अशी असावी
तशी असावी
कशी असावी कविता
मन:प्रवाह झुळझुळणारी सुंदरशी ती सरिता …
काव्यकोजागरी जणू ती उजळून सारे विश्व
अज्ञातातील हाती येते सुंदरसे ते पुष्प …
उलथून टाकी जुन्या कल्पना नवनिर्माणाची धनी
जाऊन बसते हृदयांतरी खोल खोल ती मनी…
“ख”पुष्पाला नसेच उपमा इंद्रधनुचे रंग
अवतरता हृदयात सखी ती अवघे होती दंग…
एक ओळ ती फक्त पुरेशी प्रवाह बदलून जातो
हृदयांतरी जर उतरली पशु ही माणूस होतो …
किमयागार ती आहे कविता, नि:शब्द कधी ती करते
ज्ञानसागरातुनी घागरी रसिकांना अर्पियते ….
अर्क आहे अमृत आहे संजिवन ती आहे
मधुपाक तो फुलाफुलांतील चिरतरूण ती राहे..
वर्णण्यास हो या कवितेला शब्द कुठून आणावे ?
भाव माझ्या मनातील हो रसिकांनी जाणावे..
चिरंजीव ती करून जाते ज्याला खरी सापडते
हार यशाचे हाती घेऊन त्रिखंडात मिरविते …

— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800