Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यदुर्मीळ पुस्तके : ११

दुर्मीळ पुस्तके : ११

तृणपुष्पे

“निनोचका” ही एका खेड्यातील तरुण विधवा शिक्षिकेची कथा. मैत्रिणीच्या सांगण्यावरुन ती कुंकू लावते. मुलींनी दिलेली फुले ती फुलदाणीत सजवते. मुलींनी दिलेली वेणी बकुळीचा वळेसर घालते. शाळाचालकाला मात्र ते खपत नाही. तिचे एकाकी जीवन असते. विधवेला समाजात येणारे अनुभव तिलाही येत असतात. तिला ३ पत्रे येतात. नवीन कन्या शाळेत हेडमिस्ट्रेस म्हणून नियुक्ती झाल्याचे एक असते. दुसरे प्रेमाताईचे. तिसरे देशमुखांचे. ते नवीन कन्या हायस्कूलचे मुख्य असतात. त्यांचे संन्यासी जीवन असते. तिची खिन्नता दूर पळते. ते तिला निनोचका ज्यामध्ये ग्रेटा गार्बो हसते त्या पिक्चरला घेऊन जातात. त्या निमित्ताने दोघांच्या एकाकी जीवनात आनंद निर्माण होतो अशी ही कथा!

“माणिक” ही एका काळ्यासावळ्या पण रेखीव नाकडोळ्यांची, डौलदार बांध्याची व गोड गळा असलेल्या दुर्दैवी मुलीची कथा. गायन वादनाचे ती शिक्षण घेते. तिची हौशी आई तिला एकाएकी सोडून जाते. वडील नवीन आई आणतात. सावत्र आईला तिच्या लग्नाची चिंता असते. कसेबसे तिचे लग्न जमते. गाणं बजावणं सासरच्यांना कळू देऊ नका म्हणून तिला बजावले जाते. सासरी दुस्वास होतो. त्यात नवर्‍याची नोकरी जाते. एके दिवशी गाणे गुणगुणतांना नणंद पाहते. तिच्या शाळेतील बाईंनी जी माणिकची शाळेतील मैत्रिण असते तिने बोलावल्याचे नणंद सांगते. शिक्षणाधिकारी शाळेत येणार असतात. त्यांच्या स्वागताला मुलांचे कार्यक्रम बसवण्याचे काम माणिकवर सोपवले जाते. त्यामुळे तिचा शाळेत गौरव होतो. ती झाकलं माणिक आहे अशी सासूची भावना होते अशी ही कथा !

“अध:पात” ही नवरा धोंडी बेकार असल्याने घरोघरी भांडी घासणार्‍या सावित्रीची कथा. घरात दारिद्रय. नवरा तिला वहाणेने फोडून काढी. तिने मोठ्या मुलाला भावाकडे पाठवले होते. मुलीला सुध्दा ती धोंडी घरी यायची चाहूल लागताच शेजारणीकडे नेऊन ठेवी. एके दिवशी सावित्री पितळीत पीठ मळत असते. धोंडी च्या करायला सांगतो पण घरात काही नसते. तो चुलीतल्या लाकडाने तिला मारतो. ती बेशुद्ध पडते. तिला सरकारी दवाखान्यात नेतात. पोलीस केस होते. कोर्टात खटला उभा राहतो. सावित्री नवर्‍याला वाचवायचा प्रयत्न करते पण धोंडी मात्र ती वाईट चालीची असल्याने तिला मारल्याचे कोर्टात सांगतो तेव्हा तिला धक्का बसतो अशी ही कथा !

“बायकांनाच दु:ख असते ?” एकट्या स्री जातीलाच दु:खं असतात अन् पुरुषजात नुसती सुखसागरात पोहत असते ? असा प्रश्न मध्यम वर्गीय गोविंदराव या कथेतून करतो आणि पुरुष जातीची दु:खे की जी बोलून दाखवता येत नाही ती या कथेतून मांडतो.

“लक्ष्मी” ही एका कामवालीची कथा. तिचं लहानपणी लग्न होतं. ८-९ वर्षाची असतानाच ती पहिला नवरा गमावते. चार भावांमधील ती एकली बहिण. गावात प्लेगात बाप, दोन भाऊ जातात. उरलेले भाऊ काही काम करत नाही. भावजया येतात. मग सगळ्या बायका मोलावर काम करतात. भाऊ तिचं दुसरं लग्न म्हातार्‍याशी लावून देतात. मग तो नवरा असूनही कपाळी कुंकू आहे की नाही त्याचं तिला काही वाटत नसतं अशी ही कथा !

“तिच्यात चार्म नाही !” लेखिका तिच्या मैत्रिणीच्या घरी खेडेगावात उतरलेली असते. तिथे महिलांचा क्लब असतो. क्लबात चंदूताई देशमुख बोलणार असतात पण त्यांची मुलगी नवर्‍याने टाकून दिल्याने घरी आल्याने त्या येत नाही. यावरुन तिच्यात चार्म नाही यावर सर्व महिलांची चर्चा होते अशी ही लघुनिबंधवजा कथा आहे.

”तीच का ग तूं ?” ही र्‍हाईची कथा. लेखिकेच्या सुमित्रा नावाच्या मैत्रिणीकडे ती घरकामाला असते. बुरख्यात वावरत असते. तीच का ग तूं असे म्हणत लेखिका विचारते तेव्हा ती गयावया करुन सांगते की काही उघड करु नका. नाहीतर काम जाईल. तिचा नवरा मवाली असतो आणि मुलगा दोघं तिच्या वाट्याला काही येऊ देत नसतात. तिचं आधी म्हातार्‍याशी लग्न झालेले असते. पण तिची ओळख बंगल्यावर कामाला असताना एका पोर्‍याशी होते. त्यांचे संबंध जुळतात त्यातून त्यांना मुलगा होतो. तो पोर्‍या तिच्या म्हातार्‍या नवर्‍याचा खून करतो. दोघांना अटक होते. गुन्हा सिध्द होतो व ते दोघे जेलमध्ये जातात. सुटून आल्यावर ती आपली ही गोष्ट लपवू पाहते अशी ही कथा !

