माता सती चे वडील राजा दक्ष प्रजापती यांनी कंखल (हरिद्वार) येथे बृहस्पती सर्व नावाचा यज्ञ आयोजित केला होता. याप्रसंगी त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले होते मात्र आपली मुलगी सती आणि जावई शंकर यांना बोलाविले नाही. शिवाने नकार देऊनही देवी सती यज्ञ स्थानी उपस्थित राहिली. तिने आपल्या पित्यास भगवान शिवास आमंत्रण न दिल्या विषयी जाब विचारला. मात्र राजा दक्षाने शिवा विषयी अपशब्द उच्चारले आणि त्याचा राग येऊन दुःखीत होऊन सतीने अग्नी कुंडात उडी घेतली.
हे वृत्त कळताच भगवान शिव क्रोधित झाले. भगवान शिवाच्या तांडवाने संपूर्ण जग थरथरू लागले आणि इतर सर्व देवांनी हे तांडव थांबविण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना सुरू केली. हे पाहून विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि शिवाचे विवेक परत आणण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र वापरून सतीच्या निर्जीव शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर ठीक ठिकाणी पडले आणि त्यांना शक्तीपीठे म्हणून ओळखले जाऊ लागले. ही सर्व ५१ ठिकाणे पवित्र भूमी आणि तीर्थक्षेत्रे मानली जातात.
भारतीय उपखंडात सती मातेची ५१ शक्तीपीठे आहेत. या शक्तिपीठांमध्ये मातेचे वेगवेगळे अंग आणि तिचे दागिने दर्शविण्यात येतात. मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत. या शक्तिपीठाच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात. मातेचे दर्शन घेतात. सतीच्या आशीर्वादाने संकट हरण होते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे.
आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित असलेले ५१ शक्तिपीठांपैकी एक कामाख्या हे शक्तिपीठ अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. कामाख्या हे मंदिर सर्व शक्तीपीठांचे महापीठ मानले जाते.

गुवाहाटी पासून दहा किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे शक्तीदेवता सतीचे मंदिर आहे व आसामी लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नीलाचल पर्वत श्रेणीत हे मंदिर स्थित आहे. भारतात देवींची ५१ शक्तीपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे जिथे स्त्रियांची योनी किंवा मासिक पाळी या विषयावर बोलणे ही टाळले जाते तिथे या मंदिरात देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. सती देवीने स्वत्याग केल्यानंतर शंकराने क्रोधित होऊन तांडवनृत्य सुरू केले. हे पाहून विष्णूने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले. नीलाचल पर्वतावर सतीचा योनीभाग पडला. तिथेच आज हे कामाख्या मंदिर आहे.
हे कामाख्या मंदिर तीन भागात बनवले आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे. प्रत्येकाला तिथे जाण्याची परवानगी नसते. दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे. इथे दगडातून सतत पाणी येत असते. असे मानले जाते की माता तीन दिवसांसाठी रजस्वला आहे. हे तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात.
येथे खास प्रकारचा प्रसाद मिळतो प्रसाद म्हणून भक्तांना ओले कापड दिले जाते. त्याला अंबुबाची कापड म्हणतात.

कामाख्या मंदिरात दरवर्षी अंबुवासी मेळा भरतो. या मेळ्यास कामरूपी कुंभ असेही म्हटले जाते. यावेळी कामाख्या मंदिरात योनी पूजेची परंपरा आहे. देशभरातले साधू, मांत्रिक यात भाग घेतात तसेच नीलाचल गिरीवरच्या गुहांमध्ये साधक साधना करतात.
हे मंदिर पाहताना आणि ही कथा ऐकताना एक जाणवले की, स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणूनच सर्व सृष्टीनिर्मीतीचे केंद्रही स्त्रीलाच मानले जाते. एक प्रकारे स्त्रीचं महात्म्य या मंदिरात पूजले जाते.

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800