सायबर फसवणूकीत सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणावर वापर आढळून येतो. त्यासाठी प्रत्येकानेच याचा वापर सजगतेने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एअर कमोडोर श्री. निरंजन कुमार पार्ही (निवृत्त) यांनी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यानमाला उपक्रमात ’इम्पॉटर्नन्स् ऑफ सायबर सिक्युरिटी इन टुडे कॉन्टेक्स’ विषयावर व्याख्यानाचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानमालेत एअर कमोडोर श्री. निरंजन कुमार पार्ही (निवृत्त) यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना एअर कमोडोर श्री. निरंजन कुमार पार्ही (निवृत्त) यांनी सांगितले की, जगभरात आणि विशेषतः भारतात सोशल मिडीयावर एका दिवसात सात तासांपेक्षा अधिक वेळ व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले आहे. भारतासारख्या देशात मोठया प्रमाणावर जनसंख्या सोशल मिडीयावर असल्याने त्यांच्या बाबतची व्यक्तीगत, सामाजिक, शैक्षणिक माहिती सहजपणे उपलब्ध होत असते. या अनुषंगाने सोशल मेडियावर वावर अधिक सजगतेने करणे आवश्यक आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कटाक्षाने केला पाहिजे. त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी महत्वपूर्ण आहे. मोबाइलचा वापर अनावश्यक अपलोड किंवा डाउनलोडसाठी करू नये. आपला पासवर्ड अनोळख्या व्यक्तीबरोबर शेअर करु नये, फसव्या मेलपासून सावध राहावे.
सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापिंग, ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार होतात. यासाठी स्मार्ट फोन, कॉम्प्युटर यांचा माध्यमांतून सायबर हल्ला करण्यात येतो याकरीता हा वापर तेवढाच जबाबदरीपूर्वक होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की, ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरीता समाजात सायबर सुरक्षा जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी काम करतांना सायबर हल्ले टाळण्यासाठी संगणकातील सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरमध्ये अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असावे, संगणकाचा डेटा बॅकअप घ्यावा, सार्वजनिक ठिकाणचा किंवा कुठलाही असुरक्षित वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळावे, अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेचे ईमेल उघडू नयेत, कठीण पासवर्ड चा वापर करावा, नियमित सुरक्षेबाबत माहिती ठेवा. सायबर हल्ले व्हायरस अटॅक, फिशिंग, कोड इंजेक्शन, मालवेअर, एसक्यूएल इंजेक्शन, झिरो डे इत्यादि द्वारे करण्यात येतात. या हल्ल्यांपासुन बचाव करण्यासाठी उत्तम नेटवर्क सुरक्षा, अॅप्लीकेशन सुरक्षा, माहिती किंवा डेटा सुरक्षा, ऑपरेशन सुरक्षा, क्लाउड सिक्युरिटी यांद्वारे सायबर सुरक्षा करण्यात येते. शाळा, महाविद्यालय व सर्वसामान्य जनतेला सायबर सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याचा प्रचार व प्रसार होणे महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते एअर कमोडोर श्री. निरंजन कुमार पार्ही (निवृत्त) यांचा सन्मान परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी केला. याप्रसंगी व्याख्यात्यांचा परिचय विशेष कार्य अधिकारी कर्नल डॉ. वरुण माथूर यांनी केले. या व्याख्यानास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800