लहानपणापासून माझे एक स्वप्न होते. मला चंदेरी दुनियेत काहीतरी काम मिळवायचे होते. पण तो योग काही येत नव्हता व काय करावे लागेल ते सुचत नव्हते.
पण अनपेक्षितपणे परमेश्वराची कृपा, आई वडील यांची पुण्याई व तुमच्यासारख्या सुहृदयी मित्रांच्या सदिच्छा या मुळे ३१ मे १९७६ रोजी मला रीतसर सिने सिंगर असोसिएशनची मेंबरशिप मिळाली व चंदेरी दुनियेत जाण्याचा मार्ग खुला झाला.
माझी ऑडिशन टेस्ट सुप्रसिद्ध संगीतकार जयदेवजी व लक्ष्मीकांतजी प्यारेलाल यांनी घेतली व माझा आवाज रेकॉर्डिंगसाठी योग्य आहे असे असोसिएशनला कळविले.
पण या नंतरचा प्रवास खडतर होता. माझे पहिले रेकॉर्डिंग किशोरदा व उषा मंगेशकर यांच्या सोबत तसेच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबत होते. कारण असोसिएशनची कामाची गॅरंटी घेत नव्हती. स्वतःलाच काम मिळवावे लागत असे.
या मायावी मुंबई नगरीत कुणीच माझ्या ओळखीचे नव्हते. फक्त लोकलचा पास होता व सर्व मुंबई पायी फिरत असे. काम मिळविण्यासाठी स्टुडिओत जाणे, अनेक संगीतकार, निर्माते, गायक-गायिका यांना भेटून काम मिळवावे लागत होते.
हळु हळु ओळखी वाढत गेल्या व कामे मिळत गेली. या काळात मिळेल ती कामे करत होतो. कधी रेकॉर्डिंगला साईड रिदम तर कधी बॅक ग्राउंड, कधी ऑर्केस्ट्रा तर कधी शुटींगला मॉब सिनमध्ये सहभागी होणे, इत्यादी कामे करत होतो
या सुरेल प्रवासात अनेक संगीतकार, गायक, वादक, मित्र यांची खूपच मदत झाली. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, आर डी बर्मन, रवींद्र जैन अशा अनेक संगीत दिग्दर्शकांचे मार्गदर्शन मिळाले. किशोरदा, स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, महम्मद रफी, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, अलका याज्ञीक असे अनेक दिग्गज गायक यांच्या सोबतच काम केलेले आहे.
अनेक टिव्ही मालिका रामायण, महाभारत, कृष्णा, हेमा मालिनी यांची नुपूर अशा अनेक मालिकात सहभाग घेतला. महानायक अमिताभ बच्चन, लतादीदी, किशोरदा, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर या अनेक कलावंतासोबत स्टेज प्रोग्राम यात भाग घेतला आहे.
या ४५ वर्षाच्या सुरेल प्रवासात ज्यांचे सहकार्य मिळाले त्या सर्व संगीतकार, गायक, निर्माते, वादक व इतर ज्ञात अज्ञात व्यक्तीचे खुप खुप आभार.
– लेखन : सिनेगायक उदय वाईकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.