कागदी होड्या
कागदी होड्या हा बा भ बोरकर यांचा १९३८ मध्ये प्रथम आवृत्ती व ५/१२/२००९ मध्ये सुविधा प्रकाशन, सोलापूर मार्फत द्वितीय आवृत्ती निघालेला आणि सध्या आऊट ऑफ प्रिंट दुर्मीळ झालेला लघुनिबंध संग्रह. अवघ्या ६६ पृष्ठांचा व मूल्य रु ६० असलेला. या संग्रहात २१ लघुनिबंध असून अनंत काणेकर यांची प्रस्तावना आहे. अगदी आटोपशीर छोटे छोटे हे लघुनिबंध आहेत.
कागदी होड्या या लघुनिबंधात बालगोपाळांना जसे पावसाचे दिवस भारी प्रिय असतात तसे ते लेखकालाही होते. पावसाळी दिवसांचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. गुडघाभर तळं साचलं की ते कागदी होड्या करण्यात गुंतून जात. या होड्यांना ना इच्छित स्थळ ना प्रवासी पण त्यातून अज्ञात प्रवास करणे आनंदाचे होते. आजही पाऊसाबरोबर मन बागडते. होड्यांचा फोलपणा भंगुरता सर्वांना ठाऊक आहे पण म्हणून आत्महत्या करायची की अधिक आनंद करायचा असे ते विचारतात !
राशिभविष्य या लघुनिबंधात भविष्यावर विश्वास नाही पण वृत्तपत्रातील राशिभविष्य वाचल्याशिवाय लेखक राहत नाही. ते सत्यात उतरते असे कोणी खात्री देत नाही. पण ते छोटीशी करमणूक करुन घेण्यासाठी असते. खोटेपणामुळेच ते मनोरंजक वाटते. ते जर बरोबर उतरले असते तर जगण्यात स्वारस्य उरले नसते. राशिभविष्यातून रमणीय तर्क करता येतो इ. महती यात सांगितली आहे.
आत्मपूजा यात मनुष्य निसर्गतः आत्मपूजक आहे पण सगळी सृष्टी त्याला तू कनिष्ठ आहेस याची जाणवीत असते. आपल्याहून प्रबळ शक्तीचा पराजय त्याला विजयसुखाचा आनंद देतो तर इतरांच्या विजयाचा प्रसंग त्याला खूपू लागतो या मनुष्यस्वभावाचे यात वर्णन केले आहे.
पडदा यात पडद्यामुळे आपण कल्पकतेने सुंदरता पाहतो. झाकल्या मुठीत सव्वा लाखाचे धन पाहतो. जे सुसाध्य नाही त्या वास्तवतेवर आपण कोणता ना कोणता पडदा टाकत असतो. आशेच्या पडद्यामुळे भविष्यकाळ मनोरम वाटतो इ. सुंदर विवेचन केले आहे.
अलिखित चरित्रे व अनामिक महात्मे यात लेखकाला लहानपणी त्यांचे बाबा चरित्रे व आत्मचरित्र वाचायला देत. मोठी माणसे सगळ्या आयुष्यात एकदाही कशी चुकत नाही असा त्यांना प्रश्न पडे. बाजारी जगाचे जसे त्यांना अनुभव येऊ लागतात तसे त्यांना ही चरित्रे भ्रामक व अर्धसत्य असल्याचे जाणवू लागते. अलिखित चरित्रेच सर्वस्वी सत्यपूर्ण आहेत व तिच जगाला प्रेरक होतात असा विचार यात मांडला आहे.

भांडणारे आंधळे तत्वज्ञानाचा उपयोग पुष्कळ लोक झोपेचे औषध म्हणून करतात. लेखकाला मात्र ती लाफिंग गॅससारखी वाटते. जगाच्या अंतिम सत्याबद्दल शिरा ताणून भांडणारे तत्वज्ञ डोळ्यापुढे उभे राहिले की त्यांना हसू फुटते. आपण सगळेच या जगात जन्मांध प्रवासी असून आयुष्याच्या अनंत प्रवासात सोयीसाठी आपण तत्त्वज्ञानाच्या काठ्या घेऊन चालत असतो. आपण सगळेच आंधळे आहोत अशा समजुतीने वागणारा मनुष्य लेखकाला शहाणा माणूस वाटतो. रुचेल ते गाणे म्हणत राहावे मग ते जगाच्या दृष्टीने अर्थशून्य असले तरी चालेल असे विचार यात मांडले आहेत.
त्यागाचा मोबदला त्यागातच असतो. एवढीशी गोष्ट केली तर फार मोठे शतकृत्य केले अशी आपण समजूत करुन घेतो व त्याबद्दल सगळ्या जगाने ऋणी मनाने आपणावर पुष्पवृष्टी करीत राहावी अशी अपेक्षा करीत राहतो. तसे नाही केले की डोक्यात राख घालून जगाला शिव्या हासाडायच्या अशी आपली वृत्ती होऊन बसते. “माझा स्वार्थत्याग हा स्वार्थत्यागच नव्हे, मी केवळ विशाल जीवनाच्या प्रतीतीसाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरलो’ हे जवाहरलालजींचे उद्गार लेखकाला साधे, सुंदर व समर्थ तत्व वाटते.
