‘इस्त्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा‘
असाच पुस्तकांचा शोध घेत असतांनाच माझे लक्ष ‘इस्त्रायल मध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या एका छोट्या पुस्तकाकडे वेधले. हे पुस्तक एका कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर म्हणून पाच वर्षे काम केलेले व योग प्रचारासाठी जगातील ४० देशामध्ये ५०० हून अधिक कार्यशाळा घेणारे श्री रविंद्रकुमार यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘Indian Heroism in Israel’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा अनिल कोल्हटकर यांनी केला आहे.
१०-१२ दिवसांपासून घुमसत असलेल्या इस्त्रायल-पॅलेस्टाइन युध्दाचे दररोज वृत्त पत्रात व टी.व्ही वरील समाचार, लेख, वार्तापत्रे, समीक्षा वाचण्यात, पहाण्यात येत असतातच. दोन्ही देशांच्या अस्तित्वासाठी लढले जाण्याची सुरूवात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने सुरू केलेल्या या युद्धास ‘पूर्ण विराम’ आम्ही देऊ असे इस्त्रायलने सांगितले आहे ते महत्वाचे आहे. या परिस्थितीमुळे या पुस्तकाचे औचित्य मला जास्त भावले. मी सध्या आठवडाभर चालू असलेल्या युद्धावर भाष्य करणार नाही किंवा त्याचा तपशीलही देणार नाही कारण ते सर्व वाचक दैनंदिन वाचतच असतात. परंतू या पुस्तकातील जुन्या व सामान्यजनांना फारसे माहित नसलेल्या वस्तुस्थितीचा मागोवा मात्र आवर्जून घेत आहे.
आधुनिक इस्त्रायल च्या इतिहासाचे पहिले पान हे ९०० भारतीय जवानांच्या रक्ताने लिहिले गेले आहे. ज्यांनी पहिल्या जागतिक महायुध्दात २३ सप्टेंबर १९१८ रोजी ओटोमाॅन तुर्काच्या राजवटीतून ‘हायफा’ बंदर मुक्त करतांना प्राणाहुती दिली. त्यांच्या सन्मानाचे प्रतीक म्हणून सध्याच्या इस्त्रायल सरकारतर्फे आज देखील त्यांच्या समाधी स्थळाचे संरक्षण, देखभाल, जतन करीत आहे. दर वर्षी २३ सप्टेंबरला त्यांच्या नावासह त्यांची बहादुरी आणि त्यांनी केलेले बलिदान यांचे स्मरण केले जाते तसेच या सर्वांचा शाळेच्या पाठ्यपुस्तकातही समावेश केला आहे.
१९१८ साली २२-२३ सप्टेंबर ला हायफाचे युद्ध मानवी इतिहासातील सगळ्यात मोठ्या युध्दातील एक आहे. हिंदुस्थानातील जोधपूर आणि म्हैसूरच्या महाराजांनी पाठविलेल्या भारतीय सैनिकांमधील अनेकांनी इस्त्रायल मध्ये बलिदान दिले. तुर्की, जर्मनी, आणि ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त सेनेचा पराभव केला आणि हायफाचे इस्त्रायली बंदर मुक्त केले. शत्रूराष्ट्राचे सैनिक तोफा, बंदूका, रायफल इत्यादी आधुनिक हत्यारांसह सुसज्ज होते तर भारतीय सैनिकांकडे काही जण घोडेस्वार तर पायदळाकडे तलवारी आणि भाले एवढीच हत्यारे होती. इतिहासातील ही शेवटची लढाई कधीं ज्यामध्ये भाले तलवारीच्या सहाय्याने आधुनिक हत्यारांनी सुसज्ज असलेल्या सैनिकांचा पराभव केला व एक मोठे युध्द जिंकले.
अनेक परदेशी राज्यकर्त्यांनी इस्त्रायल वर जवळपास २००० वर्षे राज्य केले या काळात ब-याच यहुदींना गुलामी, अमानवी यातना, कैद, नरसंहार, गॅस चेंबर याद्वारे खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागला आणि जागेअभावी जगभर विखुरलेल्या अवस्थेमध्ये रहावे लागले महाराष्ट्रात अलिबाग व केरळ मधील कोच्ची येथे सुमारे २५०० वर्षे राहिले. १९४८ मध्ये इस्त्रायल देश स्थापन झाल्यावर ते पुन्हा आपल्या देशात गेले. यहुदीना भारतीयांकडून उदारता, आतिथ्य, त्याग या संबंधात जी माणूसकीची वागणूक मिळाली तशी अन्य दुसऱ्या देशात मिळाली नाही हा सर्व इतिहासाचा संदर्भ पुस्तकात विस्ताराने दिला आहे.

