चल ग सखे, अंतराळात राहू
मधुचंद्र कशाला, चंद्रावरती राहू
बांधीन इमले स्वप्नांचे मी तेथे
नभ चांदण्याचे गजरे तुजला माळू
गावात न उरले एकांताचे स्थान
हया गर्दीचे फुटपाथ वरही दुकान
काळया दुनियेस झुगारुनी वर जाऊ
अन चंद्रावरती व्हाईट हाऊस घेऊ
शुभ्र शुभ्र त्या आकाशगंगी पोहू
नजरेत नजर मिसळून पहात राहू
अग टिव्ही कशाला, अप्सराच करतील नृत्य
अन् स्टार प्रवाह सेवेस असेल नित्य
बिल न देता, दिल भरून घेऊ
अन् पुष्पक विमानी मोफत फिरून येऊ
जे हवेहवे से मिळाले मज सारे
स्वप्नांचे चढले सारे दिव्य मनोरे
चल ग सखे पुन्हा पृथ्वीवरती जाऊ
ते कांदे पोहे पुन्हा एकदा खाऊ

— रचना : मेघना साने. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800