भली माणसे व भयंकर माणसे अहंमन्य लोक सगळी मानव जात दोन वर्गांत विभागीत असतात:भली माणसे व भयंकर माणसे. आपण दिसलो की माना वाकवणारे ते ‘भले’ व तंगड्या मुरगळू पाहणारे ते ‘भयंकर’. भली माणसे आणि भयंकर माणसे याचे मार्मिक विवेचन यात केलेले आहे!
मनाचे चोर आपण सगळे मनाचे अट्टल चोर आहोत. प्रत्यक्षात न मिळालेली सगळी सुखे आपण मनाने रात्रंदिवस चोरीत असतो. चेहर्यावर मात्र साळसूदपणाचा भाव राखण्याची पराकाष्ठा करीत असतो.
लेखकांचे तीन वर्ग लेखकांचे तीन वर्ग असतात. काही आपल्या पुस्तकांहून लहान असतात. काही त्यांच्या समान असतात तर काही त्यांच्याहून कितीतरी पटीने मोठे असतात. पहिल्या वर्गाचा लेखक आपली पुस्तके डोक्यावर घेऊन त्यांच्या भाराखाली वाकलेला दिसतो, दुसरा ती कौतुकाने चाळीत असताना दिसतो, तर तिसरा त्यांच्या चौथर्यावर उभा राहून जगाकडे पाहत असताना दिसतो. यात तिघांचे मार्मिक दर्शन घडते.
गोल्ड फ्लेक इतर सिगारेटस या फशी पाडणार्या ‘फटाकड्या’ असल्या तर गोल्डफ्लेक ही ह्रदयंगम सात्विक ‘फुलराणी’ आहे असे लेखक यात म्हणतो धुराच्या चंचल वेलींबरोबर परिभ्रमण करताना लेखकाला त्यांची कल्पना आकाश व्यापीत आहे. त्या विस्तारांत लय पावणार्या वलयात त्यांना नश्वर जीवनाची विशालता दिसते. त्यांच्या बोटांना एकाएकी चटका बसतो. सिगारेट केव्हाच जळून गेली होती. राख इतस्ततः सांडली होती. यात नकळत तत्वज्ञान मांडले आहे.
जाणती पिढी जुन्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती वयाच्या दाखल्यावरुन जगातल्या सगळ्या ज्ञानभांडारावर अधिकार सांगत सुटते. कालपर्यंत आपण मूर्ख होतो हे ज्याला समजते त्यानं आज आपण सर्वस्वी शहाणे झालो असे समजणे, हा महामूर्खपणा आहे. प्रत्येक वयाचा असा एक एक शहाणपणा असतो आणि तो त्या त्या वयाचं सुख निर्माण करण्यास पुरेसा असतो. त्या त्या वयाच्या शहाणपणात किंवा मूर्खपणात जीवनातलं सगळं काव्य, सगळं स्वारस्य सामावलेलं असतं असे सुंदर विचार यात मांडले आहेत.
पूर्णतेची तहान मनुष्य हा स्वभावत: टवाळखोर प्राणी आहे.आपणाला पूर्णतेचा साक्षात्कार हवा असतो. स्वभावत:आपण पूर्णतेचे उपासक आहोत. प्रामाणिक टीकाकार हा पूर्णतेचा उपासक असतो. पूर्णतेच्या तहानेनं जो तो व्याकुळला आहे असा सुंदर विचार यात मांडला आहे.
काळोख प्रकृतिभेदानुसार काळोखाचे अनेकांवर अनेक परिणाम होतात. लेखक अशावेळी अंतर्मुख होतो. काळोखाचे भय वाटले तरी सरावाने गाढ अंधारांतले नक्षत्रमंडित आकाश पाहून अस्पष्ट विचारांच्या असंख्य चांदण्या लकलुकतात. काळोख, दु:ख व मरण यात विलक्षण साम्य आहे. लेखकाला अंधारावर स्तोत्र लिहावंसं वाटलं.
पोट आणि हृदय पोटाला अर्धपोटी ठेवल्यामुळे ते स्वतःची भूक भागवण्यासाठी हृदयाचे लचके तोडत असतं, त्यामुळे हृदय नामशेष होत चालले आहे. त्यामुळे हृदयाचा ओलावा नाही, स्मित नाही, डोळ्यांत परदु:खाने आसू नाही असे चित्र लेखकाला दिसते. पोट आणि हृदय यातील लढा यात मांडला आहे.
