मराठ्यांची स्फूर्तितीर्थे
पुस्तकांच्या शोधात गेल्या तीन वर्षापूर्वी प्रकाशित झालेले ‘मराठ्यांची स्फूर्ति स्थाने’ हे श्री पराग लिमये यांचे पुस्तक हाती आले.
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘स्वातंत्र्य प्रेरणेचा’ मूलमंत्र शिरोधार्थ मानून या कालखंडात असंख्य ज्ञात अज्ञात योद्धे आणि वीरांनी आपल्या रूधिराच्या सिंचनाने आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य देवीचा यज्ञ सतत धगधगत ठेवला म्हणूनच ते योध्ये आणि ती पवित्र धारातीर्थे दुर्गतीर्थे आणि स्मरणतीर्थे महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेचे अभिमानदंड आहेत. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या तेजोमय इतिहासाचे साक्षीदार असलेली ही सर्व स्फूर्तितीर्थे अक्षय अक्षय्य ऊर्जा आणि चैतन्याचे निधान आहेत.
या पुस्तकात शिवकाळ आणि शिवत्तोर काळात संघर्षाचे केंद्रबिंदू ठरलेल्या सिंधुदुर्ग, रांगणा, सिंहगड, कुलाबा, सज्जनगड, कोरीगड, वसंतगड आणि सोलापूरचा भूदुर्ग आणि त्याच्याभोवती सुमारे सव्वाशे वर्षाच्या कालखंडात घडलेल्या समर प्रसंगाचा आणि इतिहासाचा आढावा मुख्यत्वाने घेतला आहे.

‘म्रुत्युंजयाचा अखेरचा प्रवास’ या लेखातून छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या निर्घृण हत्येची करुण कहाणी सांगणारा लेख अत्यंत हृदयस्पर्शी आहे.
इराणच्या बादशहाच्या हल्ल्यातून दिल्ली वाचविण्यासाठी उत्तरेकडे निघालेले थोरले बाजीराव पेशवे मध्यप्रदेशात नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे 1740 मध्ये मृत्यू पावले. तेथे त्यांची समाधी व धर्मशाळा आहे. या स्म्रुतीतिर्थाची व बाजीरावांच्या पराक्रमाची यशोगाथा वर्णन करणारा लेखाचा समावेश आहे.
त्याचबरोबर गडाव्यतिरिक्त वढू, तुळापूर येथील छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मारकासंबंधी लेख आहे.
या बरोबरच कोलकाता येथील मराठा खंदक व वसईच्या किल्ला संग्रामात यशस्वी झालेले 28 वर्षाचे धुरंदर वीर चिमाजी अप्पा यांच्यासंबंधीचे लेख पुस्तकात समाविष्ट केले आहेत. तसेच शिवरायांची प्रेरणा घेऊन मोगलांच्या सत्तेविरुद्ध आसामात लढा देणारा वीर ‘लछीत बडफूकन’ या विषयी माहितीपुर्ण लेखाचा समाविष्ट केला आहे.
इतिहास व खगोलशास्त्र यावर आधारित ‘शिवजन्म आणि खगोलीय अवकाश’, ‘स्वराज्य ते साम्राज्य’, ‘राजसभेतील दिशासाधन’ हे तीन संकीर्ण ऐतिहासिक लेखांचा समावेश पुस्तकात लेखकाने अभ्यास पूर्ण रीतीने केला. हे या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.
सतराव्या आणि अठराव्या शतकातील मराठ्यांच्या दैदीप्यमान, तेजोमय आणि पराक्रमाच्या पाऊलखुणा असलेल्या या स्फूर्ति स्थळांचा इतिहास, भूगोल,भेटी देण्यासाठीची मार्गक्रमणा, त्यासाठीचे उत्तम नकाशे, पुणे, मुंबई पासूनचे भौगोलिक अंतर, समर्पक छायाचित्रे यांचा समावेश केला असल्याने पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक व गड, किल्ले यांची आवड असणारे जिज्ञासू, तसेच ट्रेकर, यांना एक मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होईल. आपल्या इतिहासाची साक्षीदार असलेल्या गौरवस्थळांना तरुण पिढीने भेट देऊन प्रेरणा घेण्याच्या द्रुष्टीनेच लेखकाने पुस्तकाची मांडणी सुयोग्य रीतीने केली आहे.

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800