“औरत” तुरुंगात गेलेल्या नवर्‍याला भेटायला आलेल्या दोन दिवसापासून उपाशी असलेल्या स्त्रीची ही कथा. तिचा नवरा ४ शेर तांदूळ गावाकडून विकत आणतो पण त्याने तो चोरुन आणले या संशयावरुन तो तुरुंगात जातो. भेटायला आलेल्या बायकोला तो खुणेने गांजा आणायला विचारतो. ती दिडकी नाही सांगते. पदराखालचे मलूल पोर दाखवते पण तो तिच्या तोंडात एक ठेवून देतो आणि सांगतो यह मेरी औरत है !

“त्याग” चंदाचं लग्न ठरलेलं असतं. प्रेमविवाह असूनही मुलाच्या घरच्यांनी पाच हजार रुपये हुंडा मागितलेला असल्याने घरातील प्रत्येकजण काही ना काही त्याग करायला सिध्द होतो. चारुचेही प्रेम रमेशशी जुळलेले असते पण मोठ्या बहिणीसाठी ती त्याला पत्र लिहून लग्नाचा एवढ्यात विचार करु नये असे कळवते. पण रमेश अशी कळ फिरवतो की हुंडा मागणारा नवरदेव हुंड्याशिवाय लग्नाला तयार होतो. त्याच्या बहिणीशी रमेशच्या भावाचे लग्न ठरलेले असते. रमेश त्याला नकार देतो तेव्हा ते ठिकाण्यावर येतात अशी ही कथा!

“कुछ नहीं समझते !” ही शेजारी रहायला आलेल्या कुटुंबातील डाॅली नावाच्या चार पाच वर्षांच्या पोरीची कथा! तिच्या घरच्यांना तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. घरातील तिच्या धामधुमीमुळे आईचे डोके दुखते. बच्चा-इ -साकू हा त्यांचा नोकर तिच्याकडे लक्ष देत असतो. त्याच्या संगतीत ‘जब तुमहि चले परदेस लगाकर ठेस’ सारखी गाणी तिच्या ओठी असतात. कुछ नही समझते हे तिच्या बालओठीचे वाक्य.

“भरपाई” या कथेत बायजीला तिच्या नवर्‍याच्या मनोहररावांच्या बायकोची म्हणजे तिच्या सवतीची तार येते. सवत खूप आजारी असते. बायजीला डाॅक्टरांनी बोलावलेले असते. बायजी तिच्या भावाकडे रहात असते. तिचा नवरा गेल्यावर सवतीच्याही शिरावर छत्र रहात नाही. बायजी सवतीकडे जाते. नवर्‍याचा तिच्यावर किती विश्वास होता हे सवतीच्या तोंडून ऐकते तेव्हा तिला सर्व दु:खांची भरपाई झाल्यासारखे वाटते अशी ही कथा!

“मै आस लगाये बैठा हूं !” ही एका कुबड्या, खुज्या दुबळ्या लहान बंड्याची कथा. त्याची आई जेलला भेट देण्यासाठी मोटारीत बसते तेव्हा बंड्याही हट्ट करुन बसतो. आजीने त्याला चेटकीणीची गोष्ट सांगितलेली असते. चेटकीण राजकन्येला रुपांतरीत करुन ठेवते तसे आईने जेलमध्ये सगळ्यांना रुपांतरीत करुन ठेवले असे त्याच्या बालमनाला वाटते. स्वातंत्र्य आलं आम्हाला सोडवा असे जेलमधील स्त्रिया सांगतात. मै आस लगाये बैठी हूँ हे तो एका कैदी स्त्रीकडून ऐकतो. बंड्याला आपली आई निर्दयी चेटकीण वाटू लागते. ते आईला समजल्यावर ती त्याच्या कानशिलात ठेवून देते. आपण चेटकीण आईच्या तावडीत सापडलो अशी त्याची भावना होते. आई रुपांतरीत करताना आपले कुबड दूर होईल अशी आस लावून तो बसतो अशी ही कथा !

“अपघात” ही सावित्रीची कथा. नवरा पेन्शनीत निघतो पण तिचे समाजकार्य सुरु असल्याने ती सतत बाहेर असते. एके दिवशी ती काही कर्तृत्व नसलेल्या मुलासाठी गोड करत असते जे नवर्‍याला आवडत नसते. मुलगाही आपला नाही अशा रीतीने तो त्यावरुन जे बोलतो त्याने तिच्या हातून नवर्‍याचा खून होतो. हा अपघात असतो. पण यामुळे ती नवरा तर गमावते पण मुलाचीही सहानुभूती गमावून बसते. ती आपली कथा सांगते आणि दुसर्‍याच दिवशी हे जग सोडून जाते अशी ही हृदयस्पर्शी कथा !

या कथासंग्रहाचे शीर्षक “तृणपुष्पे” अगदी समर्पक आहेत. सामान्य स्त्रियांची दु:खे प्रसंग यातून लेखिका आनंदीबाई शिर्के यांनी मांडली आहेत ! मनोहर ग्रंथमाला प्रकाशनाने हे पुस्तक १ मार्च, १९५८ रोजी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ उपलब्ध नाही पण ते सर्जेराव घोरपडे यांनी केले होते. आज हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट व दुर्मीळ झालेले आहे.

विलास कुडके.

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं