पितृपक्षी श्राद्ध घालतो परंपरा ही जुनी
किती तरी ते प्रश्न ठाकती अवचित येती मनी..
जन्ममृत्यु साखळी दुवा हो आपण सारे असतो
जन्मल्याक्षणी मातपित्यांवर प्रेम किती ते करतो…
यथासांग कर्तव्ये सारी, गलितगात्र मग होतो
जन्मदिला ज्यांना, त्यांचा विसर का बरे पडतो ?
जड होती जे मातपिता रक्त जया आटवले
अंगाखांद्यावर नाचवले प्रेम किती ते केले…
तळहाताचे फोड, मुले ही आठवत का नाही ?
कशी फिरवावी सांगा ना मग ममतेची द्वाही ?
जितेपणी जर प्रेम दिले तर हवे कशाला श्राद्ध ?
प्रेम करा हो, प्रेम करा हो, नका करू ना विद्ध…
परतफेड ती करावयाची असते दर पिढीने
सांभाळावे मातपित्यांना लाडाने गोडीने..
वृद्धाश्रमी टाकून तयांना घायाळ का करावे
नातवंडांसवे तयांना सुद्धा जोपासावे ..
घास टाकावा पितरांना फक्त श्रद्धे पोटी
तुमच्यामुळेच आहोत आम्ही नाम असावे ओठी…
प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे हीच परंपरा थोर
हवे कशाला श्राद्धाचे हे विनाकारणी थेर..?

— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुमती mam great