तू खुले आकाश माझे
आज पासून दर शनिवारी आपण “ललित” हे नवे सदर सुरू करीत आहोत. नागपूर येथील लेखिका, कवयित्री अनुपमा मुंजे या हे सदर लिहिणार आहेत.
अनेक वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून अस्तित्व खुणा, अंबरझुला, पाऊसवेडी आणि स्पर्शमाया ही चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
अनेक पुरस्कार प्राप्त. अखिल भारतीय साहित्य संमेलनात 2 वेळा निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आकाशवाणी, दूरदर्शन तसेच आपल्या पोर्टल वरही त्यांच्या कविता, कथा प्रकाशित झाल्या आहेत. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपुर्वक स्वागत आहे.
– संपादक
लहानपणापासून आम्ही स्त्रिया एका चौकटीत जगत असतो. संस्कराचे बाळकडू पीत मोठं होत असतो. शाळा, कॉलेज, कधी नोकरी मग लग्न. सासरच्या जबाबदाऱ्या. मुलं. सगळी साखळी वाढत जाते आणि आमचं आकाश मर्यादित होत जातं. मुलं मोठी होत जातात. आई आणि मुलं ह्याच्या आभाळात थोड मळभ साठते.
आपल्यातली ती थोडी अस्वस्थ होते. आता प्रत्येकाला वेगळी स्पेस हवी असते. हिला मात्र चौकट सोडवत नाही. आतली घुसमट वाढत जाते. आता माझी गरज नाही का ? सारखी आई, आई करणारी ही पाखरे कधी मोठी झाली बरे ? नवराही ऑफिस, मित्र, काम ह्यात बुडतो. मग राहतं ती आणि तीच घर. बंद दरवाज्याची चौकट तिला साद घालते, टीवी तिला बोलवतो. मालिका तिला खुणावतात, यू ट्यूब, पाककृती स्वयंपाकघर तिला खाणावत. पण नाही तीच मन आता रमत नाही. खिडकीतून दिसणारे चतकोर आभाळ तिला आता नको असते. तिला हवे असते अथांग निर्मळ मोकळे आभाळ. झाला अंत नाही..
तिची तगमग वाढत जाते. हृदय भरून येते. ओठातून शब्द उमटत राहतात. डोळे भरून येतात. अंतराची खूण गवसते. तिला ती सापडते. तिचे उंच आकाश तिला गवसते. ती मुक्त होते.लेखणीतून शब्द उमटत जातात. तिच्या वेदनेचा पिळ शब्दातून आकार घेतो. ती घडत जाते. बावनकशी सोन्यासारखी उजळत जाते.
ती जगते. सुगंधी क्षण विसरले जातात काही व्रण. सुखाचे कण ती साठवत राहते मनातल्या पावसात चिंब भिजत राहते. एकटेपणाची सल दूर सरते.नकळत ती नवा आकार घेऊ लागते.
एक आत्मविश्वास तिच्यात अंकुरतो.तिची मूळ घट्ट होतात. जमिनीला धरून ठेवतात.आपल्या मातीशी तिची नव्यांन ओळख होते. तिची वेल गगनावर जाऊ पाहते. रंग रूप रस गंध ती नव्याने लेऊन येते.
नवरा, मुलं ह्या बदलाने प्रथम स्तिमित होतात.पण त्यांनाही हा नवा बदल आवडतो. आणि एक दिवस तिचा सखा रात्री चांदण्यात बाहेर नेतो. जग निवांत असते. चाफ्याचा गंध दरळत असतो. नकळत तो तिचे दोन्ही हात हातात घेतो. अलवार हुंगतो अन तिच्या कानात कुजबुजतो,
“तू खुले आकाश माझे
गुंतले तुजपाशी प्राण माझे..”

— लेखन : अनुपमा मुंजे. नागपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️. 9869484800