जिथून चंद्रावर स्वारी केली तेच हे स्थान!मनात कमालीची उत्सुकता होती. अंतराळवीरांची लगबग, त्यांच्यासाठी शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी केलेले श्रम, धडपड.आशा निराशेचा खेळ, लगबग, अपेक्षा आणि आकांक्षा. या सा-यांचे सार्थक झाले ते चंद्रावर पाऊल पडताच !
मग चढली विजयाची नशा. ज्यासाठी घेतला होता ध्यास, ज्याची धरली होती आस, प्राण होत होते कासाविस, शिगेला पोहोचलेली उत्सुकता या सा-या संवेदना आम्हालाही जाणवल्या केनेडी स्पेस सेंटरमधील show पाहतांना.
चंद्रावर यान उतरण्यासाठी आतुर झालेले असतांनाच अचानक संवाद तुटला. शास्त्रज्ञ, संशोधक सारेच थरारले. कारण महत्वाची सूचना करण्यासाठी सज्ज झालेले असतांनाच संवाद संपला. सूचना होती की यान पुढील दोन मिनिटांत उतरलेच पाहिजे नाहीतर त्यांतील इंधन संपणार होते. पुढचे भविष्य काय ते न सांगताच सर्वांना कळले होते. निराश होऊन, डोळ्यांवर हात ठेऊन थरथरणा-या त्या सा-यांना पाहतांना आमचीही संवेदना जागृत झाली होती. पुढे काय झाले ती उत्सुकता शिगेला पोहोचली आणि काय आश्र्चर्य !
जसा तुटला तसा संवाद जुळला आणि तोही नील आर्मस्ट्रांगच्या ‘ उतरलो ‘ या शब्दांनी ! प्रत्येकजण एवढा खूश झाला की शेजारच्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला कुठे ठेवू नि कुठे नको असे करू लागला. तो उत्साह, ती विजयाची धुंदी सर्व अमेरिकन, सर्व जगातील लोक साजरी करू लागले. आज एक वेगळाच प्रयोग सफल झाला होता. नकळत आम्हीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. धन्य झालो आम्ही !

तो क्षण मनात साठवून आम्ही आतां नासाचे अंतरंग पाहू लागलो. अंतराळवीरांचे कपडे, त्यांचे खाद्यपदार्थ, तरंगलेल्या अवस्थेत त्यांच खाणं-पिणं त्यांचे मोजे, टोपी हे सारं पाहात पाहात बाहेर उभ्या केलेल्या चांद्रयानाच्या प्रतिकृतीकडे आलो. तीन भागात विभागलेले हे यान ! कांही कळत नसतांनाही मोठ्या प्रेमाने, उत्सुकतेने प्रत्येकजण ते यान निरखित होते.
आता आम्ही ही याने जेथून उड्डान करतात त्या मैदानात येऊन पोहोचलो. एका गॅलरीवजा भागातून आम्ही पाहात होतो. समोरच समुद्राला लागून दोन मोठमोठे स्टॅन्ड होते. ज्यात यान उभे करीत व भरपूर ऑक्सिजन सोडावा लागे. तेव्हां कुठे प्रचंड अग्नि तयार होऊन त्याच्या शक्तीवर उड्डान होत असे. यान उडाले की अति प्रचंड उष्णता, आग ! ती विझवण्याची कामगिरी त्या दुस-या स्टॅन्डमधील हैड्रोजन वायू करीत असे. भरपूर हैड्रोजन त्या आगीवर सोडला की हैड्रोजनचा ऑक्सिजनशी मिलाफ होऊन H2O म्हणजे पाणी तयार होऊन ती प्रचंड आग विझत असे. संशोधनाची कमाल !
आज आता आम्ही परत एकदा मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश केला. Sea World ! नावावरूनच तुमच्या लक्षात आलेच असेल की पुढे मी काय सांगणार आहे ते ! डाॅल्फिन शो ! इथे डाॅल्फिन एकमेकांशी व त्यांच्या टीचर्सशी मौजमस्ती करत होते. ते सांगतील तशा वाकड्या, लांब, उंच उड्या मारीत होते. अगदी आज्ञाधारक विद्यार्थी! त्यांच्या बरोबर कांही सर्कसपटु सुध्दां त्यांची करामत दाखवित होते. प्रेक्षकांना नमस्ते व Good bye करतांना पहिल्या सात-आठ रांगांवर पाण्याचा फवारा उडवत होते ते सर्कसपटु नाही हं तर डाॅल्फिन !
आता आम्ही दुसरा मजेशीर शो पाहण्यास बसलो. हा शो खरोखरच बघण्यासारखा होता. लहान लहान प्राणी व पक्षी यांना इथे ट्रेन्ड केले होते. कबुतरे, साळुंक्या, ससे, बगळे, उंदीर, मांजर, पोपट अशी सारी मंडळी इथे थाटामाटात वावरत होती. खूप मजा वाटली.
यानंतर आम्ही वळलो ते लाॅस एंजेलिसकडे ! प्राण्यापक्षांच्या दुनियेतून एकदम सिनेसृष्टीकडे!कोडॅक थिएटर!या ठिकाणी famous acadamic awards दिले जातात. फेमस actors आणि actresses यांच्या पदचिह्नांनी व त्यांच्या signaturesनी येथला रस्ता बहरला आहे.
युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणजे हाॅलिवुडची सफरच! जीपमध्ये बसून तेथील कांही दृष्यांची मजा अनुभवली. धरण फुटल्यास किंवा नदीचे पाणी वाढले तर गांवांची कशी दुर्दशा होते, ते चित्रित कसे करतात याचा नमुना तिथे पाहावयास मिळाला. सर्व छान चाललेले असतांना अचानक पाण्याचा लोंढा येतो व सारा आसमंत पाण्याने वेढला जातो. चित्रण झाले की परत पहिले दृश्य!अपघाताचे दृश्य म्हणजे तुटलेली गाडी, कार, विमान असा सारा पसारा होता. जुने प्रसिध्द नट राहात असत त्यांच्या हवेल्या, घरे हेही पाहिले. एका बोगद्यात शिरलो तेथे 3D पिक्चरसारखे ड्रॅगन अंगावर येताहेत असे वाटत होते. जंगली श्वापदांची बंडखोरी, मारामारी जणुं आपण त्यांच्यातच सापडलो आहोत असे वाटणारी ! चला, हुश्श ! आता जरा आराम हवा.
क्रमशः

— लेखन : स्वाती दामले
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800