसार करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याप्रमाणे दिनांक १६ मे, १९४८ रोजी श्री. मदन फडणीस आणि कु.विमल सुळे हे विवाहबद्ध झाले आणि दोन एकमेकांना पूरक आणि समर्पक अशा समविचारी व्यक्तींचा संसार बहरला.
पण ही रेशनिंग डिपार्टमेंटची सरकारी नोकरी करत असतानाच, मदनचे अर्धे लक्ष मुंबईतील गिरणी कामगारांवर होणारे अन्याय निवारण करण्यात गुंतलेले होते. बीबीसी ह्या रेल्वे कर्मचारी संघटनेच्या संप काळात मदन प्रत्यक्ष चळवळीत उतरले आणि कामगारांचा विजय झाला. मदनला जीआयपी रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून निर्वाचित करण्यात आले. पण साहजिकच मदनच्या शासकीय नोकरीवर गंडांतर आले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई ह्यांनी मदनला स्वतःच्या कार्यालयात बोलवून राजिनामा देण्यास भाग पाडले. कामगारांच्या हिताचे अनेक प्रकल्प मनात घोळवत असलेल्या मदन फडणीस ह्यांनी स्वखुशीने सरकारी नोकरीवर पाणी सोडले आणि स्वतःला पूर्ण वेळ कामगार चळवळीला वाहून घेतले.
मदनच्या पत्नी, विवाहानंतर सौ. मंगला मदन फडणीस, ह्यांनी आपल्या पतीला त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात संपूर्ण पाठिंबा दिला. मदनची सरकारी नोकरी सुटल्यावर, त्यांनी नवीन नोकरी शोधत बसण्याऐवजी , लाॅ विषयाची पदवी घेऊन, कायमस्वरूपी कामगार चळवळीत उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु मदनच्या कामगार चळवळीतील उपक्रमांमुळे त्यांना आधी भूमिगत व्हावे लागले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. ह्यामुळे त्यांचे कायदेविषयक शिक्षण लांबणीवर पडले आणि पुढे त्यांनी १९५३ मध्ये एल.एल.बी. हे शिक्षण पूर्ण करून, १९५४ मध्ये बार काउन्सिलची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपले मामा, सुप्रसिद्ध कामगार कायदेतज्ञ , एडव्होकेट काॅ. के.टी सुळे ह्यांच्या हाताखाली “कनिष्ठ वकील” म्हणून ते कार्य करू लागले. हळूहळू “कामगार पुढारी” आणि “कामगारांच्या केसेस लढवणारे यशस्वी वकील” म्हणून मदन फडणीस ह्यांच्या नावाचा बोलबाला झाला. “कामगार विषयक कायदेतज्ञ” अशी कीर्ती त्यांना प्राप्त झाली होती.
मदनच्या पत्नी, सौ. मंगला, ह्यांनी आपल्या पतीला त्यांच्या कामगार विषयक कार्यात संपूर्ण पाठिंबा दिला आणि स्वतःही एक कर्तृत्ववान शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नावलौकिक कमावला. पतीने सरकारी नोकरी सोडल्याने खचून न जाता, मंगला फडणीस ह्यांनी स्वतः अर्थार्जन करून कुटुंबाला सावरण्याचा व आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांनी माँटेसरी ट्रेनिंग कोर्स केला होता, त्याचा उपयोग करून घेत त्यांनी आधी एका शाळेत नोकरी स्वीकारली होती. पण राजकीय चळवळीत सहभागी होणा-या मदन फडणीस ह्यांची पत्नी आणि एडव्होकेट काॅम्रेड के.टी.सुळे ह्यांची नातेवाईक म्हणून त्यांना सुद्धा नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पुन्हा कोणत्याही शाळेत नोकरीचा अर्ज करत बसण्याऐवजी मंगला फडणीस ह्यांनी त्यांचे वडील, ठाणे कोर्टातील सुप्रसिद्ध वकील एडव्होकेट बी.टी सुळे ह्यांच्या सहाय्याने ठाणे शहरातील व जिल्ह्य़ातील पहिली माॅन्टेसरी शाळा “बाल विकास मंदिर” ह्याची स्थापना केली. स्वतःच्या प्रगती बरोबरच मदन फडणीस ह्यांनी ,स्त्री शिक्षणाला प्राधान्य देत, आपल्या पत्नीला सुद्धा पदवी मिळवण्यासाठी आणि विविध शैक्षणिक कोर्सेस करण्यासाठी प्रेरणा दिली आणि तिने उभारलेल्या शिक्षण संस्थेला प्रोत्साहन देत, संस्थेचा विकास साधण्यात सहकार्य केले.
