Thursday, January 1, 2026
Homeसाहित्यसाहित्य तारका : १९

साहित्य तारका : १९

कुसुमावती आत्माराम देशपांडे

श्रेष्ठ मराठी कथा लेखिका समीक्षक लघुनिबंधकार कवयित्री कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी अमरावती येथे झाला.. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कुसुम जयवंत… त्यांचे शिक्षण मुंबई, नागपूर व लंडन विद्यापीठात झाले. बी. ए. (ऑनर्स) झाल्यावर नागपूर महाविद्यालयात (पूर्वीच्या मॉरिस कॉलेजात) १९३१ ते १९५५ पर्यंत इंग्लिशचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या स्त्री व बालविभागाच्या निर्मिती प्रमुख म्हणून काम केले.. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला.. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. कथालेखनापासून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली.. सुरूवातीला प्रतिभा पाक्षिकात त्यांचे ललितलेख व कथा प्रकाशित झाल्या..

कुसुमावती देशपांडे या मूळ समीक्षक, पण १९३१ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या किर्लोस्कर मध्ये त्यांनी ‘मृगाचा पाऊस’ ही पहिली कथा लिहिली आणि मग त्या अनेक कथा एकामागोमाग एक लिहित गेल्या.. त्यांनी एकूण ४८ कथा लिहिल्या… दमडी’, ‘चिंधी’, ‘कला धोबिणीचे वैधव्य’, ‘लहरी’, ‘गवताचे पाते’ अश्या त्यांच्या काही कथा तर दीपकळी, मोळी, दीपदान इ. त्यांचे कथासंग्रह तर चंद्रास्त, मध्यान्ह, मध्यरात्र हे त्यांचे ललितलेख संग्रह प्रसिद्ध आहेत.. त्यांचा ‘प्रतिभा’, ‘ज्योत्स्ना’, ‘अभिरुची’ व ‘सत्यकथा’ या नियतकालिकांशी त्यांचा संबंध राहिला.

त्यांच्या कथांमधून तत्कालीन सामाजिक वास्तवाचे व विशेषतः सर्वसामान्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे अल्पाक्षरी पण चित्रमय शैलीत वेधक चित्रण आढळते… मध्यमवर्गीय जीवनाची ही चित्रे त्यांनी समर्थपणे रंगवली.. नवकथा पूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणा-या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते..
व्यक्तिमनातील आंदोलने टिपणारी, चिंतनशील, काव्यात्म, रेखीव आणि प्रगल्भ अशी त्यांच्या कथालेखनाची धाटणी तर छोट्याश्या अनुभवाला चिंतनशीलतेचे परिमाण देत मानवतेला आव्हान करत गाभ्याला हात घालत जीवनकथा लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते..

त्यांच्या कथेत स्त्रीचे दुखरे मन उमलून येते.. अनुभवांचे निवेदन अपरिहार्य वाटल्यावरच त्यांनी कथा लिहिल्या. निसर्ग आणि मानवी जीवन यांतील संबंधांचा त्यांनी आपल्या कथांतून शोध घेतला. तंत्रापेक्षा कथेचा विषय व त्या विषयीचा आपला दृष्टिकोण यांना महत्त्व दिल्याने त्यांच्या कथांना वेगळेपणा लाभला. 

कुसुमावती देशपांडे यांचा मराठी कादंबरी या विषयावरचा अभ्यास दांडगा होता.. मराठी कादंब-यांचा टीकात्मक इतिहास १८५७ ते १९५० या काळातील कादंब-यांचे समालोचन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय…
मराठी कादंबरी : पहिले शतक’ हा ग्रंथ दोन भागांत प्रकाशित झाला. (पहिला भाग : १९५३ व दुसरा भाग : १९५६ पुढे दोन्ही भाग एकत्र (१९७५) त्यात मराठी कादंबरीच्या प्रारंभा पासून १९५० कादंबरी पर्यंतच्या मराठी कादंबर्‍यांच्या स्थिती-गतीचा, चढ-उतारांचा त्यांनी आलेख काढला आहे…

“मराठी कादंबरी पहिले शतक” या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी घेतलेला कादंबरीचा ऐतिहासिक आढावा त्यांच्या मराठी भाषेच्या व्यासंगाचा आणि समीक्षकांच्या शोधक दृष्टीचा प्रत्यय आणून देतो..

कुसुमावती देशपांडे यांनी रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ याचे इंग्रजीत रूपांतर केले आहे…
पासंग हा त्यांच्या १९३३ ते १९६१ या काळातील निवडक टीकालेखांचा व भाषणांचा संग्रह… या काळातच नवकाव्य व नवकथा आणि अनुषंगाने समीक्षेतील काही नवे विचार यांचा उदय झाला. स्वतंत्र भारतातील सामाजिक पुनर्घटनेचे प्रश्न इतर विचारवंतां प्रमाणे कुसुमावतींनाही जाणवले… इंग्लिश साहित्य समीक्षेच्या चोखंदळ अभ्यासाचीही जोड लाभली यामुळे सौंदर्यमूल्याबरोबरच मानसशास्त्रीय, सामाजिक आणि सार्वकालीन जीवनमूल्यांचा त्यांनी पुरस्कार केला..
स्फुट टीकालेखनाच्या आधुनिक परंपरेत जीवनसापेक्ष टीका विचाराला सर्व समावेशक बनवून त्यांनी अधिक विकसित केले. याचा प्रत्यय पासंग मधील टीकालेखांवरून येतो… 

१९४८ साली मराठी वाङ्ममय परिषद, बडोदे येथे आयोजित केलेल्या ‘बडोदे साहित्य संमेलन’च्या त्या अध्यक्षा होत्या. १९५८ साली गोरेगाव मुंबई येथे झालेल्या ‘मुंबई उपनगर साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते तर १९६१ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद हा सर्वोच्च मानसन्मान लाभलेल्या त्या पहिल्या विदुषी ठरल्या…

मराठी साहित्याचा उत्तम व्यासंग असलेल्या कुसुमावती देशपांडे या महान लेखिकेचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.

संगीता कुलकर्णी

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय समर्पक माहितीपूर्ण लेख. दीपकळी, दीपदान, मोळी आणि दिपमाळ हे त्यांचे संग्रह आज अतिशय दुर्मीळ झाले आहेत. दीपकळी पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी स्वतः केलेले होते. या पुस्तकांची मुखपृष्ठ पहावयास मिळावी अशी जिज्ञासा आहे. ही पुस्तके पुनर्मुद्रित होऊ शकतील का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”