आपल्या अलौकिक लिखाणाद्वारे मराठी साहित्य समृध्द करणाऱ्या कवयित्री, साहित्यिका शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोंबर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला.लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे शांताबाई पुणे येथे काकांकडे रहात होत्या. त्या १९४२ साली बी.ए.आणि १९४४ साली एम.ए. झाल्या. महाविद्यालयात असतांना त्यांना वाचन व लेखनाची आवड निर्माण झाली.
त्यांनी मुलांसाठी कथा -कविता लिहिल्या. प्रौढांसाठी कथा लेखन केले. कादंबऱ्या, ललित लेख, व्यक्तिचित्रे, कविता लिहिल्या. त्यांचा ओढा कवितेकडे जास्त होता. एम.ए. झाल्यानंतर शांताबाई मुंबईला आल्या. काही काळ त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात कम केले.
सुरुवातीला अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिकात व नंतर अत्रे यांच्याच ‘नवयुग ‘ या साप्ताहिकात कम केले. या क्षेत्रात त्यांनी स्तंभ लेखन करणे, मुलाखती घेणे, इंग्रजी लेखनाचे अनुवाद करणे, कार्यक्रमांचा वृतांत लिहून काढणे, पुस्तक परीक्षणे लिहीणे इत्यादी कामे त्या करू लागल्या. आचार्य अत्रे यांनी शांताबाई यांना चांगले मार्गदर्शन केले. आवडीने घेतलेली लेखणी त्यांना व्यवसायात मदतीला आली.
अत्रे यांच्या नवयुग या साप्ताहिकात उपसंपादक म्हणून कम केल्यानंतर त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप, तसेच मुंबईच्या रुईया, दयानंद आणि सिध्दार्थ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कम केले. त्यांनी शालेय पुस्तकांच्या संपादनापासून तो विद्यार्थ्यांसाठी गाईड लिहिण्यापर्यंत धंदेवाईक लेखन केले.

अनुवाद करणे शांताबाई यांना खुप आवडायचे. इंग्रजीत काही चांगले वाचले तर त्याचा मराठीत अनुवाद करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. त्या ऊर्मीतून त्यांनी अनेक इंग्रजी लेखांचे,कवितांचे अनुवाद केले. जपानी ‘हायकू’ च्या इंग्रजी अनुवादाचे पुस्तक शांताबाईच्या वाचनात आले. त्यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.
एखाद्या साहित्यकृतीने आपल्याला दिलेला आनंद आपण इतरांबरोबर वाटून घ्यावा हीच शांताबाई यांच्या अनुवादांमागची प्रेरणा होती. अनुवादित साहित्यात स्वतंत्र वाड्मय निर्मितीचा आनंद नसला तरी चांगल्या अनुवादित वाड्मयाची मराठी साहित्याला फार मोठी गरज आहे़ असे शांताबाई यांना वाटत होते. मराठी भाषा आपण कशी व किती वाकवू शकतो याचा कस अनुवादात लागतो असे शांताबाई यांचे मत होते.
शांताबाई यांनी भरपूर ललित लेखन केले. काही अनुभव बचकेने घ्यायचे असतात तर काही चिमटीने उचलायचे असतात. ललित लेखनातील अनुभव हा असाच चिमटीने उचलायचा अनुभव आहे़ असे शांताबाई म्हणत असत. दैनंदिन जीवनात असे काही अनुभव येतात काही वाचनात येतात असे अनुभव ललित लेखनातून मांडता येतात असे शांताबाई म्हणत.

आपल्याला जे आवडले ते दुसऱ्याला सांगावे या हेतूने शांताबाई यांनी अनेक पुस्तक परीक्षणे लिहिली, वाड्मयीन समीक्षात्मक लेखन केले. ही सारी परीक्षणे, समीक्षा निखालस आस्वादक असून शांताबाई यांच्या आनंदाचा तो एक आविष्कार आहे़.
शांताबाई यांच्या मते गीतरचना हा प्रकार एका वेगळ्या तर्हेने आनंददायक आहे़. कागदावर निर्जीव वाटणारे गाणे नंतर कलेकलेने उमलत, फुलत जाते. सुरांशी बिलगताना, वाद्यांच्या साथीने उमटताना, गायकाच्या किंवा गायिकेच्या कंठातून चैतन्यमय होताना ते अंग धरते, उभे राहते, नाचू लागते. हे सर्व बघणे हा रोमांचकारक अनुभव आहे़ असे शांताबाईंना वाटत होते.
शांताबाई यांनी कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, वैचारिक निबंध, बालसाहित्य, अनुवाद, आत्मचरित्रात्मक ललित लेख इत्यादी विपुल लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. आळंदी येथे १९९६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
शांता शेळके आजन्म अविवाहित राहिल्या. त्या आयुष्यभर शब्दांच्याच सहवासात राहिल्या. ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे’ असे म्हणणाऱ्या शांताबाई यांनी ६-६-२००२ रोजी या जगाचा निरोप घेतला. अनेक अजरामर गीतं मागे ठेऊन सदैव स्मरणात राहणाऱ्या शांताबाई यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
शांताबाई शेळके गोड गाणी साठी प्रसिद्ध होत्या हे आठवणीतून उतम सांगितले आहे.
गोविंद पाटील सर जळगाव.