१९७० – ८० च्या दशकात मुंबई परिसरात कामगार चळवळीतील एक अध्वर्यु म्हणून काॅ. मदन फडणीस हे नाव दुमदुमत राहिले. किंबहुना, “कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणारा आणि न्याय मिळवून देणारा एकमेव पर्याय” म्हणून कामगार जगत त्यांच्याकडे आशेने पाहात होते.
विविध प्रकारच्या कामगार संघटनांच्या केसेस कुशलतेने लढवणारे वकील म्हणून मदन फडणीस ह्यांचा नावलौकिक होता. कामगार संघटनांनी जिंकलेल्या केसेसच्या विरोधात , मालक वर्ग सुप्रीम कोर्टात जरी अपील करत असले, तरी मदन फडणीस ह्यांच्या युक्तिवादाच्या समोर आपली केस टिकू शकणार नाही, ह्याची जाणीव त्यांना सुद्धा असायची; आणि ह्याचे एकमेव कारण म्हणजे आपली कुशाग्र बुद्धी आणि सखोल ज्ञान, ह्यांच्या बरोबरच अत्यंत सचोटीचा, निष्ठावंत आणि पैशाने विकत घेता न येणारा कामगार पुढारी त्यांच्या विरुद्ध पक्षाच्या पाठीशी उभा असल्याची खात्री त्यांना असायची, त्यामुळेच त्यांच्या विजयाचा बोलबाला कोर्ट परिसरात निनादत असे.
कामगार म्हणजे केवळ गिरणी कामगार किंवा औद्योगिक कामगार नव्हे, तर विविध क्षेत्रातील असंघटित कामगार आपल्या कायदेविषयक प्रश्नांची उकल करण्यासाठी फडणीस वकिलांकडे धाव घेत होते. ह्यामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, औद्योगिक कंपन्या, मेडिकल, फार्माक्युटिकल , विमा कंपन्या, बॅन्किंग क्षेत्र, एअरलाईन्स, खाणविभाग , रासायनिक क्षेत्र, शिपिंग काॅरपोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स सारख्या निम-सरकारी संघटनांमधील कर्मचारी, वर्तमानपत्रे, प्रेस आणि मिडिया, सरकारी व निम-सरकारी कर्मचारी, सुशिक्षित व उच्च विद्याविभुषित डाॅक्टर व प्राध्यापक वर्ग, अशा विविध क्षेत्रातील कर्मचारी आपल्या रास्त मागण्या पुरवून घेण्यासाठी एडव्होकेट मदन फडणीस ह्यांचे दरवाजे खटखटवत होते आणि फडणीस वकील अक्षरशः रात्रीचा दिवस करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी झटत होते.
ग्रिव्ह्ज काॅटन अँड अलाईड कंपन्यांच्या कामगार युनियनचे अध्यक्षपद भूषवित असतानाच त्यांनी कंपनीच्या ब्रिटिश मालकांविरुद्ध अतुलनीय लढा दिला. १९७५च्या आसपास भारत सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय आणिबाणीच्या विरुद्ध त्यांनी विशेष लढा दिला आणि सरकारी कैदेत असलेल्या मदन फडणीस ह्यांना कामगारांच्या केसेस चालवण्यासाठी पॅरोलवर सोडणे सरकारला अनिवार्य झाले. कामगारांचे बोनसविषयक लढे लढवण्यात मदन ह्यांचा हातखंडा होता. क्राॅम्प्टन कंपन्यांची कामगार कपात प्रकरणे त्यांनी यशस्वीपणे लढून जवळजवळ सर्व कपात केलेल्या कामगारांना परत नोकरीवर घेणे भाग पाडले.
मदन ह्यांचा देशभरातील वृत्तपत्र कर्मचारी चळवळीशी दीर्घकाळ संबंध होता. ऑल इंडिया न्यूजपेपर एम्प्लाॅईज फेडरेशनच्या माध्यमातून पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी वर्गाचे अनेक लढे लढवत त्यांनी प्रत्येक वेळी विजयश्री प्राप्त केली. त्यांनी जवळपास पाच दशके बॅन्किंग क्षेत्रातील युनियन्सना यशस्वी मार्गदर्शन आणि कायदेविषयक मदतकार्य केले. १९७३ ते १९८५ ह्या दीर्घकाळात त्यांनी ग्रिंडलेज बॅन्क, रिझर्व्ह बॅन्क ऑफ इंडिया, स्टेट बॅन्क ऑफ इंडिया वगैरे बॅन्कांमधील कर्मचा-यांना उत्तम वेतन संरचना आणि सेवा परिस्थिती प्राप्त करून देण्यासाठी यशस्वी लढे दिले. बाॅम्बे युनिव्हर्सिटी व काॅलेज टीचर्स युनियन (बुक्टु ) आणि महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटीज आणि काॅलेज टीचर्स ऑर्गनायझेशन ह्यांच्याशी ते २४ वर्षांहून अधिक काळ निगडीत होते आणि श्रमजीवी वर्गाप्रमाणेच सुशिक्षितांना कायदेविषयक मदत उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वीपणे लढत होते.
