भासे जीवन एकाकी
आयुष्याच्या सांजवेळी
वाटे असावी सोबत
आपल्याला याचवेळी //१//
सखी असावी आपली
आनंदाने सोबतीला
ठाव घेऊनी हृदयाचा
मिळो आनंद मनाला //२//
कोणा करावे ही सखी
पडे विचार मनाला
येता समोर लेखणी
हर्ष लोचनी जाहला //३//
झाली सखी काव्यसखी
झरझर उतरले
लेखणीने काव्यपुष्प
नवं नवे काव्य झाले //४//
हास्य शृंगार करुणा
घेऊनिया या रसांच्या
बनलेले असे काव्य
मने जिंकी रसिकांच्या //५//
कधी गोड कधी कटू
अनुभव जीवनात
कविमन हळवेच
राही नेहमी ऋणात //६//
असे जेव्हा सोबतीला
काव्यसखी नेहमीच
भासणार नाही कधी
जीवनात एकटेच //७//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800