भारताच्या विकासात यहुदी समाजाने खूप महत्वपूर्ण योगदान दिले आहे.मुंबई – ससून डॉक, मुंबई विद्यापीठाची लायब्ररी, बॅंक ऑफ इंडिया, राणीचा बाग, चिडिया घर, अल्बर्ट संग्रहालय, ससून हायस्कूल, पुण्याचे ससून हाॅस्पिटल या त्यांच्या योगदानाची तसेच वास्तू कलात्मक सौंदर्याची धार्मिक स्थळे ही उदाहरणे आहेत. समाजसेवी डेविड ससून, लेफ्टनेंट जनरल जैकाॅब, व्हाइस अँडमिरल बेंजामिन सॅमसन किलेकर, आंतरराष्ट्रीय मूर्ती कार पद्मभूषण अनिश कपूर, कवी लेखक पद्मश्री भरत नाट्य्म कलाकार आणि संस्कृतविद्वान लीला सॅमसन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेता अस्थिर डेविड, आणि चित्रपट कलाकारांमध्ये सुलोचना, नादीरा, डेव्हिड, इत्यादी लोकांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या फोटोसहित माहिती पुस्तकात दिली आहे.
अलिबाग-नागाव परिसरात २००० वर्षांपूर्वी सात यहुदी जोडपी गलबत फुटल्याने आली. स्थानिक जनतेने त्यांना आश्रय दिला. काळाच्या ओघात ही यहुदी मंडळी इतकी मिसळून गेली की नावे, काही चालीरीती वगळता त्यांच्यात काही भेदभाव राहिलाच नाही. एकरूप होतांना त्यांनी महाराष्ट्रातील आडनाव पध्दती स्वीकारली जसे रोहेकर, कोहिमकर !
इस्त्रायल मध्ये सध्या भारतातील ८० हजार यहूदी आहेत. हे सर्व १९४८ नंतर आधुनिक इस्त्रायल राष्ट्राची स्थापना झाल्यावर केवळ धार्मिक मान्यता – सामाजिक रूढी,परंपरा आणि समृध्द जीवनाच्या अपेक्षेने परत गेले. भारत व भारतीयांबाबत त्यांना नेहमीच अभिमान वाटतो. इस्त्रायलच्या ‘दिमोना’ शहरात ७५ हजार भारतीय यहूदी राहतात आणि या शहरास ‘मिनी इंडिया’ असेही म्हणतात. या पुस्तकात आधुनिक काळातील भारत इस्त्रायल संबंध, सांस्कृतिक संबंध, हायफा मुक्तीचे महत्व, भारतीय व इस्त्रायली सैनिकांनी लढविलेली युध्दे, भारताबाहेरील हिंदू साम्राज्ये यावर विस्ताराने टिपणे परिशिष्टात सादर केली असून ती अत्यंत माहितीपूर्ण आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई, सवाई बाजीराव पेशवे तसेच तामिळनाडूच्या राणी वीरांगना वेलू नाचियार, चालुक्य राणी नाईक देवी सोळंकी, जलोद राज्याचे राजा कान्हा देव, बंगाली वाघ राजा गणेश, राजस्थानचा राणा कुंभ, आसामचे ‘अहोम’राजे, काश्मिरलराजे ललितादित्य, सम्राट राजेंद्र चोल, मेवाडचे राजे बाप्पा रावळ, राजेसंग्रामसिंग, तामिळनाडू तील पल्लव राजे, ओरिसातील शैलेंद्र राजे यांच्या युध्द कौशल्यावर तसेच शौर्यगाथा वर देखील प्रकाश टाकला आहे. त्यामुळे तरुणांना हे पुस्तक निश्चितच प्रेरणा देणारे आहे.
विशेष म्हणजे सध्याच्या वातावरणात तर एक उत्कृष्ट ऐतिहासिक माहिती देणारे पुस्तक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800