भाग : – २
शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो. सर्वपित्री अमावस्या तिथीला श्राद्धपक्ष किंवा पितृपक्ष समाप्त होतो. भारतात काही ठिकाणी सर्वपित्री अमावस्या पितृ अमावस्या, महालय अमावस्या आणि पितृमोक्ष अमावस्या या नावांनी ओळखली जाते. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांच्या नावाने केले जाते. ही अमावस्या पितरांचे स्मरण करण्यासाठी, मोक्षासाठी, दान करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीची प्रार्थना करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी मातामह श्राद्ध (आईच्या वडिलांचे श्राद्ध) असतेच. पण याशिवाय, या दिवशी ज्यांचा मृत्युदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर ते या दिवशी करता येते.
पितृदोषापासून मुक्ती होण्यासाठी, अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. यानंतर पितरांचे स्मरण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्यांचे श्राद्ध करावे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना जेवण करून घ्या अशी प्रार्थना करावी. भोजन केल्यानंतर, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. अन्नदान करावे. पिंपळ वृक्षाची पूजा करावी.

पितर-ज्योतिष-नक्षत्र-राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. यमाने पितृपंधरवड्यातील प्रत्येक तिथी व नक्षत्रावर केलेल्या श्राद्धाची फळे सांगितली आहेत. पितृपक्षात आपले पितर न बोलावता आपल्याकडे येतात. त्यांना जल,अन्नादींनी संतुष्ट करावे हे आपले कर्तव्य असते.
पितृ पंधवड्यात पूर्वजांना जल अर्पण करण्याच्या विधीला तर्पण असे म्हणतात. पूर्वजांना अर्पण करावयाचे तर्पण करतांना,
ॐ पितृ देवतायै नम:
ॐ आगच्छन्तु में पितर एवं ग्रहन्तु जलान्जलिम‘
असा मंत्र म्हणून पूर्वजांचे स्मरण आणि आवाहन करावे. या मंत्राचा अर्थ असा की, “पूर्वजांनो आपण येऊन जलांजली ग्रहण करावे.” महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण –पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई, वडील, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहीण, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या, सासू-सासरे, व्याही, विहीण व अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरू आणि शिष्य त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते.
याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर, अनोळखी असलेल्या दिवंगतव्यक्तीना उद्देशूनही हे श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नांवाचा उल्लेख करतात.
या निमित्ताने आम्ही संस्थेला देणगी देतो असे आजकाल अनेक जण म्हणतात. (यांत मीही आले कारण सिंगापूरला आल्यापासून कावळ्याला जेवण देणे, गाईला चारा देणे, पिंपळ वृक्षाची पूजा करणे इ. गोष्टी शक्य होत नाहीत. तरी वर सांगितलेल्या गोष्टींपैकी ज्या शक्य आहेत त्या करते आणि न जमणाऱ्या बद्दल पितरांनाच सांगून त्यांची क्षमा मागते. आपलेच पितर ते, जाणून क्षमा करतील यावर श्रद्धा ठेवते) अशा ही गोष्टी वाईट नाहीत, पण ज्याने समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. त्या धर्माचे पालन ही समाजाच्या एकीसाठी व स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणून सारेच जमत नसेल तर जे शक्य आहे ते करावे.
आपल्या कुटुंबातही प्रत्येकजण मनाप्रमाणे वागू शकत असेल तरी काही गोष्टींची बंधने त्याला स्वीकारायला लागतातच. खरे ना ? तसेच आपल्या कुटुंब म्हणून समाजात असलेल्या सामाजिक वर्तनाचे आहे. दिसेल ती परंपरा मोडायची हे धोरण योग्य नव्हे. हा विवेक सामान्य जनांत आहे म्हणून ही प्रथा भारतभर टिकून आहे. तिच्याशी अवकाशात न तरंगणाऱ्या आत्म्यांचा संबंध नाही किंवा भटाभिक्षुकांचाही मुळीच नाही. पूर्वजांना आदर आणि श्रद्धांजली वाहिली पाहिजे, मृत व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आणि स्मृतींचा आदर केला पाहिजे, कारण पूर्वजांनीच वंशजांना जगात आणले, त्यांचे पालनपोषण केले आणि वंशज ज्या परिस्थितीत वाढले त्या परिस्थितीची तयारी केली, म्हणून पूर्वज, पूजा म्हणजे आध्यात्मिक ऋणांची परतफेड.
मनुने सर्वात प्रथम श्राद्ध केले असे मानले जाते म्हणूनच मनूला श्राद्धदेव म्हटले जाते.
प्रभू श्रीरामाने जटायूसाठी, पिता दशरथासाठी, वराहदेवासाठी श्राद्ध, तर्पण केले. श्रीरामप्रभू वनवासात होते. त्यामुळे त्यांनी वनात उपलब्ध होते त्या फळांनीच श्राद्ध केले. कारण आपण जे सेवन करतो तेच पितरही आनंदाने स्वीकारतात. जटायूच्या मृत्यूची वार्ता प्रभू श्रीरामांकडून संपातीला समजली. तेव्हा संपातीनेही जटायूसाठी श्राद्ध तर्पण केले. सुग्रीवाने वालीचे, बिभिषणाने दशाननाचे, पांडवांनी पंडुराजाचे श्राद्ध करून ऋणातून मुक्त करून घेतले. आपल्या वैदिक आर्यांनी देखील यमधर्मालाच आपला प्रथम पितर मानून ‘आम्ही प्रार्थना करताच तू आमचे रक्षण कर’ म्हणून आळविल्याचे संदर्भ सापडतात. वेद-उपनिषदे, गीता-गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी जगन्मान्य ग्रंथांमध्येही पितृतर्पण, श्राद्ध, हवन, दान इत्यादी पितृयज्ञांची महती सांगितलेली आहे. प्रत्येकालाच आपल्या घराण्याला नेमका पितृदोष आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.
अनेक समाजांमध्ये पितरांबद्दल आदर आहे. ते समाजात सामाजिक स्थान प्रदान करतात. ते सजीवांचे रक्षक आहेत आणि ते भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित करतात. पूर्वजांचा सन्मान करणे हे अनेकांना जगण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
आपल्याकडे बोलताना सहज ‘पितरलोक’ असा शब्द वापरला जातो. पितरलोक म्हणजे नेमकं काय ?
पितरलोक :
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या पुढील अंतरिक्ष ‘पितृलोक’ म्हणून ओळखतात. अंतरिक्ष, स्वर्ग व पृथ्वी यामधील भागास पितृलोक म्हणतात. पितर येथेच राहतात असे मानले जाते. आपण जेव्हा पिंडदान- जलदान-हवन करतो तेव्हां या द्रव्यांना सुगंधित करून पितरांपर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे.

या सर्व उहापोहानंतर साहजिकच असा प्रश्न मनांत येऊ शकतो की ही परंपरा फक्त भारता मध्येच आहे कां ? याचे उत्तर जगांतील सर्व धर्मांत, सर्व देशांत पूर्वजांचे ऋण मानले जाते. पितृलोक हा एक प्रकारचा श्रेष्ठ देवतासदृश योनींचा प्रदेश आहे. या प्रदेशाचे अस्तित्व प्रत्येक धर्मात मानले गेले आहे. भलेही त्याचे नांव वेगवेगळे असेल पण याच्या अस्तित्वाला मान्यता दिली गेलीय.
क्रमशः
इतर देशातील पितृपक्ष भाग : ३ मध्ये वाचा.

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800