Monday, July 14, 2025
Homeबातम्या'महानुभाव पंथ हा सर्व समावेशक पंथ'

‘महानुभाव पंथ हा सर्व समावेशक पंथ’

व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत. जेव्हा दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

भगवान श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव येवला शहरातील गोशाळा मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महंत श्री विद्वांस बाबा, श्री. पुजदेकर बाबा, श्री.सुकेणकर बाबा, श्री.चिरडे बाबा, श्री.संतोषमुनी शास्त्री कपाटे, श्री. कानळसकर बाबा, माजी आमदार बाळासाहेब सानप, कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे यांच्यासह पदाधिकारी, महानुभव पंथातील मान्यवर व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री भुजबळ म्हणाले की, ११ व्या शतकात महानुभाव संप्रदायातील गुरू श्री गोविंद प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता. त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच दिसून येते. स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांनी यादवकालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण केले. आपल्या गुरुसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी, समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो त्यांनी प्रत्यक्षात उतरविला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. त्यांच्या जवळ अपार श्रद्धा, कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुणांचा आविष्कार दिसून येतो. गोविंदप्रभु हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे आधारस्तंभ आहे. जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. गोविंदप्रभु हे त्यांचे गुरु होते. श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या गुरु कडून मिळालेले तत्वज्ञान समाजात रुजविण्यासाठी पुढे काम केले असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामीच आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. देशातील अनेक भाषाना अभिजात दर्जा मिळाला मात्र अद्यापही मराठी भाषेला मिळाला नाही. तो मिळावा यासाठी जे पुरावे सादर करण्यात आले त्यात लिळाचरित्र या ग्रंथाचा समावेश आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. भगवान श्री चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक आहे. बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. अंधश्रद्धा हा आपल्या मानवी समाजाला झालेला एक मोठा आजार आहे. या अंधश्रद्धेमुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. पिढी-दरपिढी हा अंधश्रद्धारुपी आजार अधिकाधिक वाढत गेला असल्याचे आपल्याला दिसून येते. अंधश्रद्धेच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक संत व महापुरुषांनी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगीतले. महाराष्ट्रात तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारी एक मोठी परंपरा आपणास पाहावयास मिळते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम ते गाडगेबाबा, तुकडोजी महाराज ही संतपरंपरा आणि आगरकर, महात्मा फुले ते दाभोलकर, श्याम मानव अशी समाजसुधारकांची परंपरा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटत आली. या सर्वांनी आपल्या कृती आणि उक्तीतून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अनेकांना याची किंमत चुकवावी लागली. समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. काही जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली; परिणामी अंधश्रद्धा पाळणे हा कायदेशीररित्या गुन्हा ठरला आहे. अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात पहिला प्रहार महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जाळीच्या देवाला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा देऊन जाळीचा देव – रस्ते, भक्त निवास इत्यादी २ कोटींची विकासकामे करण्यात आली. तसेच अंबाळी जि.नांदेड -भक्त निवास रस्ते ई.सुविधांसाठी ५ कोटी तर श्रीरामपूर तालुक्यातील डोमेग्राम, कमलपूर -संरक्षण भिंत, रस्ता इत्यादी कामांसाठी २ कोटी निधी उपलब्ध करून दिला तसेच
येवला मतदारसंघातील नगरसूल, कानळद, अंदरसूल इ. महानुभव पंथांच्या अनेक देवस्थानांना निधी दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments