उत्तर – निरुत्तर !
1964 पासून माझा महाविद्यालयीन मित्र दिलीप करंदीकर याच्याशी साधारण आम्ही निवृत्त झाल्यावर, म्हणजे सुमारे 2004 पासून, तो ठाण्याला आणि मी डोम्बिवलीला रहात असल्यामुळे, आठवड्यातून एकदा, दूरध्वनीवर दीर्घ गप्पा मारतो. कधीतरी तो सपत्नीक 3 – 4 महिने अमेरिकेत मुलांकडे जातो. मग मी त्याला आठवड्यातून एकदा सुमारे 2,000 शब्दांचे ‘ अवती – भवती ‘ पद्धतीचं पत्र लिहितो.
एकदा त्याची पत्नी प्रतिभा मला म्हणाली की, तुम्ही मित्राला पत्रं लिहिता; मात्र, आपलीही तितकीच मैत्री असल्यामुळे मला असं पत्र का लिहित नाही ? तिचा प्रश्न बरोबर होता. मी तर त्यानं निरुत्तरच झालो !
मग माझ्याही मनात आलं की, तिला तसंच पत्र पाठवावं, असं माझ्या मनात कधीच का आलं नाही ? नंतर मी आलटून पालटून त्या दोघांना पत्रं लिहू लागलो. प्रतिभाच्या या प्रश्नानं जसं मला निरुत्तर केलं, तसं आणखी दोन स्त्रियांच्या प्रश्नांनी मला निरुत्तर केलं होतं.
हा प्रसंग आहे आहे, 1960 च्या दशकातील.
मी मुंबईतील माटुंग्याला V.J.T.I. मध्ये शिकत होतो, आणि एका शनिवारी दुपारी माटुंग्याहून मुलुंडला माझ्या बहिणीकडे ट्रेननं चाललो होतो. डबा खचाखच भरलेला होता. इतक्यात एक 35 – 36 वर्षांची तरुणी माझ्या जवळ आली आणि म्हणाली की, दादा, या गर्दीतून मला वाचवा. हे पुरुष प्रवासी वाटेल तसे धक्के मारताहेत/लागताहेत.
मी तिला म्हटलं की, ताई, या गर्दीच्या वेळेत तुम्ही पुरुषांच्या डब्यांत का आलात ? बायकांसाठी 2 वेगळे डबे आहेत ना ?त्यावर तिनं जे उत्तर दिलं त्यानं मी निरुत्तर झालो. ती म्हणाली की पुरुषांना 5 डबे असून ( त्या वेळेस 9 डब्यांच्या लोकल होत्या. ) ते त्यांना कमी पडतात. बायकांची लोकसंख्या जवळ जवळ पुरुषांच्या इतकीच आहे. मग त्यांना दोन डबे पुरतील का ?
मी अवाक झालो ! मला उत्तरच सुचेना ! मी त्या माऊलीपुढे हात जोडले !
नंतर, काही वर्षांनी माझं लग्न झालं.
एका सुट्टीच्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास, मी आराम करत होतो. इतक्यात माझा एक मित्र आणि त्याची बायको आले. मी माझ्या पत्नीला – लीनाला – म्हटलं, की त्यांना जेवायलाच थांबवून घेऊ. छानपैकी एखादा गोडाचा पदार्थ करा. त्यावर मित्राची बायको म्हणाली की, छान पदार्थ नको. मुगाच्या डाळीची खिचडी बनवू या. बाकी काही नको. मी म्हटलं की, सुट्टी आहे तर एखादा पदार्थ बनवा. जरा सुट्टीच्या दिवशी चांगलं पदार्थ पोटात जाऊ दे की. त्यावर ती म्हणाली की, तुम्हाला सुट्टी आहे हो. पण बायकांना सुट्टी असते का ? त्यांना स्वयंपाक बनवण्यापासून कधीच सुटी नाही. त्यांना नको एखाद दिवस सुट्टी मिळायला ?
हा ही प्रश्न माझ्या मनात कधी आला नव्हता. या ही प्रश्नावर मी निरुत्तर झालो.
मग तेव्हापासून सुट्टीच्या दिवशी आमच्या घरी अगदी सुटसुटीत, शक्य तो खिचडीच ( one dish meal ) बनवू लागलो !कोणी जेवायला येणार असेल तर गोष्ट वेगळी. असं पुष्कळ वेळा होतं, की आपण निरुत्तर होतो. माझ्या नोकरीच्या काळातील एक प्रसंग सांगण्यासारखा आहे.
एके वर्षी मला मिळालेली वार्षिक वाढ माझ्या मनासारखी नव्हती. माझे वरिष्ठ त्या वेळेस नुकतेच नोकरी सोडून गेलेले होते; त्यामुळे मी कंपनीच्या संचालकांशी वाद करत होतो. त्यांनी घेतलेले सर्व आक्षेप मी खोडून काढले. त्यांना काहीच बोलता येईना. म्हणून मग ते मला म्हणाले की, चांदे, तुमच्या सोडून गेलेल्या वरिष्ठांचं तुमच्या बद्दल खरं मत काय होतं, हे तुम्हाला ऐकायचंय ?
खरं तर त्यांचं आणि माझं खूप जमत असे. त्या वर मला उत्तर सुचलं की, अवश्य, मी ते ऐकेन. पण मग तुम्हालाही त्यांचं तुमच्याबद्दलचं खरं मत काय होतं ते ऐकावं लागेल. चालेल ? ते इतके हबकले की, काय बोलावं ते त्यांना सुचेच ना ! त्यांचा पडलेला चेहेरा मला अजून आठवतो.
याच वरिष्ठांबद्दलची आणखी एक आठवण.
माझे वरिष्ठ आमची कंपनी सोडून गेले तेव्हा मी कामानिमित्ताने फिरतीवर होतो. अर्थात, मला फिरतीवर असतानाच ही बातमी कळली होती. मी फिरतीवरून आल्यावर मला कंपनीच्या याच संचालकांनी माझे वरिष्ठ नोकरी सोडून गेले असून ते आता आपल्या स्पर्धकाकडे रुजू झाले आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी संपर्कात राहिलात तर ते व्यवस्थापनाला आवडणार नाही, आणि व्यवस्थापन त्याची गंभीर दखल घेऊन, तुमच्यावर काहीही कारवाही करू शकेल; असं बजावलं.
मी त्या वेळेस कंपनीच्या पणन विभागात काम करत होतो. आमचे आणि आमच्या त्या स्पर्धक कंपनीचे ग्राहक एकच होते. साहजिकच, आमच्या ग्राहकांकडे आमच्या भेटी होणारच. मग आम्ही एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही; हे कसं शक्य आहे ? शिवाय, माझ्या या वरिष्ठांच्या घरी माझं येणं जाणं होतं. त्यांच्या पत्नी एका कंपनीत नोकरी करत होत्या. तिथंही माझं कामानिमित्तानं जाणं येणं होतं. त्यांच्याशीही माझा स्नेह होता. साहजिकच, मी त्यांच्याशीही बोलत असे. त्यामुळे मी बोलणं टाळूच शकणार नाही. आपल्या कंपनीला हे चालणार नसेल तर मला नोकरीतून मोकळं करा; असं मी सांगितलं.
आमचे संचालक निरुत्तर झाले.
मात्र, त्यांची भीती रास्त होती. कारण अशा भेटीतून कंपनीच्या भावी योजना स्पर्धक कंपनीला कळतात. हा धोका एकमेकांच्या स्पर्धक कंपन्यांना नेहेमीच असतो. या साठी मी त्यांना वचन दिलं की, मी भेटेन, गप्पा मारेन; पण कुठल्याही परिस्थितीत आपल्या भावी योजना त्यांना कळू देणार नाही. वाटलं तर मी हे लिहून द्यायला तयार आहे.
मग मात्र त्यांचं समाधान झालं. पण प्रत्येक परिस्थितीतून आपण मार्ग काढतोच ना ?
काही दिवसांनी मला माझे सोडून गेलेले माजी वरिष्ठ जी. रामस्वामी, आमच्या समान ग्राहकाकडे भेटलेच. मग काम आटोपल्यावर आम्ही आमच्या ‘ सायंकाळच्या कार्यक्रमा ‘ ला जाण्याचं ठरवलं. कारण त्यांना ती कंपनी तडकाफडकी का सोडावी लागली, ते मला सांगायचं होतंच.
मात्र, आमच्या कार्यक्रमाला सुरवात होताच मी त्यांना माझ्या वरिष्ठांना काय वचन दिलं आहे, ते सांगितलं. शिवाय, हे ही सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत त्या विषयावर बोलायचं नाही. त्यांनी ते मान्य केलं.
आमच्याकडे गप्पा मारण्यासाठी ‘ एकशे एक ‘ विषय असल्यामुळे, आम्हाला गप्पा कुठल्या विषयावर माराव्यात, हा प्रश्न नव्हता. आमच्या बऱ्याच आवडी निवडी समान होत्या. कामानिमित्तानं आम्ही खूप वेळा एकत्र प्रवास केला होता. 24 तास एकत्र राहिलो होतो.
रामस्वामी दाक्षिणात्य होते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवास करताना मी गावोगावचा इतिहास, भूगोल, तेथील साहित्यिक, औद्योगिक प्रगती, राजकीय पुढारी अशा अनेक बाबींवर बोलत असे. आताही आम्ही भेटलो आणि भरपूर गप्पा मारल्या, हे काही लपून राहणार नव्हतं. कुठून ना कुठून ते आमच्या व्यवस्थापनाला कळणार होतंच. शिवाय खासगी कंपन्यांत पाळत ठेवली जातेच.
मला एक कल्पना सुचली.
दुसऱ्या दिवशी मी आमच्या वरिष्ठांना आदल्या दिवशीच्या कामाचा तपशील दिल्यावर, आपणहून त्यांना माझे जुने वरिष्ठ भेटले, आणि आम्ही भरपूर गप्पा मारल्या; हे सांगितलं. त्यांना काही बोलताच येईना !
जाता जाता …..
माझ्या कंपनीतील पणन विभागात नसलेले माझे सहकारी माझ्यापेक्षा रामस्वामींचे जुने सहकारी होते. पण जवळजवळ त्या प्रत्येकानं, आम्ही रामस्वामींना भेटणार नाही, असं तोंडी आश्वासन व्यवस्थापनाला दिलं होतं. त्यामुळे ते रामस्वामींना भेटू शकत नव्हते. मी माझी युक्तीनं व्यवस्थापनापासून सुटका करून घेतली असल्यामुळे ते चरफडायचे !
अशा प्रकारे मी माझ्या जुन्या वरिष्ठांना भेटत राहिलो, आणि दर वेळेस माझ्या सद्य वरिष्ठांना सांगत राहिलो !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