मरावं कसं ‘जगावं कसं‘ हा प्रश्न समाधानकारक रीतीने सोडवता न आल्याने कितीतरी दुबळे जीव ‘मरावं कसं’ हा प्रश्न सोडवीत असतात. ग्राशाॅफ एक परागंदा रशियन म्हातारा पणजीत होता. तो वारला तेव्हा त्याचं मृत्यूपत्र आढळलं. आपलं जे काय सामानसुमान किंवा कपडालत्ता असेल तो विकून त्याचं उत्पन्न कुष्ठपीडितांच्या रुग्णालयास देण्यात यावं, आपला तिकिटसंग्रह मोफत वाचनालयात ठेवावा आणि आपला देह मेडिकल कॉलेजला द्यावा असे त्यात त्याने लिहिलेले होते. मरावं कसं हा प्रश्न त्याने किती उद्बोधक व विचारप्रक्षोभक पध्दतीने सोडवला होता याचे दर्शन यात घडवले आहे.
जुन्या घराची दुरुस्ती एकवेळ खटला लढवणं पुरवलं पण हे घरदुरुस्तीचे काम नको. मजूर, सुतार, गवंडी या सगळ्यांची गांथन गोवणं म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे! संस्कारक्षमतेच्या अभावी मोडकळीस आलेलं जुनं घर तात्यांना सावरावेसे वाटते तर संस्कारक्षमता जोमात असल्याने बापूनं नवं घर बांधल्यास त्यात तात्यांची जास्त गैरसोय होईल असे विचार यात मांडले आहेत.
मखमली ठिगळे स्वत:ची छिद्रं लपविण्याची दीक्षा जगच आपल्याला देत असते. भोक दिसलं की बोट घालून ते मोठे करण्याचा मोह जगाला अनावर होत असतो. माणसं परस्परांशी वागतांना आपली स्वभावछिद्रं लपविण्याची शिकस्त करीत असतात. जगाच्या सहानुभूतीशून्य वृत्तीमुळे त्यांना तसं वागावं लागतं. छिद्रं लपवण्याच्या खटाटोपात सगळी शक्ति खर्च करण्यापेक्षा त्यांना टाके मारावे किंवा ठिगळं जोडावी असे लेखक सांगतो. उगीच सुती कपड्याला मखमली ठिगळं जोडून हास्यास्पद होण्यात काय अर्थ?
थोरांचा गुरु दिव्य दृष्टि प्राप्त झाली म्हणजे ‘साध्याही विषयांत आशय कधी मोठा किती आढळे’ लेखकाला अशी दृष्टी लाभल्यावर डुक्कर हा प्राणी संतांचा व पर्यायाने आमचाही भाऊ असल्याचे कळते व ते त्याच्याकडे आपुलकीने पाहू लागतात. आपुलकीमुळे सामान्यपणे कुरुप व बेढब गणला गेलेला प्राणी लेखकाला सुंदर वाटू लागतो. त्याच्यातील सद्गुणांमुळे तो अनेक थोरांचा गुरु शोभतो असे खुसखुशीत चिंतन यात केले आहे.
मूर्तिभंजक प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात ‘गझनीचा महम्मूद’ अंशतः तरी असतोच. तो बालपणांत दिग्विजयाची अनंत सुखस्वप्ने चितारतो. पहिल्या पिढीच्या मूर्ति दुसर्या पिढीने फोडायच्या व त्याजागी आपल्या नव्या मूर्तीची स्थापना करायची व तिसऱ्या पिढीने पहिलीच्या मूर्तींचे उध्वस्त अवशेष महत्प्रयासाने गोळा करुन जतन करायचे हा आपला इतिहास आहे असे सखोल चिंतन यात केले आहे.
दु:खाचा शोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतःच आहे या वि. स. खांडेकर यांच्या सुखाचा शोध या लेखातील वाक्याने लेखक दु:खाचा शोध यावर चिंतन करतात. मार्क्स किंवा लेनिन यांची माणुसकी मोठी म्हणूनच तिने अचाट कल्पकता व विशाल सहानुभूती या आपल्या दोनही हातांनी मानवजातीला पोटाशी कवळले. दोन दयेचे घांस टाकून त्यांनी आत्मवंचना करुन घेतली नाही. दु:खाचा शोध घेण्याचे पवित्र कर्तव्य टाळलं नाही म्हणूनच ते मानवजातीचा प्रश्न सोडवू शकले. अनंत काणेकर यांनी बोरकर यांच्या लघुनिबंधांचे ठळक वैशिष्ट्य सांगितले आहे ते त्यांची गोड काव्यमयता ! ऊर्मिगीते (lyrics) लिहिणारे ते उत्तम कवी आहेत ; आणि लघुनिबंध लिहितांनासुध्दा त्यांच्यातला कवी अधूनमधून जोराने उसळी मारल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या काव्यमयतेला तत्त्वचिंतनाचा गाभा आहे.
हा लघुनिबंध संग्रह सुखद व आल्हाददायक आहे !

— परीक्षण : विलास कुडके
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
पुस्तकाचा सुंदर परिचय…
मनापासून धन्यवाद सर
एका सुंदर पुस्तकाचे चांगला परिचय.
मनापासून धन्यवाद सर