कामगारांकडून नाममात्र फी घेऊन किंवा कधी कधी ती फी सुद्धा देणगी रुपाने कामगार संघटनांना परत करून फक्त कामगारांच्या हितासाठी कोर्टात केसेस चालवणारा असा कामगार वकील दुर्मिळ होता. “आयुष्य हे दान देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही” हे मदन फडणीस ह्यांच्या जीवनाचे ध्येयवाक्य होते. कामगार त्यांना देव मानत होते, आणि आदराने “दादा” म्हणून संबोधत होते.
मुंबई बाहेर ठाणे, पुणे, नाशिक, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल , तसेच दाक्षिणात्य प्रदेशांतही मदन फडणीस ह्यांच्या कीर्तीचे चौघडे वाजत होते. सुप्रीम कोर्टाने “ज्येष्ठ वकील” म्हणून त्यांच्या नावाला मान्यता दिली होती आणि भारत सरकारने वृत्तपत्र कर्मचा-यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना परदेशांमध्ये विविध परिषदांतून सन्मानपूर्वक नियुक्त केले होते. “श्रम- महर्षी ” हा जीवन-गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
मदन आणि मंगला ह्यांच्या सुखी संसारात मृदुला, मनोज आणि शर्मिला ह्या तीन कन्या जन्माला आल्या. समाजकार्यात व्यस्त असूनही ह्या दाम्पत्याने आपल्या तीन कन्यांना उत्तम शिक्षण आणि सुसंस्कार देऊन जीवनाचा प्रशस्त मार्ग त्यांच्यासाठी खुला करून दिला. आज ह्या तिन्ही कन्या, सौ.मृदुला राजे, सौ.प्रतिमा बावकर आणि सौ. सोनल साटेलकर ह्या आपल्या आपल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत आणि वडिलांच्या कर्तृत्वाचा वारसा आपल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
एडव्होकेट मदन फडणीस ह्यांच्या पत्नी सौ. मंगला ह्यांचे दिनांक २९ नोव्हेंबर, १९९३ ह्या दिवशी हृदय विकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाले. तेव्हा हा अनपेक्षित धक्का सहन न झाल्याने मदन फडणीस काही काळ निराशेने कोलमडले होते . परंतु त्यांचे कामगार हीच त्यांची खरी जीवनरेखा असल्याने आणि आपल्याविना त्यांच्या केसेस चालवणारी समर्थ वारसदार व्यक्ती अजून निर्माण व्हायची आहे, ह्या जाणिवेने ते पुन्हा एकदा नवीन उर्जा घेऊन कामाला लागले, सक्रिय झाले . कामगार संघटना हेच आपले उर्वरित आयुष्य मानत , त्यांनी स्वतःला अधिक जोमाने ह्या कार्याला वाहून घेतले.
“अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहीन” हे ध्येय उराशी बाळगणारा हा थोर कामगार पुढारी अनेक आजार आणि दुखणी ह्यांच्याशी सामना करत करत, वयाच्या ८६ वर्षांपर्यंत जिद्दीने कार्य करत राहिला आणि दिनांक २ मार्च, २००९ ह्या दिवशी एका शांत, निवांत क्षणी आपला देह अनंतात विसर्जित करून दिगंतामध्ये विलीन झाला. आपल्या लाडक्या पुढा-याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते आणि त्या कामगारांच्या सांत्वनासाठी मदन फडणीस ह्यांच्या कन्या व परिवार झटत होते. “लाल सलाम, लाल सलाम ” ह्या घोषणांनी दुमदुमलेल्या स्मशानभूमीत त्यावेळी चैतन्य आणि उर्जा ह्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

काॅ. मदन फडणीस ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कामगार बांधवांनी पुणे शहराजवळ निगडी येथे, त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने “मदन फडणीस साहेब” ह्यांचा अर्धपुतळा स्थापित केला आणि त्यांचे चिरंतन स्मारक निर्माण केले आहे. त्यांच्या निधनानंतर १४ वर्षे उलटून गेल्यावरही त्यांच्या स्मृतींना जागृत ठेवण्यासाठी तिथे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.
“श्रम कायद्यांचे ज्ञानभांडार” आणि “औद्योगिक तंटे सोडवण्यातील प्रगल्भ व्यक्तिमत्व” असा यथोचित सन्मान प्राप्त झालेल्या अॅड. काॅ. मदन फडणीस ह्यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मानवंदना आणि विनम्र अभिवादन.
काॅ. मदन फडणीस ह्यांना लाल सलाम !
— लेखन : सौ. मृदुला राजे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800