१९९० च्या दशकांत जेव्हा महाराष्ट्रातील तरुण महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात मोठ्या प्रमाणात प्रस्थान करीत होते, त्यावेळेस “ब्रेन ड्रेन” हा विषय मोठ्या हिरीरीने चर्चेत होता. याशिवाय महाराष्ट्राबाहेर जसे बडोदा, इंदोर सारख्या शहरांमध्ये मराठी माणूस वास्तव्याला होता. तेव्हा मराठीचे पुढे काय होईल ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण, जगात यशस्वी व्हायचं असेल तर इंग्रजी भाषा यायलाच हवी. असा एक मोठा मतप्रवाह रूढ होता.
मात्र, तंत्रज्ञानामुळे वेगळी परिस्थिती आता अनुभवायला येते आहे. सोशल मीडियामुळे महाराष्ट्राबाहेर पडलेली मराठी मंडळी पुन्हा एकदा एकमेकांच्या सहज संपर्कात यायला लागली आहे, त्यांच्यात एकमेकांत जवळीक वाढायला लागली आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानामुळेच मराठीतून संवाद वाढायला लागलेला दिसतोय हे विशेष. नेमके या विचाराच्या पार्श्वभूमीवर इंदोरच्या संस्थेने संमेलन घेणे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि पुढे “मराठी टिकेल, मराठी वाढेल” याची चुणूक दाखवणारी नक्कीच आहे असे मत प्रफुल्ल पाठक यांनी मांडले. जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि तंत्रज्ञान कौशल्य या सत्रामध्ये भारतीय सौर ऊर्जा परिषदचे अध्यक्ष प्रफुल्ल पाठक यांनी “तंत्रज्ञान आणि मराठी माणूस” या विषयावर आपले मौलिक विचार मांडले.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनवरतपणे तेवत ठेवण्यासाठी लोकमान्य नगर निवासी मंडळातर्फे नुकतेच ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसीय इंदोर नगरीत प्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. चर्चासत्र, व्याख्यान, साहित्यिक आयोजन, स्पर्धा आणि प्रतिभावंतांचा सत्कार हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते.
डॉ.ज्ञानेश्वर तीखे, डॉ.वसुधा गाडगीळ, अंतरा करवडे, डॉ.सुनील कुळकर्णी, देशगहावणकर,विवेक घळसासी, श्रीराम जोग, डॉ.अस्मिता हवालदार, महेश तागडे, वैशाली बकोरे, डॉ.कमलाकर देशपांडे, अनघा जोगळेकर, डॉ निर्मोही फडके या सारख्या प्रतिभावंतांच्या उत्स्फूर्त सहभागातून हे संमेलन अधिकच बहरत गेले.
याप्रसंगी प्रफुल्ल पाठक आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी डॉ.आशुतोष रारावीकर या दोघांना संमेलन आयोजकांतर्फे “भाषा सारथी” या पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनव स्वरूपाच्या या संमेलनाला मराठी रसिकांची लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800