हिंदुस्थानी रागदारी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सुरंजन ट्रस्ट ही संस्था दिनरंग हा वार्षिक उपक्रम राबवत असते. त्या निमित्ताने आग्रा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिनी यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून सुरंजन ट्रस्ट या संस्थेने ठाण्यातील सहयोग मंदिर येथे श्री निषाद बाक्रे आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या मैफिलीचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमास लागू बंधू प्रायोजक म्हणून लाभले.
पहिल्या सत्रात श्री निषाद बाक्रे यांनी आपल्या राग सादरीकरणातून सुमधुर आलाप ताना, सरगम मांडणी इत्यादी वैशिष्ट्य आपल्या गायकीतून मांडून शास्त्रीय गायनाची मोहिनी रसिकांना घातली. त्यांनी राग पूर्वी मधील पीर न जानी आणि कगवा बोले या बंदिशी सादर केल्या आणि त्यानंतर पंडित दिनकर कैकिणी यांची स्वरचित रचना असलेला बिहाग, सावनी, नंद, मांड आणि झिंझोटी अशा पंचरागांनी नटलेला राग गगनविहंग मधील देखत मुख चंद्र चकोर आणि सरस सुगंध या बंदिशी उत्तमरित्या सादर करून पंडितजींना मानवंदना दिली. त्यांना तबल्यावर पंडीत श्री विश्वनाथ शिरोडकर आणि आणि संवादिनीवर विदुषी सीमा शिरोडकर तर डॉ श्रीरंग दातार, साहिल भोगले आणि चिन्मय लेले सुयोग्य गायन साथ व तानपुरा साथ केली.

दुसऱ्या सत्रात जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी राग काफी कानडा मधील पारंपारिक बंदिश लायी रे मन पिया आणि कान्ह कुँवर के करपल्लव पर या बंदिशी आणि मैफिलीचा समारोप राग हंसध्वनी मधील ११ मात्रा असलेली स्वरचित मत्त तालातील महाराज हो बंदिश आणि त्याला जोडून आडा चौताल मधील तराणा सादर केला. त्यांना विश्वनाथ शिरोडकर यांनी तबला साथ आणि संवादिनी साथ सीमा शिरोडकर यांनी स्वरांगी मराठे आणि ऋतुजा लाड यांनी तानपुरा व उत्कृष्ट गायन साथ केली.

अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायकीतून संपूर्ण राग सादर करत असताना त्यांच्या गळ्यातून नक्षीदार श्रुती आणि राग सौंदर्य उमटत असताना रसिक श्रोते इतके रंगून गेले होते ब्रह्मानंदी टाळी लागली होती की मैफिल संपू नये असेच वाटत होते.
अजून एक विशेष म्हणजे अश्विनी ताई सध्या त्यांच्या यूट्यूब चॅनल वर वेगवेगळ्या रागातील बंदिशी सादरीकरण व त्यातील प्रसंग कशा प्रकारचे असतात याची माहिती ‘बतिया दौरावतं’ या उपक्रमातून शास्त्रीय संगीतप्रेमी असणाऱ्या सर्व पिढीपर्यंत पोहोचवत आहेत.

अनिता नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले. दिग्गज कलाकारांनी वेगवेगळ्या तालात गायलेले विविध राग बंदिशी मुख्य गायक कलाकराला सहकलावंतांनी वाद्याच्या रूपाने दिलेली सुंदर साथ संगतीमुळे ठाणेकर रसिक तल्लीन होऊन गेले होते.

— लेखन : सिद्धी पटवर्धन. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800