कोणत्याही देशात एखादे पर्यटन स्थळ बघायला जाणे म्हणजे त्या मागे काहीतरी कारण असत, त्या शहराचा स्वतंत्र असा इतिहास आपल्याला त्याची पाने उलटायला भाग पाडतो.
तुम्ही कोठेही प्रवास करत असाल अगोदर त्या जागेचा इतिहास माहित करून घेतला म्हणजे पर्यटनाचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो.
फेझ आणि मेकनेस ही अशीच दोन शहरे…
फेझ आणि मेकनेसला जाण्याची आमची ही किमान पाचवी वेळ होती. पण प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव, वेगळी मजा !!
फेझ शहराची स्थापना ही आठव्या ते नवव्या शतकातली. ईद्रीसी घराण्याने याची स्थापना केली.
ही शहर बघायला जाणं म्हणजे इतिहासात हजारो वर्ष पाठीमागे जाणे असेच होते, त्या दडलेला इतिहासाबरोबर आपणही त्या काळात केव्हा जातो ते कळत नाही.

यावेळी मेकनेसला जाण्याचा आमचा मुख्य उद्देश खूप वेगळा होता. मेकनेस या शहराच्या बाजूला तीस किमी असलेले ‘ वोलूबुलीस ‘ हया बर्बर रोमन शहराची जुन्या अवशेषा सहित भ्रमंती करणे !!
प्रत्येक देश हा अनेक साम्राज्य, वेगवेगळी राजे घराण्याची सत्ता, आक्रमण, राजकीय युद्धातून तयार होतो आणि नंतर कित्येक वर्षानंतर यांच्याच सर्व वास्तू, वस्तू व भग्न झालेली अवशेष गतकाळाची कल्पना करून देतात.
आमच्या मागील प्रत्येक ट्रीप मध्ये हे शहर बघण्याचा योग जुळून आला नव्हता. यावेळी मात्र ‘ मिशन वोलूबुलीस ‘ अशीच एक स्वतंत्र ट्रीप करायचे ठरवले आणि ती पूर्ण केली.
आमच्या घरापासून 350 किमी असलेल्या या शहराकडे जातांना आम्हाला मोरोककोची राजधानी ” रबात ” हे शहर ओलांडून जायचे होते. रबात हे सुध्दा खूप सुंदर, शहर त्या बद्दल सविस्तर नंतर लिहिन.
आम्ही राहतो त्या ठिकाणापासून मेकनेस चे अंतर समजून घ्यायचे असेल तर श्रीरामपूर ते सुरत हे अंतर डोळ्यासमोर आणावे म्हणजे कल्पना येईल. हे अंतर आम्ही फक्त तीन तासात पार करणार होतो. यावरून येथील एक्सप्रेस वे ची कल्पना येते .
आम्ही फक्त तीन तासांमध्ये या ठिकाणी पोचणार होतो याचं कारण म्हणजे हा संपूर्ण देश बऱ्यापैकी एक्सप्रेस हायवे नि जोडलेला आहे. रस्ते ही सुंदर आहेत. त्यामुळे 120 130 च्या गतीने पण सहज प्रवास करू शकतो.
आम्ही सकाळी नऊच्या सुमारास घरातून निघालो. दोन दिवसाच्या या ट्रिप मध्ये आम्ही दोन शहरे बघणार होतो. एक म्हणजे मेकनेस व दुसरे फेस.
दहा किमी अंतर पार करून शहराच्या बाहेर पडलो की एक्सप्रेस वे सुरु होतो. बरोबर आमचा मोरोक्कन मित्र गाडी ड्राईव्ह करायला असल्यामुळे एक सुरक्षित सोबत झाली यात शंका नाही.
एक्सप्रेस वे वरून जातांना जे जाणवलं ते मुख्य म्हणजे येथील सरकारने घेतलेली नागरिकांची कमालीची सुरक्षितता !!
प्रशस्त रस्ते, सुशोभित केलेले डिवायडर आणि ठराविक अंतरावर असलेले सुंदर रेस्टोरंट.
मुळात पर्यटनाला प्राधान्य देणाऱ्या हया देशाने प्रत्येक पर्यटकाला सर्व सोयी आणि सुविधा कश्या मिळतील हा विचार जरूर केलेला आहे.
दोन तासानंतर हाय वे च्या बाजूला असलेल्या कॅफे मध्ये थोड विश्रांती साठी उतरलो. दुपारचे बारा वाजले होते, वातावरणात गारवा बाराही महिने आपली हजेरी लावतो, इकडे दुपारचं उन सुध्दा जणू लाजत लाजत अंगावर पडतंय की काय असच वाटत.. इतक ते उन कोवळ भासत.
चहा, नाष्टा घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो. इकडे चहात आपल्या सारखे दुध टाकले जात नाही. पुदिना उकळेले चहाचे पाणी आणि त्यात साखर अगदी कमीच टाकलेली असते याची मात्र आम्हाला प्रवासात सवय झालेली आहे. कालांतराने ते अंगवळणी पडते.
आपण ज्या भागात जातो, राहतो तेथील पदार्थ खाण्याची सवय जरूर करून घ्यावी, म्हणजे अडचण होत नाही. दुपारचा एक वाजत आला होता.
आम्ही मेकनेस शहराच्या मुख्य रस्त्यापासून पस्तीस किमी असलेल्या रोमन साम्राज्यात प्रवेश केला होता. हे शहर त्यावेळी रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होत.
आजच्या मेकनेस या शहरापासून तीस किलोमीटरवर व फेस या शहरापासून साठ किलोमीटरवर वसलेले हे शहर म्हणजे रोमन संस्कृतीचे भग्नावशेष होते.

