काही लोकांचा स्वभाव मुळातच मदतीचा असतो. ते स्त्री पुरुष, जवळचा लांबचा, जातीपातीकडे दुर्लक्ष करून मदत करतात.
बीडमध्ये रुजू झाल्याच्या दिवशीच माझा परिचय अशा व्यक्तीशी झाला. त्यांचे नाव आहे वैभव विवेक स्वामी.
माझी बदली बीड येथे केली गेली. मला 1 सप्टेंबर पासून रुजू व्हावे असे आदेशात होते. पुढील माझा पगार हा बीड येथून निघणार असेही आदेशात होते. त्याप्रमाणे मी रुजू झाली. माझा आणि बीड जिल्ह्याचा तसा काही एक संबंध नाही मात्र इतके वर्षे दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात काम केल्यामुळे अख्खा महाराष्ट्र माझा असे झाले होते.
महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्याची दखल केंद्रीय स्तरावरून कुठेही आणि कशा ही निमित्त घेतली गेली की, त्यावर लक्ष असायचं. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम व्हायचा. आपण महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहोत या भूमिकेतून लक्ष असायचं आणि प्रत्येक जिल्हा माझा असं गणित होऊन गेलं होतं. त्यामुळे बीडमध्ये जेव्हा बदली झाली तेव्हा या नुकताच जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या बातम्या निमित्त इथल्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी झालेला संवाद आठवला.
माहिती जनसंपर्क महासंचालनालय माझे कुटुंब असल्यामुळे कुणाशी बोलताना आपुलकीची भावनाच असते. आणि जेव्हा दिल्लीकर म्हणून संवाद असायचा तेव्हा तर संवादात आणखीच ओलावा असायचा.

बीड जिल्ह्ययात माझी बॅचमेंट आणि जवळची मैत्रीणही बीडची आहे. त्यामुळे येथे आल्यावर आपल्याला काही एक अडचण येणार नाही हे डोक्यात पक्के बसले होते. फक्त दिल्लीला कुटुंब असल्यामुळे बीड ते दिल्ली असा प्रवास हा खूप लांब जाणवत आहे. बीड वरून औरंगाबाद मार्गे जळगाव राजधानी पकडून मग दिल्ली गाठायची त्या अर्थाने येथून ‘दिल्ली बहुत दूर आहे’ असेच म्हणावे लागेल.
मी मला मिळालेल्या शासकीय आदेशाप्रमाणे रुजू झाले. 1 तारखेला शुक्रवार होता. बीड जिल्हयाला सोमवारी स्थानिक सुट्टी होती. दिल्लीला जी 20 मुळे शाळेच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे रुजू होऊन सायंकाळी मी दिल्लीसाठी निघाली. दिवसभरात नवीन कामकाज समजून घेतले. जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी आमच्या जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर सरांनी भेट करवून दिली.
परतीचा प्रवास शासकीय परिवहनाने करायचे ठरविले व स्थानकावर गेली. तिथे आलेली विनाथांबा बस पकडून बसमध्ये बसली. तेव्हापर्यंत सर्व शहर शांत होतं. सायंकाळी 6.30 च्या आसपास बस सुरू झाली आणि बस मध्ये चर्चा सुरू झाली की शहरात जाळपोळ होत आहे. शहरात मराठा आंदोलन उसळले. शासनात असल्यामुळे वस्तुनिष्ठ बातम्यांवर भरोसा असल्यामुळे वातावरण लवकर निवळेल असं सुरुवातीला वाटले. मात्र परिस्थिती अधिक संवेदनशील झाल्यामुळे परिवहन मंडळाच्या वरील अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन बीड औरंगाबाद मार्गे जाणाऱ्या शासकीय बसेला गेवराई येथील बस स्थानकावर थांबवण्याचा निर्णय घेतला. खाजगी चॅनेलच्या बातम्यांवरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. गेवराई बस स्थानकात थांबलेल्या प्रवाशांसाठी रात्रीचे झोपण्याची व्यवस्था करण्याचे आदेश रात्री 11 नंतर आले.
माझ्यासाठी हे सर्व नवीनच बीडमध्ये परतले तर आठवडाभर निघता येणार नाही असा अंदाज दिसत होता. पण गेवराईतून बाहेर कसे जाणार खाजगी वाहन जाण्यास तयार नव्हते. नवीन शहरात अशा प्रसंगी विश्वास कोणावर ठेवावा हा मोठा प्रश्न होता. जिल्हा माहिती कार्यालयात वैभव स्वामी या पत्रकाराची भेट झाली. मी रुजू झाल्याचे कळल्यावर त्यांनी पुष्पगुच्छ मिठाई आणली होती सकाळी. जुन्या सहकार्याकडून थोडी माहिती घेताना त्यांनी स्वामी यांचा उल्लेख केला. त्यांचा नंबरही शेअर केला होता त्यामुळे कार्यालयात त्यांची भेट झाल्यावर त्यांना पाहिल्यावर विचारपूस झाली थोडं बोलणे झाले त्यानंतर ते निघून गेले आणि आम्ही आमच्या कामाला लागलो.

रात्री जेव्हा गेवराई येथे बस थांबली. मी सरांना इथली परिस्थिती सांगितली. त्यावेळी ते म्हणाले काळजी करू नकोस मी करतो व्यवस्था. त्यांनी फोन केला स्वामींना. ते म्हणाले “बघतो काय करता येते” असे म्हणून जवळच्या पत्रकार मित्रांचा फोन नंबर देऊन संपर्कात राहण्यास सांगितले. रात्री 11.30 च्या आसपास त्यांच्या ओळखीच्या वाहनचालकाला गेवराई बस स्थानकावर पाठविले. त्यांनी माझ्यासह दोन प्रवाशांना सोबत घेतले आणि आम्ही औरंगाबादकडे निघालो. रस्त्यात प्रचंड ट्रॉफीक होते. कुठे टायर जळत होते. रस्त्याच्या कडेला शासकीय जळक्या बसेस उभ्या होत्या. वातावरण अत्यंत भीतीदायक वाटत होते. मला वाहन चालकाने अत्यंत सुरक्षितपणे माझ्या स्थानकावर सोडले आणि माझ्यासोबत आलेल्या सहप्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत. त्या दिवशी ‘वैभव स्वामी’ माझ्या आयुष्यात देवदूत म्हणूनच आलेत. कुठलाही पूर्वपरिचय नसताना मला केलेली मदत ही आजन्म लक्षात ठेवण्यासारखी आहे. बीड जिल्ह्यातील माझ्यासाठी आलेला देवदूतच होय.

— लेखन : अंजु निमसरकर-कांबळे (माहिती अधिकारी-बीड)
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800