दुरूनच त्या संपूर्ण शहराच्या तटरक्षक भिंती आणि उंच अशा कमानी दिसायला सुरु झाल्या. कित्येक पर्यटकांची रेलचेल त्या ठिकाणी आम्हाला दिसली. होलूबिलिस हे रोमन साम्राज्याच्या इसवी सन पहिल्या शतकातील रोमन शहराचे जुने अवशेष होते. पहिल्या शतकामध्ये होलूबिलिस ही मुरतानियाची राजधानी होती.
तिथल्या उपलब्ध अवशेषावरून त्याकाळची रोमन लोक कसे राहत होती त्याचा अंदाज यायला वेळ लागत नाही. संपूर्ण दगडी बांधकामात तयार केलेल्या इमारती त्यावरचे अतिशय सुंदर असे नक्षीकाम आणि सुनियोजितपणे तयार केलेलं ते शहर त्या काळच्या लोकांच्या बुद्धिमत्तेची, कोरीव कामाची आणि अफाट कल्पनाशक्तीची जाणीव करून देते.
हजारो वर्षानंतर ही अजूनही तग धरून असलेले ते बांधकाम त्याची त्यावेळी किती मजबुती असेल हा विचार नक्कीच डोक्यात येतो. त्या वेळच्या लोकांचं विश्व जास्त मोठ नव्हतं त्यामुळं कित्येक संस्कृती, साम्राज्य उदयास आली आणि लोप पावली.

ख्रिश्चन युगापूर्वी ज्यावेळी मोरोक्को हा देश शेजारील मुरतानिया या देशाचा भाग होता, त्या वेळी होलूबिलिस हे रोमन साम्राज्याचे प्रशासकीय केंद्र मानले जात असे. त्यावेळी हे रोमन साम्राज्यातील सर्वात नावाजलेले शहर होते. इसवी सन दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकापर्यंत शहराची चांगली वाढ झाली. त्यातील काही इमारतीच्या भिंती आजही उभ्या आहेत. एकूण 42 हेक्टर मध्ये असलेले हे शहर संपूर्ण बाजूने तटबंदी आणि संरक्षित केले होते. त्यात जवळपास 20 हजार लोक राहत असत. शहराच्या आत ऑलिव्ह पासून तेल उत्पादन करण्याच्या सामग्रीसह, भव्य निवासस्थाने व राहण्याची सुसज्ज अशी व्यवस्था, मोठ मोठे सभा मंडप, स्वच्छतागृहे आणि रहिवाशांसाठी केलेली राहण्याची सोय आणि इतर भरपूर सोयी होत्या. आपण स्वतः जेव्हा त्या परिसरात फिरतो प्रत्येक क्षण आपल्याला हजारो वर्ष मागे घेऊन जातो.

तेथील संपूर्ण बांधकाम हे दगडी होतं. एकसंघ दगडामध्ये तयार केलेले खांब व उंच उंच सभा मंडप बघून त्यावेळी इतक्या उंचीवर हे दगड कसे पोहोचवले असतील याचे कौतुक वाटते. आठव्या शतकात इस्लाम धर्म या प्रदेशात आला. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात होलूबिलिस हे मोरोक्कोतील इद्रीस या राजघराण्याचे घर बनले.इद्रिसि या राजवंशाचा संस्थापक आणि मोरोक्कोचा संस्थापक होता. नंतर कालांतराने लोक होलूबिलिस मधून फेझ आणि मुलेइद्रिस या ठिकाणी राहण्यास गेले. अठराव्या शतकात आलेल्या एका शक्तिशाली भूकंपाने अनेक इमारती उध्वस्त झाल्या. 1830 च्या आसपास फ्रेंच सैन्याने होलूबिलीस मध्ये उत्खनन सुरू केले. त्या ठिकाणी असलेली स्मारके यांचा जिर्णोद्धार केला. परंतु आजही हॉलीबुलिस येथील 40 हेक्टर जागेपैकी केवळ अर्धा भाग उत्खनन झाला आहे. 1997 मध्ये युनेस्कोने ह्या अनोख्या जागेचे संरक्षण करण्यासाठी हॉलीबुलिसला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

— लेखन : प्रकाश फासाटे..मोरोक्को
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान विश्लेषन, धन्यवाद.!!👍
मेकसनेला व मिशन वोलूबुलीस प्रवासाने तेथला इतिहास छान मांडला व उंचावर दगड कसे हे प्रश्नचिन्ह आपल्यास पडले …